मीनाच्या शाळेत सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता. त्यामुळे खूप साऱ्या राख्या घेऊन चांगला नट्टापट्टा करून मीना शाळेत निघाली होती. मीना इयत्ता चौथीत शिकत होती. त्यांच्या शाळेत हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होत होता. मुली वर्गातल्या मुलांना ओवाळतात. मुले मुलींना खाऊ देतात, भेटवस्तू देतात. शाळेतर्फेदेखील सर्वांना जेवण दिले जाते. खूप आनंदी असा हा दिवस असतो. या दिवसाची सगळे वाट बघत असतात आणि आज तो दिवस उजाडला.
मीना शाळेत पोहोचली, तेव्हा अनेक मुले-मुली विविध रंगाचे, विविध प्रकारचे कपडे घालून शाळेत आली होती. त्यामुळे आज शाळा अगदी रंगीबेरंगी बनून गेली होती. एखाद्या फुलबागेसारखी फुलली होती. राखी बांधून झाल्यानंतर शाळेतर्फे मुलांना जेवण होते. ते देण्यासाठी चार-पाच स्त्री-पुरुष आले होते. त्यांच्यासोबत एक पाच-सहा वर्षांचा काळा-सावळा मुलगा आला होता.
सर्व मुले रांगेत बसली. मुलींनी त्यांच्याभोवती रांगोळ्या काढल्या. कोणी छान, तर कोणी वेड्यावाकड्या! मग त्यांच्यासमोर बसून मुली एकेकाला राख्या बांधू लागल्या. कुणी दोन मुलांना बांधल्या, कुणी तीन मुलांना बांधल्या, तर कोणी सगळ्यांनाच राख्या बांधल्या. त्यावेळी त्या छोट्या-छोट्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद नुसता ओसंडून वाहत आणि मुलींचेही चेहरे कसे आनंदाने फुलून गेले होते. कोपऱ्यात उभा राहून एक काळा-सावळा मुलगा हे सर्व एकटक बघत होता. मीनाची नजर अधून-मधून त्याच्यावर जात होती. मीनाच्या लक्षात आलं, त्याच्या हातात एकही राखी नाही. त्यामुळे मीना लगेच त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, “काय रे तुझं नाव!” मीनाने विचारताच तो मुलगा तेथून पळाला अन् त्याच्या आईच्या मागे जाऊन लपला. “ये ना इकडे!” मीनाने त्याला पुन्हा एकदा हाक मारली. “अरे मुला इकडे ये ना, काय तुझं नाव?” तो म्हणाला, “ताई माझं नाव प्रतीक” तोपर्यंत इतर मुलं-मुली मीना त्या मुलाशी काय बोलते हे लांबून बघत होती.
शिक्षकांचंही लक्ष आता मीनाकडे गेलं होतं. मीनाने त्या मुलाला हाताला धरून इतर मुलांंच्या सोबत बसवलं. त्याच्याभोवती रांगोळी काढली. मोठ्या आनंदाने त्याच्या कपाळावर कुंकुंमतिलक लावून त्याला ओवाळले आणि मग एक सुंदर अशी भलीमोठी राखी त्याच्या हातावर बांधली. सोबत तिला मिळालेल्या सर्व भेटवस्तू आणि गोड खाऊ त्याला दिला. एक लाडू स्वतःच्या हाताने तिने प्रतीकला भरवला. प्रतीक हाताला बांधलेल्या राखीकडे एकटक बघत होता. हातावरच्या राखीवरून बोटं फिरवत होता. त्याचा स्पर्श अनुभवत होता. मीनादेखील त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तोच तो मुलगा म्हणाला, “ताई आज पहिल्यांदाच कुणीतरी मला राखी बांधली.” मीना हसतहसत म्हणाली, “आता दरवर्षी मी तुला राखी बांधेन, पण त्यासाठी तुला माझ्या घरी यावं लागेल, येशील ना?” प्रतीकला कळेना आता काय करावे. आपण आपल्या नव्या ताईला काय बरं द्यावे. म्हणून तो उठला. आईकडे गेला अन् म्हणाला, “आई आई मला एक रुपया दे ना, ताईने मला राखी बांधली. मला तिला ओवाळणी द्यायची आहे.” कोणताही जास्त विचार न करता आईने चटकन त्याला एक रुपया दिला. तो धावतच मीनाकडे आला आणि म्हणाला ताई ताई ही घे तुझी ओवाळणी!” असं म्हणत तो एक रुपया तिच्या ताटात टाकला. ओवाळणी देताना प्रतीकच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक मीनाला दिसत होती. ओवाळणीत मीनाला छान छान भेटवस्तू मिळाल्या होत्या. पण त्या सर्वांपेक्षाही तिला प्रतीकने दिलेला एक रुपया अधिक मौल्यवान वाटत होता. म्हणूनच मीनाने तो रुपया आपल्या बॅगमध्ये अगदी जपून ठेवला!
राखी बांधण्याचा कार्यक्रम आता संपला होता. सर्व मुले घरी जाण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात शिपाईकाकांनी मीनाला सांगितले, “तुला मुख्याध्यापकांनी त्यांच्या रूममध्ये बोलवले आहे.” मीनाला कळेना एवढ्या सगळ्या मुलांमधून मलाच का बरं बोलवले. तशी मीना लगेेच मुख्याध्यापकांना भेटायला गेली. पाहते तर काय तिकडे सर्व शिक्षक जमा झाले होते आणि मीनाची आईदेखील होती. मीनाला कळेना काय झाले! तोच मुख्याध्यापक बोलू लागले. “आज खऱ्या अर्थाने मीनाने रक्षाबंधनाचा सण साजरा केलेला आहे. आपल्या बरोबरीच्या मुलांबरोबरच जेवण देण्यासाठी आलेल्या लोकांबरोबरच्या एका मुलालाही मोठ्या प्रेमाने, आदराने शाळेच्या मुलांसोबत बसवलं आणि मोठ्या आनंदाने त्याला राखी बांधली. तिला मिळालेल्या सर्व भेटवस्तू त्या मुलाला दिल्या. राखी बांधण्याचा खरा अर्थ आपल्या मीनालाच चांंगला कळाला आहे.” असं म्हणत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. तिचं अभिनंदन केलं. राखी बांधणे म्हणजे नातं जोडणं हा अर्थ मीनाला समजला होता. इतका वेळ आपल्या लेकीचं कौतुक बघून आईचे डोळे भरून आले होते. त्या भरल्या डोळ्यांनीच आईने मीनाला आपल्या कुशीत ओढले आणि मग मीनासुद्धा आईला मोठ्या आनंदाने बिलगली.
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…