ऋतुरंग!!
ही याद कुणाची आली
नभ ओथंबून ये खाली,
अलवार शीळ घनरानी
सर झिम्मडते मतवाली! …१
लगबग ही पाखरांची
घरट्यात विसावा घेई,
ती उनाड पाऊलवाट
मनचिंब बावरी होई! …२
सही थिरकन थेंबोळ्यांची
की शब्दोत्सव पानोपानी,
झुळझुळे बोबडे बोलू
दुडदुडतो ओहळ आणि! …३
महुडाई गिरक मल्हार
घनगर्द रेशमी गाणे,
मातीस सृजन डोहाळे
मृद् गंधित श्वास तराणे! …४
गर्भार पुलकित माती
हुंकार कोवळा पोटी,
जाणिव सुखद नवलाई
लवलवते कोमलकांती …५
आतृप्त चराचर देही
द्विजगण, पर्वतराई,
मोदित सुरावटीवर
झुलते धुंद हिरवाई! …६
आवर्त असा स्वच्छंद
विणतो मनाचे धागे,
सर्वदूर सचैलगात्री
फुलते विश्व अनुरागे!! …७
– प्रा. डाॅ. प्रकाश पांडुरंग गोसावी, कल्याण प.
मंगळागौर…
उत्सव उत्साहाचा आनंदाचा
आई मंगळागौरीच्या पूजनाचा
नटून थटून गं गडे मिरवायाचा
नाचून खेळून साजरा करायचा
सम्राज्ञी खेळते झिम्मा न फुगडी
डुलडुल डुलते कानातली बुगडी
सख्या नेसल्या नऊवारी लुगडी
भरजरी हिरवी पिवळी न तांबडी
मंचावर पडला दोडक्याचा कीस
आक्काबाईच्या कोंबड्याच पीस
वाऱ्यावर उडलं चिमणी परीस
कारल्याचा वेल वाढे दिसो दिस
घूमेच्या नाचानं स्टेज दणदणलं
घागर घुमवून अवसान आणलं
सासू-सुनेचं भांडण फारच रंगलं
हट्टुश पान बाई हट्टुश चांगलं
भरभरून झाला आनंद प्राप्त
मंत्रमुग्ध झाले स्वकीय आप्त
सण दिमाखात झाला समाप्त
आता घरी जाणं होतं क्रमप्राप्त
राज्ञीच्या मंगळागौरीत
लाभला सुगंध सुवर्णाला
वर्णन करताना झाला
अतीव आनंद ‘अपर्णा’ला!
– अपर्णा पुराणिक, ठाणे
श्रावण मास
ओढ तुझ्या आगमनाची
लखलखत्या सणांची
सुरुवात श्रावणी मासाची
रेलचेल गोडाधोडाची…
श्रावण महिना सणावारांचा पाहुणा
नागपंचमी नि नारळी पौर्णिमा सण आनंदाचा
घरोघरी उधाण जल्लोषांना
आनंदी ठेव ना माझ्या आप्तेष्टांना…
श्रावण मासात या
श्रीकृष्णजन्माष्टमीचा दिन खास
जन्माला आल्यापासून
दही आणि लोणीचा घास
दही दूध लोणी घागर भरुनी
सख्या निघाल्या बाजारी
कृष्ण मुरारी टपून बसला यमुनेतीरी…
श्रावणाच्या सरी
उपवास करी ध्यानी मनी…
बघता बघता सरला हा श्रावण
ओढ लागली आगमनाची
चाहूल गौरी गणपतीची
माझ्या बाप्पाच्या स्वागताची…
– प्रणाली अशोक कांबळे, अटाळी, कल्याण
प्रेम…
मुग्ध या कळीचे प्रिया
फुल आज झाले
हृदयाचे खग कसे
उंच आकाशी विहरत फिरले…
काव्य स्फुरले मनात
भावना दाटली
पंख फुटले मनास
प्रेमरसात चिंब काया भिजली…
हे आकर्षण म्हणू की
ओढ ही प्रेमाला
उषा लाजूनी नभाला
लालकेसरी गुलाब हे उधळी…
प्रेम सात्त्विक होते ते
मोह ना कायेचा
आकर्षण नाही तेथे
साक्षात कृष्ण बघ अवतरला…
– मानसी मोहन जोशी, ठाणे (प)
आमचा बाप्पा घरी येणार…
आता येणार येणार येणार
आमचा बाप्पा घरी येणार…
बांधा तोरण दारावरी
आणि रांगोळी घाला हो दारी
असा वाजत गाजत येणार
आमचा बाप्पा घरी येणार…
आणा बत्ताशे, साखरगाठी
करा मोदक त्याच्यासाठी
लाडू पेढ्यांचा प्रसाद मिळणार
आमचा बाप्पा घरी येणार…
घाला नवीन कोरे हे कपडे
आई नेसेल नवीन लुगडे
रोज मेजवानी फक्कड होणार
आमचा बाप्पा घरी येणार…
– राजश्री नीरज बोहरा, डोंबिवली, ठाणे
हळवा प्रीतगंध
दुरदेशी गेला बघा
एकदा माझा साजण |
कोमेजले मन नि
सुने सारे अंगण||१||
क्षणोक्षणी आठवे सख्या
मज तुझाच सहवास
आहेस तु जवळी की
फक्त छळणारा आभास||२||
अवखळ अल्लड वा-या
घेऊनी नाजुक सुमनाला |
हळवा माझा प्रीतगंध
देशील ना साजणाला||३||
नभीचा तो चंद्र खट्याळ
बोले मजला हसुनी |
विरहगीत मला न ठावे
सदा घेरलो मी तारकांनी||४||
हळूच समजावले त्यासी
भेटीला आस तुला रातीची |
ह्रदयी माझ्या सदैव
छवी प्राणसख्याची||५||
निःशब्द बनविले
रातीच्या राजाला जरी |
हुरहुर तुझ्या भेटीची
परी दाटते अंतरी||६||
नकोच आता दुरावा
नको विरहाच्या वेदना |
परत ये फिरुनी सख्या
जाणुनी मनीच्या भावना||७||
– दीपाली वाणी, ठाणे
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra