हल्ली एक नैतिक जबाबदारी, पाळीव प्राण्यांची आवड यातून तुरळक प्रमाणात का असेना लोक कुत्रा, मांजर, पक्षी असे प्राणी पाळू लागले आहेत. आपण सर्वांनीच निसर्गाप्रती, प्राणीमात्रांविषयी भूतदया ठेवावी, जेणेकरून निसर्गाच्या ऋणाची परतफेड करता येईल.
काही महिन्यांपूर्वी एक बातमी वाचनात आली आणि मन हेलावले. ही घटना फ्रान्स या देशातील आहे. मध्यंतरी कोरोना काळात लोक घरात राहून कामं करायची (वर्क फ्राॅम होम). मुलांच्या शाळा, कॉलेजंही बंद होती. ती ऑनलाइन सुरू होती. कुणाचे कुठे बाहेर येणे-जाणे नव्हते. अशा वेळी अनेक कुटुंबांनी एकलकोंडेपणा दूर व्हावा म्हणून अनेक पाळीव प्राणी पाळले; परंतु नंतर कोरोनाची साथ संपल्यावर अनेक फ्रेंच नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राणी सुट्टीत दूरवर जाऊन शहरांबाहेरील वस्त्यांमध्ये, मोकळ्या जागांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर जाऊन सोडले. फ्रान्समधील काम करणाऱ्या एका संस्थेने असे सोडलेले अंदाजे १२ हजार प्राणी सांभाळण्यासाठी दत्तक घेतले. आपल्या भारतातही काही ठिकाणी अशा घटना घडल्या आहेत; परंतु हल्ली एक नैतिक जबाबदारी, पाळीव प्राण्यांची आवड यातून तुरळक प्रमाणात का असेना लोक कुत्रा, मांजर, पक्षी असे प्राणी पाळू लागले आहेत. यातून घरातल्या मुलांनाही फायदा होऊ लागला आहे.
दैनंदिन जीवनातील ताण-तणाव, रोजच्या जीवनातील साचेबद्धपणा टाळण्यासाठी लोक पाळीव प्राण्यांकडे ओढले जात आहेत. प्राणी-पक्षी वर्गाकडून, जलचर यांच्याकडून मानवाला अटी-विरहित प्रेम मिळते. या संदर्भातले त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी काही प्राणी व पक्षी पाळलेल्या लोकांशी मी बातचीत करण्याचे ठरविले.
कुलाबा येथे राहणाऱ्या स्वप्नजा वर्मा यांनी बारा वर्षे लिओ नावाच्या कुत्र्याचा प्रेमाने सांभाळ केला. त्या म्हणाल्या, “माझे कुटुंबीय आपापल्या कामाला निघून गेले की मिळालेला रिकामा वेळ मी लिओचे संगोपन करण्यात घालवू लागले. त्यातून एका सुंदर आनंदाची अनुभूती मला मिळू लागली. लिओचे खाणे-पिणे सांभाळणे, त्याला फिरायला नेणे, त्याची अांघोळ यात वेळ पुरेनासा झाला. मला मानसिक मरगळ अजिबात येत नव्हती. हळूहळू कुटुंबीयांसोबतही त्याची मैत्री जमली. आमच्या घरातला तो एक सदस्य झाला. त्याने आमच्या जीवाला लळा लावला. त्याच्या खेळण्या-बागडण्याने आमच्या घरात चैतन्य पसरले. आता लिओनंतर स्वप्नजाताईंनी मायलोला दत्तक घेतले आहे. त्याचे नामकरण त्यांनी मायलो वर्मा असे केले आहे. आता त्याच्यासोबतही स्वप्नजा ताईंचा वेळ छान जातोय.
बोरिवली येथील शिल्पा मुळ्ये म्हणाल्या, “कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच आपण एखादे चांगले काम करावे, एका मूक जनावराला कायमस्वरूपी डोक्यावर छत्र द्यावे अशी माझी खूप इच्छा होऊ लागली. त्यामुळे एका कुत्र्याच्या बाळाला मी दत्तक घेतले व ‘लासा अप्सो’ असे त्या ब्रीडचे नाव आहे. माझ्या काॅलेजात शिकणारा मुलगाही त्याची खूप काळजी घेतो.”
काही वर्षांपूर्वी आमच्या घराच्या अंगणात एक जखमी कोकॅटेल जातीचा पक्षी येऊन पडला. माझ्या मिस्टरांनी त्याची सेवा-सुश्रूषा केली. दाणा-पाणी घातले. नंतर माझा मुलगा व कुटुंबीयांनाही त्याचे प्रेम लागले. आता आमच्या शेजाऱ्यांनी पक्ष्यांसाठी बर्ड फीडर लावले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चालू असतो व पक्षी येऊन सूर्यफुलाच्या, भोपळ्याच्या बिया खातात.
मुंबईत मी काही परिचितांच्या घरात फिश टँक पाहते. मासेपालन, त्यांच्या टँकची साफसफाई, त्यांचे खाद्य-औषधे या गोष्टी व्यवस्थितपणे सुरू असतात. त्यातील अनेकांनी आपल्याला माशांच्या सहवासात शांत, प्रसन्न वाटत असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या टँकमधील चपळ हालचाली, उत्साह पाहून आपलेही मन प्रसन्न होत असल्याचे सांगितले. आता वैज्ञानिकदृष्ट्या हे सिद्ध झालं आहे की, पाळीव प्राणी ताण-तणाव कमी तर करतातच, शिवाय व्यक्तीचा एकटेपणा दूर करतात. ते तुम्हाला खेळण्यास, व्यायाम करण्यास प्रोत्साहित करू शकतात. तुमच्या हृदयाचेही आरोग्य सुधारू शकते. ऑक्सफर्ड ट्रिटमेंट सेंटरनुसार पाळीव-प्राण्यांमध्ये नैराश्य, तणाव, अस्थिरता कमी करण्याची व रुग्णांना आराम देण्याची क्षमता असते. प्राण्यांशी बोलण्यानं व्यक्तींमध्ये एंडोर्फिन वाढते व त्यामुळे आनंद वाढतो. एंडोर्फिन हे मेंदूचे रसायन आहे की जे शरीरातील वेदना व तणाव कमी करण्यास मदत करते. चिंताग्रस्त लोक, स्मृतिभ्रंश असलेल्या लोकांना पेट-थेरपीने भरपूर फायदा होत असल्याचे आढळून आले आहे.
माझी पुण्यातील मैत्रीण शिल्पा आवटे हिने दोन मांजरांची पिल्ले पाळली आहेत. त्यांच्या सहवासात घरातील कामे उरकताना वेळ कसा पटकन जातो ते समजत नाही असे ती म्हणते; परंतु हे तितक्याच जबाबदारीचे काम आहे असेही ती म्हणते; कारण कधी लोक आपल्या विविध वैयक्तिक कारणांमुळेही आपले पाळीव प्राणी रस्त्यावर सोडून देतात. मग या पाळीव प्राण्यांची अवस्था फार बिकट होते. तिच्या आजूबाजूच्या फिरण्याच्या क्षेत्रात भटकणारे पाळीव प्राणी तिला दिसले, तर ती सरकारमान्य किंवा बिनसरकारी प्राण्यांच्या संस्थांना फोन करून त्यांना आसरा देण्याचे काम करते. काही वेळा कुणी पाळून सोडून दिलेले प्राणी यांना ती आपल्या घरात ठेवून घेते व त्यानंतर समाजमाध्यमांवर आपल्या ओळखीच्या लोकांना कळविते; त्यातील पाळीव प्राणी पाळण्यास उत्सुक लोक तिच्याकडून हे प्राणी घेऊन जातात. या प्राण्यांना घर मिळवून दिले की, आपल्याला आंतरिक समाधान मिळते, असे ती म्हणते.
अनेक सोसायट्यांमध्ये पाळीव प्राणी पाळण्यावरून वाद होतात व काही प्राणीप्रेमी लोकांना यावरून जागाही बदलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे हा जबाबदारीचा निर्णय विचारपूर्वक घेणे केव्हाही योग्य ठरेल. आमच्या परिचयातील अंशुल दाभोळकर या मुलाने काही वर्षांपूर्वी एक हॅमस्टर दत्तक घेतला होता. त्याला एक डोळा नव्हता. भूतदया म्हणून त्याने मुद्दामच हे पाऊल उचलले होते. नंतर काही वर्षे तो हॅमस्टर अंशुल व त्याचे कुटुंबीय यांनी प्रेमाने सांभाळला. हॅमस्टर निवर्तला तरी अंशुलची भूतदया काही कमी झाली नाही. आता नोकरी सांभाळताना देखील तो रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खाणे घालतो.
हिंस्त्र प्राण्यांना देखील प्रेमाने सांभाळणारे डाॅ. प्रकाश आमटे यांची ख्याती भारतभर आहे. बिबट्या, तरस यांना बघूनच सामान्य माणूस भीतीने कापू लागेल, तिथे डाॅ. प्रकाश आमटे व त्यांचे सहकारी, मुले यांनी आगळा-वेगळा प्रयोग उभा केला आहे. हेमलकसाला भेट देऊन आलेले नागरिक हे सर्व पाहून अचंबित होतात. डाॅ. प्रकाश आमटे आपला नातू अर्णव याला देखील विविध प्राण्यांच्या सहवासात खेळण्यास उद्युक्त करतात. डॉ. प्रकाश आमटे यांनी वन्य प्राण्यांसाठी एक प्राणिसंग्रहालय बनविले आहे. या ठिकाणी अनाथ झालेल्या लहान प्राण्यांना ठेवले जाते. येथे अस्वल, बिबट्या, मगर अशी साठपेक्षा अधिक जातीची जनावरं राहतात. डाॅ. आमटे स्वतःच्या हाताने या प्राण्यांना खाऊ घालतात. अशी ही भूतदया निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची चांगली पद्धत आहे. आपण सर्वांनीच शक्य तोवर निसर्गाप्रती, प्राणीमांत्राविषयी भूतदया ठेवावी, जेणेकरून निसर्गाच्या ऋणाची आपल्याला काही अंशी तरी परतफेड करता येईल.
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…