- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
आरशाचे महत्त्व पुरातन काळापासूसन आहे. आरसा केवळ तुमचे प्रतिबिंब नाही, तर ओळख दाखवितो. आपला समाज हाही एकमेकांसाठी आरसा असतो. आपल्या जवळची व्यक्तीच आपली नकारात्मक प्रतिमा आपल्यासमोर उभी करतात. अशा प्रकारचा आरसा वेळीच झुगारून आपल्या गुणांवर विश्वास ठेवा.
आरसा! आजच्या जगात प्रत्येकाच्या घरातील एक आवश्यक वस्तू! प्रामाणिकपणाचा आदर्श! आरशाचा मुख्य उपयोग प्रतिबिंब पाहणे. मानवाने पाण्यात स्वतःबरोबर अनेक वस्तूंचे प्रतिबिंब पाहिले, त्यानंतर प्रथम पाण्यापासून काच, काचेपासून आरसा तयार झाला. १८३५ मध्ये जर्मन शास्त्रज्ञ वाॅन लिबीग यांनी सर्वप्रथम स्वच्छ काच घेऊन तिच्या एका बाजूला चांदीचा पातळ थर दिल्याने प्रतिबिंब बाहेर न जाता प्रतिमा दिसू लागली. त्यानंतर त्यात वैज्ञानिक सुधारणा होत, आरसा बनविण्याची प्रक्रिया विकसित झाली.
आरसा ही किमान एक परावर्तनशील पृष्ठभाग असलेली चमकदार वस्तू असते. परावर्तनाने वस्तूच्या प्रतिमा निर्माण करणाऱ्या कोणत्याही प्रकाशीय साधनाला ‘आरसा’ असे म्हणतात. विविध गुणधर्मांच्या आरशापासून मिळणाऱ्या प्रतिमांचा उपयोग रोजच्या व्यवहारांत, वाहनांत, छायाचित्रणात, फॅशन जगतात, वैज्ञानिक उपकरणांत… आणि मनोरंजन ही तर आरशाची वेगळीच दुनिया आहे.
आरशाचे महत्त्व पुरातन काळापासून आहे. श्रीरामांना आरशात चंद्राचे प्रतिबिंब दाखवून समजूत काढली होती. चितोडच्या महाराणी पद्मिनीचे सौंदर्य अल्लाउद्दिन खिलजीला आरशातच दाखविले गेले होते.
आरसा केवळ तुमचे प्रतिबिंब नाही, तर ओळख दाखवितो. कौस्तुभ आमटे प्रतिबिंबावर लिहितात, एके दिवशी ऑफिसच्या मुख्य दारावर चिकटवलेल्या कागदावर लिहिले होते, “कंपनीत तुम्हा सर्वांच्या प्रगतीमध्ये बाधा ठरत असलेल्या एका व्यक्तीचे काल निधन झाले आहे.” अंत्यदर्शनासाठी शवपेटी हॉलमध्ये ठेवली आहे. कोण असावे या विचारात एकेकजण शवपेटीत डोकावताच साऱ्यांनाच धक्का बसतो. शवपेटीत मृतदेहाच्या जागी ठेवलेल्या आरशांत स्वतःचेच प्रतिबिंब पाहतात. आरशाच्या खाली लिहिले होते, ‘तुमच्या प्रगतीचे वारू रोखण्याचे सामर्थ्य केवळ एकाच व्यक्तीत आहे, ती व्यक्ती म्हणजे तुम्हीच!’ जेव्हा तुम्ही स्वतः बदलता, तेव्हा तुमच्या खुंटलेल्या विचारांना नवी दिशा मिळते. तुमचे स्वतःशी असलेले नातेच महत्त्वाचे असते.
आपला समाज हाही एकमेकांसाठी आरसा असतो. आपल्या जवळची व्यक्तीच आपली नकारात्मक प्रतिमा आपल्यासमोर उभी करतात. अशा प्रकारचा आरसा वेळीच झुगारून आपल्या गुणांवर विश्वास ठेवा. राजीव तांबे लिहितात, “प्रत्येक गोष्टीपासून लांब राहून तरीही स्वच्छपणे पाहता यावे, समोरच्याला समजून घेता यावे, यासाठी प्रत्येकाच्या डोक्यात एक काच असते. काही माणसे स्वतःत इतकी गुरफटतात की, त्या काचेचा आरसा होतो. त्या आरशामुळे त्याला पलीकडचे काहीच दिसत नाही.” थोडक्यात आरशात नेमके काय पाहायचे हेच त्याला कळालेले नसते.
विवेकानंदांच्या वडिलांनी एके दिवशी नरेंद्रला आवाज देत त्याच्यासाठी आत भेट ठेवली आहे, असे सांगितले. आतल्या खोलीत कपाटाला लावलेल्या पूर्ण उंचीच्या आरशासमोर उभा राहताच तरुण नरेंद्रला स्वतःच्या शक्तिशाली इंद्रियाची ओळख झाली. ‘स्वतःचे आत्मनिरीक्षण करा’ ही आरशाची शिकवण वडिलांनी भेटीतून दिली.
गुरुगृही राहून शिक्षण पूर्ण झाल्यावर घरी जाताना गुरुजीने शिष्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व म्हणाले, “या दिव्य आरशात मानवी मनातले विचार प्रकट होऊन दिसतात.” शिष्याला आनंद झाला. त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांनी गुरुजींसमोर आरसा धरताच तो हबकला. काही न बोलता गावी घरी गेल्यावर आई-वडिलांनंतर इतर लोकांसमोरही तो आरसा धरला. शिष्याच्या मनात आले, ज्या गुरुजींना, आई-वडिलांना आपण ईश्वर मानतो, तेही मानवी विकारापासून (राग, लोभ, द्वेष…) पासून सुटले नाहीत. हे लक्षात येताच गुरुगृही येऊन तो आरसा परत करीत गुरुजींना म्हणाला, “तुम्ही दिलेल्या आरशात प्रत्येकात मला दुर्गुणच दिसले.” गुरुजी म्हणाले, “वत्सा! या आरशात तू स्वतःला पाहून सुधारावे यासाठी मी तुला आरसा दिला होता. आरशाचा उपयोग स्वतःला पाहण्यासाठी करतात, ही माणसाची मूळ प्रवृत्तीच तू विसरलास. मानवाची कमजोरी ही की तो स्वतःऐवजी दुसऱ्याविषयी जास्त जाणून घेण्यात वेळ घालवितो. त्याऐवजी तू स्वतः सुधारला असता तर!”
मन हा एक आरसा आहे. तो निर्मळ व स्वच्छ असेल तर सारे जग तुम्हाला सुंदर दिसेल. कोणताही दुजाभाव न ठेवता जे समाजात सत्य आहे ते तसेच्या तसे मांडणे हेही आरशाचे एक महत्त्वाचे काम होय. हे काम लोकशाहीचा चौथा स्तंभ वृत्तपत्र, साहित्य, चित्रपट करतात, म्हणून याला ‘जगण्याचा आरसा’ म्हणतात.
आपण ज्या आरशाच्या दुनियेत जगतो ते वाचलेले अनुभव
१. एकदा मैत्रिणीबरोबर ‘दिलासा’ या वृद्धांच्या माहेरघरात अनेकांशी बोलताना एका आजीने माझा हात हातात घेत मला विचारले, “कशी दिसते गं मी? किती दिवसांत आरशात बघितलेच नाही…” मला काय बोलावे हेच कळेना! समजायला लागल्यापासून स्वतःला आरशात बघायला उत्सुक असलेली मी… आपल्या दिसण्यावर सद्सद्विवेकबुद्धी हरवून बसले होते. आजीने तिच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यात मला जागे केले नि मी माझा विचाराचा आरसा शोधू लागले.
२. अनेक वर्षे श्रीमंत गाड्यांच्या दुकानातील अनुभवी विक्रेता नव्याने भरती झालेल्या विक्रेत्याला काही अनुभव सांगतो. चांगले कपडे, सुस्थितीतले गिऱ्हाईक येताच आपण त्यांना पेप्सी, कॉफी विचारतो. बरेच वेळा थोड्या काळासाठी थंड हवा खाण्यासाठी हे येतात. पण जर धोतर-कुर्ता घातलेला साधा माणूस आत येताच विक्रेता विशेष रस दाखवत नाही. अशीच माणसे गाडी घेऊन जातात. त्यांच्या खिशात नोटांची थप्पी असते.
३. आजची तरुण मुले वरवरच्या रंगढंगाला भुलून त्यांच्या आदर्शांची नक्कल करण्यात गुंतात. पण मोठमोठ्या गप्पा न मारणारे, भपका-दिखाऊपणा नसलेले, चांगले मन, समतल बुद्धी, शांत, कदाचित इंग्रजी उच्चार शुद्ध नसतील, पण यांचीच सोबत भरवशाची असते.
४. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी स्वतःचा पैसा खर्च न करता आजचे तरुण वाट पाहतात. कंपनी आपली कधी सोय करते. पण स्वतःचे कपडे, मोबाइल, मासिक सौंदर्य प्रसाधने यासाठी भरपूर खर्च करतात. पण प्रशिक्षण, ती माझी जबादारी नाही. यावरने आपल्या जगण्याचा आरसा कोणता? हे प्रत्येकाने ठरवावे.
झेन गुरू म्हणतात, आरसा आपले प्रतिबिंब स्वीकारतो. स्वीकारणं हा आरशाचाच स्थायीभाव आहे, पण तिरस्कार करीत नाही. म्हणून माणसाचं मन आरशासारखं असावं.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra