Tuesday, July 23, 2024
Homeसाप्ताहिककोलाजKonkan : कथा आदित्य सूर्यनारायणाची...

Konkan : कथा आदित्य सूर्यनारायणाची…

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

कोकणात एकेकाळी सौरपंथ प्रचलित होता व सूर्योपासना सुरू होती, हे कोकणात असणाऱ्या प्राचीन चौदा सूर्यमंदिरांवरून सिद्ध होते. कोकणातील आजच्या लोकजीवनात अनुभवायला व ऐकायला मिळणारे हे सूर्योपासनेचे धागे अभ्यासून कोकणातील समृद्ध सौरपरंपरा अभ्यासण्याची गरज आहे. भारतीय प्राचीन लोकसंस्कृतीचे, सूर्यपूजेचे प्रतिबिंब कोकणच्या लोकसंस्कृतीत आढळते.

परुळे येथील ऐतिहासिक देवस्थान म्हणजे श्री देव आदिनारायण. हे मंदिर सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वीचे आहे. जगातील केवळ दोन प्राचीन सूर्यमंदिरांपैकी एक म्हणजे श्री देव आदिनारायण मंदिर होय. मूर्ती व देवालय पश्चिमाभिमुख आहे. ही मूर्ती काळ्या पाषाणातील आहे. ऋग्वेदातील उल्लेखानुसार तो आकाशात असेपर्यंत प्रकाशमान, शक्तिमान म्हणून जगातील सर्व आदिम व प्राचीन संस्कृतीत सूर्याला ‘देवत्व’ प्राप्त झालं आहे. अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोकणात सूर्योपासना प्रचलित होती, याचं खरं तर नवल वाटावं. ग्रामदेवतांची भक्ती करणारा प्राचीन यक्ष, परंपरेची उग्र उपासना करणारा रवळनाथ, सातेरी, वेताळ, विठ्ठल, गणपती व महिषासुरमर्दिनी अशा विविध रूपांतील देवीची उपासना करणाऱ्या कोकणात एकेकाळी सौरपंथ प्रचलित होता व सूर्योपासना सुरू होती, हे कोकणात असणाऱ्या प्राचीन चौदा सूर्यमंदिरांवरून सिद्ध होते.

देवांचे वाहन रथ आहे. त्यामुळे रथसप्तमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. प्रशस्त सभामंडप, सुसज्ज भक्तनिवास अशी व्यवस्था देवस्थानने केली आहे. इथे नेहमी भाविकांची वर्दळ असते. एक कहाणी आहे, आदित्य राणूबाईची! श्रावणमासी आदित वारी मोन्याने उठावे, सचैल स्नान करावे, अग्रोदक पाणी आणावे, नागवेलीच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी. सहा वेदांचे मंडळ करावे. सहा सुतांचा तंतू करावा. त्यास गाठी द्याव्या. पान, फूल वाहावे. पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ-खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा. सहा मास पाळावे. माघी रथसप्तमी संपूर्ण करावे. घरासमोरच्या अंगणात गोवऱ्यांचा विस्तव करून त्यावर मातीच्या बोळक्यात दूध ऊतू घालवून सूर्यदेवास नैवेद्य दाखविणे. संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत प्रत्येक हिंदू घरांमध्ये भरजरी वस्त्रांनी व सुवर्णालंकारांनी नटलेल्या सुवासिनी व त्या साजरा करत असलेला हळदीकुंकू समारंभ, रथसप्तमीला पाटावर काढल्या जाणाऱ्या सूर्याच्या प्रतिमा यातून सूर्यदेवाप्रतीची भक्ती दिसून येते. यातून सिंधुदुर्गासह कोकण व महाराष्ट्रात सूर्योपासनेची प्रचिती अजूनही दिसून येते.

आरवलीचा आदित्य नारायण, कशेळीचा कनकादित्य, कयळघे येथील आदित्यनाथ, नेवरे येथील आदित्यनाथ, माखजन येथील आदित्य नारायण, परुळे येथील आदिनारायण, आजगाव येथील आदित्यनाथ, सातार्डे येथील आदित्यनाथ, खारेपाटण येथील कपिलेश्वर मंदिरातील नितांत सुंदर आदित्यनाथाची मूर्ती, मुरुड व कुर्धे येथील सूर्यमंदिरे ही कोकणातील सूर्योपासनेची परंपरेची मूर्तिमंत प्रतीकं आजतागायत पाहायला मिळतात.

वेंगुर्ले तालुक्यात परुळे गावात आदिनारायणाचं मंदिर आहे. ते सामंत परिवाराचं कुलदैवत समजलं जातं. हे मंदिर साडेसातसशे वर्षांचा इतिहास सांगतं. कोकण आख्यानात या देवाचा उल्लेख कनकादित्य आणि आदिनाथ या नावाने आहे. कोणार्क येथील सूर्यमंदिराच्या शिल्पाप्रमाणे हे शिल्प आहे. सात घोड्यांवर उभी असलेली, गळ्यात तमविहार, दंडाला बाहुभूषण, कमरेला मेखला, डोक्यावर मुकुट, कानात मकरकुंडलं, पुढील भागी गुडघ्यापर्यंत लागणारा तिला घोस अशा अलंकारांनी सजलेली अशी या पश्चिमाभिमुखी सिंधुसागरात मावळणाऱ्या सूर्याचा साक्षीदार अशी मूर्ती परुळे येथे आहे. येथे रथसप्तमीला मोठा उत्सव साजरा होतो. अशा या सूर्यनारायणाचा प्रवास जटिल, मात्र मनाला आनंद देणारा आहे. या मातीत त्याचं अवतरलेलं जगद्व्याप्त रूप मनास चकीत, मोहीत करतं व नतमस्तक व्हायला लावतं. ‘कोकणचा सांस्कृतिक इतिहास’ या ग्रंथात भालचंद्र आकलेकर यांनी कोकणात १४ प्राचीन सूर्य मंदिरे असल्याचे म्हटले आहे. कुंतीला सूर्यापासून कर्ण झाला ही कथा महाभारतात आपण ऐकली आहेच. सूर्याचे वडील कश्यप व आई अदिती तर अश्विनीला त्याची पत्नी मानले जाते. अश्विनीपासून त्यास यम, यमी, अश्विनीकुमार व शनी अशी चार मुले असल्याचे मानले जाते. वेदकाळापासून भारतात सूर्योपासना अस्तित्वात असली तरी सूर्य मंदिरांची संख्या मात्र खूपच कमी आहे. सूर्याची मूर्ती देवघरातही आढळत नाही. सातव्या शतकात होऊन गेलेल्या मयूर कवीने सूर्यशतक लिहिले आणि त्याच्या दुःखाचे निवारण झाल्याचा दाखला दिला जातो. कृष्णपुत्र सांब याला कृष्णाने ‘तुला कुष्ठरोग होईल’ असा शाप दिला. त्याने सूर्याची स्तुती आणि भक्ती केल्यावर त्याचा कुष्ठरोग बरा झाला असे वर्णन येते. यावरून भारतात सूर्योपासना फार प्राचीन काळापासून असल्याचे दिसते. वेदोत्तर काळात विष्णूचे महत्त्व वाढत गेले आणि सूर्योपासना क्षीण होत गेल्याचे दिसते. असे असले तरी कोकणात अस्तित्वात असणाऱ्या सूर्य मंदिरांवरून कोकणातही सूर्योपासना केली जाते यावरून कोकणचे वेगळेपण आपल्या नजरेत भरते.

कोकणातील सूर्य मंदिरांतील सूर्यमूर्तींचे कनेक्शन गुजरातशी संबंधित असल्याचे दिसते. आजगाव येथील आदित्यनाथाच्या मंदिरातील मूर्ती ही रेड्डी गावच्या एका कोळी बांधवाला समुद्रात मासे पकडताना जाळ्यात सापडली होती. त्याला झालेल्या दृष्टांतानुसार तिची प्रतिष्ठापना झाल्याचे सांगितले जाते. कोकणातील आजच्या लोकजीवनात अनुभवायला व ऐकायला मिळणारे हे सूर्योपासनेचे धागे अभ्यासून कोकणातील समृद्ध सौर परंपरा अभ्यासण्याची गरज आहे. भारतीय प्राचीन लोकसंस्कृतीचे सूर्यपूजेचे प्रतिबिंब कोकणच्या लोकसंस्कृतीत आढळते, हे कोकणास भूषणावह आणि समृद्ध कोकणाचे दर्शन घडवणारे आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -