रेडिमेड नऊवारी साड्यांचे माहेरघर : ‘साडीघर’

Share

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

साऱ्यांचा व्यवसाय समर्थपणे सांभाळणाऱ्या सुना ही महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेचा एक भाग बनली आहे, सोनल राऊत. ‘साडीघर’च्या राजन राऊत यांची सून. आजच्या घडीला सोनल नऊवारी, ब्राह्मणी, पेशवाई, शाही मस्तानी यांसारख्या साड्या ग्राहकांच्या मागणीनुसार पुरवते. रेडिमेड नऊवारी साड्या योग्य त्या मापात आपल्या युनिटकडून शिवून देते तसेच गौरीच्या नऊवारी साड्या, गौरीचे मुखवटे, गौरीच्या बाळांचे कपडेसुद्धा ग्राहकांना उपलब्ध करून देते. उत्सवाच्या हॅपनिंग माहोलमध्ये तसेच लग्नसराईच्या दिवसांत साडीघरची धुरा अगदी समर्थपणे सांभाळणाऱ्या सोनलला व्यवसायात यायचंच नव्हतं. तिचा जन्म दादरचा. तीन पिढ्याचा फळांचा व्यवसाय करणारे दादरच्या दत्ता नाईक आणि संगीता नाईक यांची कन्या सोनल. लहानपणापासून व्यवसायातील चढउतार आणि त्याचा कुटुंबावर होणारा परिणाम सोनलने जवळून पहिला होता. सीझनमध्ये चालणारा व्यवसाय, व्यवसायातील कामाच्या वेळा हे तिने घरी अनुभवलं असल्यामुळे व्यवसायाच्या वाट्याला जायचं नाही, हे तिचं मनाशी पक्कं झालं होतं. आलं तर तुपाशी नाहीतर उपाशी असं तिला वाटत होते. शालेय शिक्षण दादरच्या साने गुरुजी शाळेमधून, तर कीर्ती कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून सोनलने एका कंपनीत नोकरी सुरू केली. कॉलेज शिकताना सोनलने हौस म्हणून ‘मुलगी वयात येताना’, ‘महाराष्ट्राचं चांगभलं’, ‘आम्हीच जिंकणार’ या प्रायोगिक नाटकांमधून सुद्धा काम केले.

दरम्यानच्या काळात सोनलची ओळख ‘साडीघर’च्या राजन राऊत यांच्याशी झाली. राजन राऊत हे सोनलच्या वडिलांचे मित्र. सोनलची बोलण्यातील हुशारी बघून राजन राऊत यांनी तिला अधूनमधून ‘साडीघर’मध्ये येण्यास सांगितले. साडीघरमध्ये सोनलची भेट गौतमसोबत झाली. गौतम हा राजन राऊत यांचा मुलगा. दोघांची मैत्री झाली आणि घरच्यांच्या सहमतीने २०१५ मध्ये लग्न झाले. गौतम इंजिनीअर आहे; पण तो फमिली व्यवसाय सांभाळतो. लग्नानंतर सोनलने तिची नोकरी चालू ठेवली. गरोदर राहिल्यावर सोनलने नोकरीतून ब्रेक घेतला. घरी बसून कंटाळा येत असल्याने साडीघरमध्ये यायला सुरुवात केली. त्याच सुमारास साडीघरमध्ये खूप वर्षांपासून काम करणारी एक मुलगी नोकरी सोडून गेली. त्यामुळे थोडा वेळ येणारी सोनल पूर्ण वेळासाठी साडीघरमध्ये येऊ लागली. सोनलचा व्यवसायातील इंटरेस्ट पाहता, “आता पुन्हा नोकरी न करता तूच आपला व्यवसाय बघायला सुरुवात कर” असे गौतमने सुचवले.

त्यानंतर सोनल आणि ‘साडीघर’ हे एक समीकरण बनलं. ते आजही कायम आहे. दादरच्या रानडे रोडवर साडीघर गेली ७५ वर्षे कार्यरत आहे. या दुकानात वर्षभर नऊवारी, ब्राह्मणी, पेशवाई, शाही मस्तानी या साड्यांना खूप मागणी असते. गेले ७५ वर्षे साडीघरमध्ये गौरीच्या नऊवारी तर मिळत आहेतच. तसेच गौरीचे मुखवटे ही त्याची खासियत आहे. वर्षाचे बाराही महिने गौरीचे मुखवटे साडीघरमध्ये मिळतात. याची खासियत म्हणजे संपूर्ण मूर्ती ही एकाच लाकडातून तयार केलेली असते. या मूर्तीची मागणी अगदी भारताबाहेर देखील आहे. अडीच इंचापासून आठ फुटांपर्यंत गौरीची मूर्ती इकडे मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे गौरीच्या बाळाचे देखील कपडे यांच्याकडे मिळतात. सोनलने साडीघरमध्ये येण्यास सुरुवात केल्यावर आपण ग्राहकांना काय वेगळे देऊ शकतो? याचा विचार करू लागली. सोनल सांगते, “आमचा व्यवसाय गौरी गणपती, लग्नसराई या दिवसात खूप चालतो. पण दिवाळीमध्ये आम्हाला थोडा आराम असतो. त्यावेळेस मी लहान मुलींच्या रेडिमेड साड्या, मुलांसाठी रेडिमेड धोतर असे कपडे मार्केटमध्ये आणले. अगदी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे. या कपड्यांचे डिझाईन मी स्वतः केले आहे. ‘साडीघर’चे स्वतःचे वर्कशॉप डहाणू आणि माहीममध्ये आहे. स्वतःचे प्रोडक्शन असल्याने युनिटकडून हवे तसे डिझाईन करून घेता येते. शिवाय अगदी महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा किमतीमध्ये देता येतं. डहाणूच्या काही आदिवासी महिलांना रोजगार देखील या सगळ्यातून मिळत आहे.

‘साडीघर’चा स्वत:चा असा एक इतिहास आहे. सोनल सांगते, “सुरुवातीला साडीघरचे नाव होते अरविंद स्टोअर्स. या दुकानात सायकल आणि नवीन ट्रंका विकल्या जायच्या. त्या काळी भांड्यांचं प्रस्थ मोठंच होतं. लग्नात हंडा-कळशी वा टाकी देणं मानाचं समजलं जाई. अगदी ताट, वाटी, ग्लास, चमचे, कुंकवाचा करंडा असा पाच भांड्यांचा आहेरसुद्धा मानाचा समजला जाई. त्यावेळी सिलोवर कंपन्यांची भांडी प्रसिद्ध होती. त्याची एजन्सी दादोबा ठाकूर यांच्याकडे होती. त्यांच्याकडून अरविंद स्टोअर्समध्ये भांडी यायची. त्या काळात असं गमतीने म्हटलं जायचं की, राऊतांकडच्या भांड्यांचा आहेर म्हणजे लग्नाचा आहेर. त्या जमानातल्या अनेक मराठी कलावंतांनी त्यांच्याकडून भांड्याची खरेदी केलेली आहे. दरम्यानच्या काळात खूप बदल झाला होता. निव्वळ भांडी विकून दुकान उत्तम चालेल, असं नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी साड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांचा एक गुजराती भागीदार होता. निव्वळ २ टक्के नफ्यामध्ये ते साड्या विकत. अक्षरश: दादर स्टेशनपर्यंत साड्या खरेदी करण्यासाठी रांग लागायची. ६ रुपयांपासून साड्यांची किंमत सुरू व्हायची. सगळ्यात महागडी साडी १३ रुपये ७५ पैशांची होती. या साड्यांमध्ये काही साड्या खराब निघायच्या. या खराब साड्यांचं करायचं काय हा एक यक्षप्रश्नच होता. त्यावेळी राजन राऊत यांचे भागीदार पुण्याला गेले. तिथे साड्या बांधल्या जायच्या. ते तंत्र त्यांनी जाणून घेतले. ते तंत्र आपल्या दुकानातील कर्मचाऱ्यांना शिकवले.”

या दरम्यान राजन राऊतांचा मुलगा गौतम ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग शिकत होता. व्यवसायाची आवड होती, पण साड्यांच्या दुकानात त्याला तितकासा रस नव्हता. त्याला उलट ड्रायफ्रूट्सच्या दुकानात जास्त रस होता. १९९७ साली मात्र राजन राऊत यांचा दुर्दैवी अपघात झाला. त्यानंतर गौतम दुकान सांभाळू लागला. गिऱ्हाईके यायची आणि नऊवाऱ्या साड्या मागायचे. आपल्या दुकानात नऊवाऱ्या साड्या का नाहीत, हा प्रश्न त्याला पडला. काहीतरी वेगळं करावं या उद्देशाने रेडिमेड नऊवारी साडी विकायचा विचार केला. पहिली साडी त्याने सकाळी १०.३० वाजता शिवायला घेतली ती रात्री ९.३० वाजेपर्यंत त्याने शिवली. हा त्याचा पहिलाच अनुभव. त्याच्या मेहनतीला रंग आला. कल्याणच्या एका व्यापाऱ्याने २६ रेडिमेड साड्यांची ऑर्डर दिली. इथे एक वेगळी सुरुवात झाली. दुकानाचा कायापालट झाला. ‘साडीघर’ नावाचं महिलांच्या हक्काचं साड्याचं माहेरघर सुरू झालं. एका मशीनपासून सुरू झालेला हा प्रवास २२ मशीनपर्यंत पोहोचला. दादरच्या रानडे रोडवर ‘साडीघर’ नावाच्या या दुकानात माहीम, डहाणू येथील कारखान्यांमधून अंदाजे ३० कामगार कार्यरत आहेत. सचिन तेंडुलकरने ३५ शतकांचा विक्रम केला. त्यानिमित्त मराठी पत्रकारांनी त्याचा सत्कार केला होता. त्यासाठी साड्या आणि मराठी पेहराव ‘साडीघर’ने पुरविल्या होत्या. भारताच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त मोठा महोत्सव लाल किल्ल्यावर पार पडलेला. त्या कार्यक्रमात ‘स्वामी समर्थ व्यायाम मंदिर’च्या मुलींनी ‘साडीघर’च्या रेडिमेड नऊवारी साड्या नेसून आपले कौशल्य सादर केले होते. राष्ट्रपती भवनात मॉरिशसच्या मुलांनी आपली कला सादर केली होती. त्यांचे पेहराव साडीघरने डिझाईन केले होते. आता ‘साडीघर’ पगड्यांच्या निर्मितीमध्ये उतरले आहेत. विविध पौराणिक चित्रपट, मालिका, नाटक यांमध्ये वापरले जाणारे बहुतांश पगडी, साड्या या साडीघरातून पुरविल्या जातात.

गौतम राऊत हा साडीघरच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे. त्याला त्याची पत्नी सोनल यादेखील तेवढ्याच समर्थपणे साथ देत आहे. रानडे रोडवरून चालताना डाव्या बाजूस गौरीचे मुखवटे लक्ष वेधून घेतात. दिसायला छोट्या असणाऱ्या या दुकानाची कीर्ती अगदी सातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. मराठी माणसं व्यवसाय करू शकतात, तो विस्तारू शकतात आणि सातासमुद्रापार नेऊ शकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘साडीघर.’ खरं तर ‘साडीघर’ने मराठी संस्कृती सातासमुद्रापार नेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोनल साडीघरचा वारसा अगदी समर्थपणे सांभाळत आहे. त्यामुळेच तर ती ‘लेडी बॉस’ ठरली आहे.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

2 hours ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago