चोर आणि दरोडेखोरांची टोळी आज जळगावात
नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार
कणकवली : महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडेखोर, त्याच्याबरोबर खिचडीचोर आणि खंबाटा कामगारांना देशोधडीला लावणारा चोर हे सगळे चोर आणि दरोडेखोर आज एकत्र जळगावच्या दौर्यावर आहेत आणि तिथे शासनाच्या आदेशांच्या विरुद्ध शेंबड्या मुलांसारखं नाक रगडायला जाणार आहेत, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठा गटावर केली. कणकवली येथील पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा (Uddahv Thackeray) समाचार घेतला.
ज्या शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी करावं तिथे हे शेंबड्या मुलांसारखं ‘आम्ही आम्ही’ करायला तिथे जाणार आहेत. उद्धव ठाकरे आणि टोळीला दुसर्यांच्या बारशामध्ये जाऊन स्वतःची नावं लावण्याची पहिल्यापासून सवय आहे. त्यांचे स्वतःचे कार्यक्रम संपलेले आहेत, त्यामुळे दुसर्यांच्या घरात काय चाललंय यावरच यांचे कार्यक्रम ठरतात, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.
राज्याचा मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रशासन आणि प्रोटोकॉल्स कळत नाही का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेत स्वतः बिघाड करायचा आणि मग उगाच आदरणीय गृहमंत्र्यांच्या नावाने बोंबलत बसायचं, हेच या टोळीचं काम आहे. मुख्यमंत्री होते त्यावेळेस शेतकर्यांकडे पाहिलं देखील नाही आणि त्यादिवशी शेतकर्यांच्या बांधावर गेले. यांनी फक्त गळ्यात पट्टा लावून लोकांची सहानुभूती मिळवली. त्यादिवशी देखील पावसात भिजले होते, आता हे खरंच पावसात भिजलेले की बाजूना जाऊन संजय राऊतने यांच्यावर बिसलेरी ओतली होती, हे अजूनपर्यंत कळलेलं नाही. या नौटंकीवाल्यांना महाराष्ट्राची जनता चांगलीच ओळखते, असं नितेश राणे म्हणाले.
यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवा
जी-२० परिषदेबद्दल आज सामना पेपरमध्ये रोखठोक लिहिलेलं आहे. ज्या जी-२० मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या पंतप्रधानानांनी देशाला कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलंय, हे समजतंय, सर्व देशांचे प्रतिनिधी भारताचं कौतुक करत आहेत, पण संजय राऊतची यात देखील पाकिस्तान आणि चीनच्या एजंटसारखी भाषा आहे. राहुल गांधी युरोपमध्ये जाऊन चीनचं कौतुक करतात तीच भाषा संजय राऊत वापरतो. म्हणजे हे पाकिस्तान आणि चीनचे एजंट आहेत आणि भारताचं काहीही चांगलं झालेलं यांना बघवत नाही. त्यावरही टीकाच करायची असते. म्हणून यांच्यावर देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
खरे मतदार अजितदादांमागे
अजितदादांच्या शक्तिप्रदर्शन दौर्याबद्दल नितेश राणे म्हणाले की, राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादांना मोठं समर्थन आहे. मला विश्वास आहे की पुण्यापासून ते कोल्हापूरपर्यंत जे राष्ट्रवादीला मानणारे खरे मतदार आहेत, ते ठामपणे अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीमागे उभे राहतील आणि महायुतीला पुन्हा एकदा आशीर्वाद देतील.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra