
- सुनीता नागरे, संस्थापक अध्यक्ष, अभिषेक सामाजिक व शैक्षणिक संस्था
मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते? त्यामुळे काही त्रास होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक मुलीला असते. या लेखात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
स्त्री (मुलगी) वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास जो रक्तस्राव होतो, त्याला मासिक पाळी (Menstrual cycle/ एमसी) असे म्हणतात. मुलगी साधारणपणे १२-१३ वर्षांची झाली की, मासिक पाळी सुरू होते. कधी कधी या अगोदरही सुरू होऊ शकते. दर महिन्याला एक स्त्रीबीज बिजाडांतून पक्व होऊन बाहेर पडते. त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आच्छादन ही तयार केले जाते. योग्य काळात स्त्री व पुरुषाच्या वीर्यातील पुरुषबीज व स्त्रीच्या गर्भाशयातील स्त्रीबीज यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो. पण ज्यावेळी हे स्त्रीबीज फलित होत नाही, त्यावेळेस फलित न झालेल्या बिजासहित आच्छादन बाहेर टाकले जाते. ते रक्ताच्या स्वरूपात योनी मार्गाद्वारे बाहेर टाकले जाते म्हणून हा रक्तस्राव होतो.
आदिवासी बांधव हा जंगलचा राजा असूनसुद्धा आज उपेक्षितांचे जीवन जगतो. त्यामुळे आपण समाजाचा देणे लागतो. या अानुषंगाने आपणसुद्धा समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, या उद्देशाने सध्या अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्था ही महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या मुख्यतः आदिवासी मुलांचे शिक्षण आणि महिलांच्या आरोग्यावर विशेष काम करते.
नाशिक जिल्ह्यातील अनेक आदिवासी शाळांमध्ये आदिवासी मुलींसाठी मासिक पाळी, गुड टच बॅड टच या विषयांवर मुलींमध्ये जनजागृती कार्यक्रम राबवतो. जेव्हा मी नाशिकच्या शाळेमध्ये भेटी देते, तेव्हा असे लक्षात येते की, मुलींमध्ये मासिक पाळी आणि स्वच्छतेविषयी जागरूकता नाही. त्यासाठी प्रत्येकाने मासिक पाळी व स्वच्छतेविषयी अवेअरनेस प्रोग्राम राबवावे जेणेकरून त्या मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल आणि त्या न घाबरता, न लाजता ताठमानेने मासिक पाळीविषयी इतरांनाही सांगतील. त्यामुळे मासिक पाळीबद्दल न्यूनगंड न बाळगता खुलेआम चर्चा होणे गरजेचे आहे.
आपल्या घरातील मुलींसोबत मोकळेपणाने बोलायला हवे. शरीरात होणाऱ्या या बदलामुळे बरेचसे प्रश्नही मनात येऊ शकतात. मासिक पाळी म्हणजे काय? ती का येते? त्यामुळे काही त्रास होतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येक मुलीला असते. या लेखात अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. तुम्ही अनुभवत असलेली सर्व परिस्थिती, त्याची कारणे आणि तिच्याशी सामना कसा करावा लागतो. यामध्ये मासिक पाळीवेळी होत असलेला शारीरिक बदल कसा हाताळावा? याचे मार्गदर्शन आमची संस्था करते. सातत्याने मुंबईसह आदिवासी पाड्यांमध्ये सॅनेटरी पॅड वाटप व मासिक पाळीविषयी आदिवासी महिलांना मार्गदर्शन करते.
आदिवासी मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल आजही जागरूकता नाही. आज मासिक पाळी येण्याचा वयोगटात सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे.मासिक पाळी आजकाल वयाच्या बाराव्या वर्षांपासून काही मुलींना येते. एवढं कमी वय असताना मासिक पाळी कशी येते? का येते? आल्यावर आपण काय करायला पाहिजे याबद्दल त्यांना अजिबात ज्ञान नाही! खरं बघितलं तर प्रत्येकाच्या मुलांच्या पाल्यांनी याविषयी मुलींना घरी ज्ञान देणे गरजेचे आहे; परंतु असं होताना दिसत नाही. मग शाळेत आल्यानंतर अचानक विद्यार्थ्यांनींना जेव्हा पाळी येते, तेव्हा त्या मुली अक्षरशः धांदावलेल्या अवस्थेत असतात. त्या क्षणी त्यांना काय करावं सुचत नाही, आपल्या समाजात मासिक पाळीविषयी कोणीही मन मोकळेपणाने बोलत नाही. मासिक पाळीमध्ये आजही मुली, महिला कपडा वापरताना दिसतात; परंतु कपडा त्यांच्या शरीरासाठी किती धोकादायक आहे, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नाही.
मुलींना मासिक पाळीच्या दिवसांत त्यांची तपासणी करणे, सर्विकल कॅन्सर व इतर त्वचा रोगांपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो, कशी आपली काळजी घेऊ शकतो? या सर्व गोष्टींची माहिती मुलींना देणे खूप गरजेचे आहे. शाळेमध्ये सॅनिटरी पॅड वापरण्यासाठी मुलीसाठी सॅनिटरी वेंडिंग मशीन आणि शौचालय वेगळे असणे खूप गरजेचे आहे.
आपल्या देशामध्ये सुमारे ६० कोटी महिला असून त्यातील सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. त्यातील फक्त पंधरा टक्के मुली व महिलाच सॅनिटरी पॅड वापरत असून अजून सुमारे ८५ टक्के महिला अजूनही सॅनिटरी पॅड वापरत नाही. परिणामी दरवर्षी कित्येक महिलांना सर्विकल कॅन्सरसारखे आजार होतात. २५ टक्के मुली मुलींची शाळेत गैरहजेरी लागते. मासिक पाळी स्वच्छता ही काळाची गरज आहे आणि सॅनिटरी पॅड ही महिलांसाठी मुलींसाठी विलासी गोष्ट नसून मूलभूत गरज आहे. अभिषेक शैक्षणिक व सामाजिक संस्थेमार्फत २००० महिलांसाठी मोफत सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले जाते.
प्रत्येक ग्रामीण व आदिवासी शाळांमध्ये मुलींसाठी मासिक पाळी व बॅड टच गुड टच यासाठी अवेअरनेस प्रोग्राम राबविले गेले पाहिजे. छोट्या मुलींमध्ये मासिक पाळीबद्दल व मासिक पाळीमध्ये घ्यावयाच्या स्वच्छतेबद्दल व पाळीमध्ये वापरलेले सॅनिटरी पॅड याची विल्हेवाट कशी लावायची या सर्व गोष्टींची जागरूकता प्रत्येक शाळेमध्ये केली पाहिजे.
शासनाने प्रत्येक शाळांमध्ये डिस्पोजेबल वेंडिंग मशीन लावून दिला पाहिजे, त्याचप्रमाणे प्रत्येक शाळेमध्ये मुलींसाठी सॅनिटरी पॅड व पॅडसाठी लागणारी आर्थिक तरतूद करून दिली पाहिजे. प्रत्येक ग्रामीण भागातील आदिवासी व तळागाळामधील महिला व मुलींसाठी आरोग्य म्हणजेच मासिक पाळी अवेअरनेस कार्यक्रम वेळोवेळी राबविले गेले पाहिजे.