
ब्राझीलकडे पुढील अध्यक्षपदाची सुत्रे सुपूर्द
नवी दिल्ली : भारताकडे अध्यक्षपदाची जबबादारी असलेल्या भव्य जी-२० परिषदेचा (G20 Summit 2023) आज समारोप झाला. या परिषदेसाठी दिल्ली येथे जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती तसेच जवळपास १,००० विदेशी पाहुणे सहभागी झाले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) या परिषदेचा समारोप करताना 'एक भविष्य' (One Future) या विषयावर चर्चा केली आणि समारोपाची घोषणा केली. यावेळेस पंतप्रधानांनी जागतिक शांततेचा संदेश दिला आणि १४० कोटी भारतीयांच्या शुभेच्छांसह सर्वांचे आभार मानले.
समारोपाची घोषणा करताना पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी सर्व नेत्यांना पुन्हा एकदा व्हर्च्युअल माध्यमातून भेटण्याचे आणि या बैठकीत घेतलेल्या निर्णयांचा आढावा घेण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'तुम्हा सर्वांना माहिती आहे की, नोव्हेंबरपर्यंत जी-20 च्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताकडे आहे. अजून अडीच महिने बाकी आहेत. या दोन दिवसात तुम्ही सर्वांनी अनेक गोष्टी इथे मांडल्या, सूचना दिल्या, अनेक प्रस्ताव आले. त्या प्रस्तावांना गती कशी मिळेल, हे पाहणे आपली जबाबदारी आहे. आपण नोव्हेंबरच्या शेवटी जी-२० चे आणखी एक व्हर्च्युअल सत्र आयोजित करू आणि त्या सत्रात या शिखर परिषदेदरम्यान ठरलेल्या विषयांचा आढावा घेऊ.'
समारोपाची घोषणा
परिषदेच्या शेवटी पंतप्रधानांनी जी-२०चे पुढील वर्षाचे अध्यक्षपद सांभाळणार्या ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याकडे पुढील सुत्रे सुपूर्द केली. ‘युअर हायनेस, एक्सीलेंस यासोबतच मी जी-२० शिखर परिषदेच्या समारोपाची घोषणा करतो. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्याचा आनंददायी असावं. स्वस्ति अस्तु विश्वस्य म्हणजे संपूर्ण जगात आशा आणि शांती असावी. १४० कोटी भारतीयांकडून शुभेच्छांसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार,' असा संदेश मोदींनी यावेळी दिला.