Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBollywood song : शीशा हो या दिल हो...

Bollywood song : शीशा हो या दिल हो…

  • नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे

दिग्दर्शक जे. ओम. प्रकाश यांच्या १९८०ला आलेल्या सिनेमाचे नाव जरी “आशा” होते तरी ती मुळात आशा-निराशेच्या खेळाचीच कहाणी होती. देखणा जितेंद्र, काहीसे मादकतेकडे झुकणारे सौंदर्य लाभलेली रिना रॉय, नव्यानेच आलेली सोज्वळतेचे मूर्तिमंत रूप असलेली – रामेश्वरी यांना घेऊन त्यांनी हा सिनेमा काढला. याशिवाय सिनेमात सुलोचना, सुधीर दळवी, मास्टर भगवान, गिरीश कर्नाड हे कलावंतही होते.

राम केळकरांच्या कथेचे संवाद लिहिले होते रमेश पंत यांनी. बॉक्स ऑफिसवर ब्लॉकब्लस्टर ठरलेल्या ‘आशा’चे नंतर तीन भाषांत रिमेक आले. तेलुगूत ‘अनुराग देवता’(१९८२), तमीळमध्ये ‘सुमंगली’(१९८३) आणि बंगालीत ‘मंदिरा’(१९९०). ‘आशा’मध्ये एका छोट्या मुलाच्या रूपात जे. ओम. प्रकाश यांचा नातू असलेल्या ६ वर्षांच्या ऋतिक रोशनचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले.

सिनेमाला २८व्या फिल्मफेअर पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी (१९८१) एकूण ७ नामांकने मिळाली होती. सर्वोत्तम चित्रपटासाठीचे ‘फिल्मयुग’ला, दिग्दर्शनाचे जे. ओम. प्रकाश यांना, अभिनयाचे रिना रॉयला, सहाय्यक अभिनेत्रीचे रामेश्वरीला, संगीताचे लक्ष्मीकांत-प्यारेलालना!

सुप्रसिद्ध गायिका असलेल्या आशाची (रिना रॉय) गाडी रस्त्यात बंद पडते. ट्रकचालक दीपक (जितेंद्र) तिला लिफ्ट देतो. त्यांच्यात मैत्री होते. जितेंद्रचे मालावर (रामेश्वरी) प्रेम आहे. नकळत आशाही त्याच्या प्रेमात पडते.

दीपक-रामेश्वरीच्या लग्नानंतर तो एका ट्रक अपघातात मृत्युमुखी पडला, अशी बातमी येते. त्यातच रामेश्वरीचे वडीलही मरण पावतात आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत ती नदीत उडी मारून जीव देते. योगायोगाने लोक तिला वाचवतात, पण तिची दृष्टी जाते.

इकडे अपघातात वाचलेला दीपक घरी येतो तेव्हा त्याला मालाच्या आत्महत्येबद्दल कळते. आशा पुन्हा त्याच्या जीवनात येते आणि मालाच्या मृत्यूमुळे आलेल्या निराशेतून त्याला बाहेर काढते. तिच्या जुन्या प्रेमाला आशेचे अंकुर फुटतात आणि दोघे लग्नाचा निर्णय घेतात.

दरम्यान आशाने एका गरीब मुलीच्या आईला डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केलेली असते. तिची दृष्टी परत येते आणि ती माला निघते! कथेला पुन्हा वेगळेच वळण मिळते! आशा दीपकला पत्नी आणि मुलीबरोबर राहण्याचा सल्ला देऊन त्याच्या आयुष्यातून निघून जाते. अशी ही एका निर्मळ मनाच्या मुलीला दोनदा मिळालेल्या अपयशाची कथा!

यातील सिनेमाचे शीर्षकगीत ठरलेल्या ‘शीशा हो या दिल हो, आखिर टूट जाता हैं’ या गाण्याने अनेकांना अनेकदा रडवले होते. रिनाचा त्याग आणि तोही हसत-हसत करण्याची तिची दिलदार वृत्ती प्रेक्षकांना खूप भावली होती. बक्षीजींच्या गाण्याला आवाज मिळाला लतादीदींचा! मग काय, गाणे कमालीचे लोकप्रिय झाले. त्या वर्षीच्या बिनाका गीतमालेत ते चौथ्या क्रमांकावर होते. आनंद बक्षीजींना सर्वोत्कृष्ट गीतकाराचे फिल्मफेअर नामांकन मिळवून देणाऱ्या त्या गाण्याचे शब्द होते –
शीशा हो या दिल हो,
आख़िर, टूट जाता है…
लबतक आते-आते, हाथोंसे,
साग़र छूट जाता है…

सागर म्हणजे हिंदीत जरी समुद्र असला तरी उर्दूत मात्र प्याला असतो. अनेकदा आपल्याला हवी ती गोष्ट मिळाली, असे वाटतानाच सुखाचा तो पेला अगदी ओठाजवळून कुणीतरी अचानक हिरावून घेतो!
आशाची कहाणी तीच होती. वाहन बंद पडले म्हणून एका ट्रकमध्ये मिळालेली साथ आयुष्यभरासाठी राहावी, ही तशी किती साधी अपेक्षा! पण नियती तिच्यापुढे दोनदा संधी आणून दोन्ही वेळा तिच्या हातातून काढून घेते आणि तिचा टोकाचा विरस करून टाकते. तसे हे गाणे अगदी प्रसंगनिष्ठ पण गीतकाराने स्वप्न सफल होता होता स्वप्नभंग कसा होतो आणि तेव्हा माणसाच्या मनात काय विचार येतात? ते इतक्या सुंदरपणे मांडले होते की, गाणे सर्वांना आपल्याही जीवनाशी जुळते, असे वाटू लागते. कदाचित तेच त्याच्या लोकप्रियतेचे कारण असावे!

मनात नुसती इच्छा असणे पुरेसे नाही, या जगात काहीही मिळणे सोपे नाही. माणूस इतरांवर, त्यांच्या इच्छा-आकांक्षांच्या जंजाळावर केवढा तरी अवलंबून असतो. यश मिळते ते केवळ पात्रतेवर नाही किंवा कुणी खूप कष्ट घेतले म्हणूनही नाही तर नशिबात असेल, तरच ते मिळते. हे मानवी जीवनाचे विदारक वास्तव आहे. माणसाला एक गोष्ट अनुकूल झाली असे वाटत नाही, तोवर दुसरी प्रतिकूल होऊन बसते –
काफी बस अरमान नहीं,
कुछ मिलना आसान नहीं…
दुनियाकी मजबूरी हैं,
फिर तक़दीर ज़रूरी हैं…
ये दो दुश्मन हैं ऐसे,
दोनों राज़ी हों कैसे,
एकको मनाओ तो दूजा,
रूठ जाता हैं… रूठ जाता हैं!
मी आयुष्याच्या कोलाहलापासून दूर किनाऱ्यावर जाऊन बसले होते. मग समुद्रात उठणाऱ्या लाटांनी इशारा केला आणि वादळाशी लढण्याची इच्छाशक्ती दिली. मी माझ्या मनाशीही लढले. पण फार उशिरा कळले की कुणी कुणाला कायमची साथ देत नसते.

शेवटी ज्याला आपल्या जीवननौकेचा नावाडी मानले तोही निघून जातो आणि हातातून किनाराच सुटतो –
बैठे थे किनारेपे,
मौजोंके इशारेपे,
हम खेलें तूफ़ानोंसे,
इस दिलके अरमानोंसे…
हमको ये मालूम न था,
कोई साथ नहीं देता,
माँझी छोड़ जाता हैं,
साहिल छूट जाता हैं…
आयुष्य एक रंगमंचावरचे नाटकच ठरते. आशा-निराशेचा व्यर्थ खेळ! शेवटी आपली अतर्क्य नियतीच आपल्या जीवनाचा मार्ग ठरवून देते. थोडे सुख थोडे दु:ख! प्रत्येकाला आपली कहाणी महत्त्वाची आणि आपली बाजू खरी वाटत राहते. पण शेवट आपल्या हातात नसतो. मग कुणाचे हक्काचे सुख दुसरा कुणीतरी येऊन लुटून नेतो, तर एखादा नकळतच लुटला जातो.

दुनिया एक तमाशा हैं,
आशा और निराशा हैं,
थोड़े फूल हैं काँटे हैं,
जो तक़दीरने बाँटे हैं…
अपना-अपना हिस्सा हैं,
अपना-अपना किस्सा हैं,
कोई लूट जाता हैं कोई…
लूट जाता हैं…
सिनेमा संपतो तेव्हा डोळ्यांसमोर रिना रॉयचा लोभस चेहरा, त्यामागचे करूण दु:ख, ते पचवून चेहऱ्यावर हास्य ठेवण्याची तिची प्रामाणिक धडपड मनात रुतून बसते. मास-कम्युनिकेशच्या थिअरींपैकी एक आहे विरेचनाची, म्हणजे कॅथार्सीसची! कलेचा आस्वाद घेताना इतरांची सुखदु:खे पाहूनही माणसाच्या भावनांचे विरेचन होऊन त्याला दिलासा मिळतो, असे मांडणारी ही थियरी. जुन्या कलाकृतीत हे सहजगत्या होऊन जाई. हल्लीसारखे द्वेष, सूडभावना, अहंकार, यांचे बेसुमार उद्दीपन न होता उलट विरेचन होत असल्याने समाजाचे मानसिक आरोग्य सांभाळण्यास कला उपयोगी पडत असे. विकारांच्या सार्वत्रिक उद्दीपनाने आयुष्य उजाड करून घेणे म्हणजे पुरुषार्थ असे रूढ होण्यापूर्वीचा तो काळ! तेव्हाच्या साध्या सरळ माणसांच्या या प्रेमकथा म्हणून तर महत्त्वाच्या!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -