Sunday, July 21, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलastronaut : अवकाशयात्री

astronaut : अवकाशयात्री

  • कथा : प्रा. देवबा पाटील

अवकाशयात्री जमिनीवर चालतो, तसा तो अवकाशात चालू शकत नाही. आपण जमिनीवर चालू शकतो, कारण पृथ्वीचे गुरुत्वबल कार्य करीत असते. अवकाशयात्रीवर असे कोणतेच बल कार्य करत नसते. तो अवकाशाच्या पोकळीत अक्षरश: तरंगत असतो.

दीपा व संदीप या बहीण-भावांची यक्षाच्या यानात बसून अंतराळ यात्रा सुरू असताना त्यांची चौकस बुद्धी काही त्यांना चूप बसू देत नव्हती.

“अवकाशयात्री अवकाशात कसे काय चालतात?” संदीपने विचारले.

“अवकाशयात्री हा खास पोषाख घालूनच अवकाशात बाहेर पडतो. अवकाशयात्री आपल्या अवकाशयानातून बाहेर पडला की, आपण जमिनीवर चालतो, तसा तो अवकाशात चालू शकत नाही. आपण जमिनीवर चालू शकतो, कारण आपल्यावर पृथ्वीचे गुरुत्वबल कार्य करीत असते. अवकाशयात्रीवर असे कोणतेच बल कार्य करत नसते. तो अवकाशाच्या पोकळीत अक्षरश: तरंगत असतो. त्याच्याजवळ छोटे-छोटे अग्निबाण असतात. हे छोटे छोटे अग्निबाण पाहिजे तसे उचित दिशेने प्रज्वलित करून तो हवा तसा वळू शकतो आणि इच्छित दिशेला जाऊ शकतो. तुम्ही पाण्यातील माशाचे पाण्यात विहरणे नजरेसमोर आणा. मासा पाण्यात हा चालत नसतो, तर तो पाण्यात तरंगत असतो. त्याची शेपटी व पर यांच्या साहाय्याने तो त्याला पाहिजे तशी हालचाल करू शकतो नि हव्या असलेल्या दिशेला वळू शकतो. अवकाशयात्रींचे चालणेही असेच असते. तो आपली हालचाल छोट्याशा अग्निबाणांच्या साहाय्याने नियंत्रित करतो व त्याला पाहिजे तशी हालचाल करू शकतो. हेच त्याचे अवकाशात चालणे असते. असा अवकाशात बाहेर येऊन तो यानाच्या बाह्य भागात काही तात्पुरता बिघाड झाल्यास त्याच्या दुरुस्तीचे काम करतो व अवकाशस्थानकावर किंवा अवकाशयानात परत जातो.” यक्षाने स्पष्टीकरण दिले.

“मग तो अवकाशवीर एखादेवेळी एवढ्या अफाट अवकाशात हरवत नाही का?” संदीपने बालबोध प्रश्न केला.

यक्ष म्हणाला, “तुझा प्रश्न अगदी रास्त आहे. अवकाशयानाबाहेर येऊन कार्य करण्यासाठी अंतराळवीराला आधीच खास प्रशिक्षण दिलेले असते. थोड्याशा धक्क्यानेही अवकाशवीर अवकाशात लांब फेकला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याच्या कमरेला धातूचा मजबूत दोर बांधून त्याला अवकाशयानाशी सतत जोडते ठेवलेले असते. अशा रीतीने तो जरी अवकाशात चालतो तरी तो आपल्या यानासोबतही पुढे पुढे जात असतोच. धावत्या आगगाडीच्या डब्याच्या बाहेर डब्याला धरून उभे राहून जसे एखादा प्रवासी प्रवास करतो, तसाच हा अंतराळवीरही अवकाशयानाच्या बाहेर राहून प्रवास करतो.”
“पण ताई आगगाडीच्या डब्याला असे लटकून प्रवास करणे किती धोक्याचे असते गं?” संदीप म्हणाला.

“हो. बाळा. त्यात खाली पडण्याचा व जीवाला मुकण्याचा धोकाही असतो.” दीपा म्हणाली.

“कारण त्याला डब्याशी काही दोराने बांधलेले नसते.” संदीप म्हणाला.

“बरोबर.” दीपा उत्तरली.

“अवकाशात प्रथम चालणारा अवकाशवीर कोण होता?” संदीपने प्रश्न केला “लेफ्टनंट कर्नल अलेक्सी लिओनोव्ह या सोविएत अंतराळवीराने १९६५ सालच्या मार्च महिन्यात अवकाशात २० मिनिटेपर्यंत सर्वप्रथम पदभ्रमण केले. तो यानातून बाहेर आला आणि अवकाशात २० मिनिटे फेरफटका मारून परत यानात सुरक्षित परत गेला.” यक्षाने उत्तर दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -