
दै. प्रहारच्या बातमीची दखल
एक्स-रे टेक्निशियन नेमणूकीची समस्या मात्र कायम
केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार व मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष देण्याची मागणी
महेश साळुंके
लासलगाव : लासलगाव ग्रामीण रुग्णालयात (Lasalgaon Rural Hospital) अपूर्ण मंजूर पदे, सोयीसुविधा यांचा अभाव यामुळे रुग्णांची गैरसोय होत होती. यावर दै. प्रहारने वृत्त प्रसिध्द करत आवाज उठवल्यानंतर आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत चार वर्षापासून रिक्त असलेले क्ष-किरण तंत्रज्ञ कंत्राटी कर्मचाऱ्याची कायमस्वरूपी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर संसर्गजन्य रोग, मधुमेह, रक्तदाब, इत्यादी विभागात डॉक्टरांची देखील कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. ही समाधानाची बाब असली तरी वैद्यकीय अधीक्षक १ पद, वैद्यकीय अधिकारी वर्ग १ चे १ पद, परिचारिका यांची वर्ग ३ ची ४ पदे आज देखील रिक्त आहेत. वर्ग ३ व ४ ची एकूण ९ पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ही रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील अशी ग्वाही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
येथील प्रसूतीगृह सुरू झाले असले तरी अजूनही मूळ समस्या जैसे थेच असून याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालून समस्या सोडवाव्या अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नवीन प्रसूतीगृह सुरू करण्यात आले. मात्र येथे मंजूर भुलतज्ञ हे पद अद्यापही रिक्त असल्याने सिझेरियन अथवा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना निफाड किंवा नाशिक गाठावे लागते.
शवविच्छेदन कक्षाचे आठ महिन्यांपूर्वी काम पूर्ण झाले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ताबा घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. शवविच्छेदन कक्षाच्या कामाची तपासणी करून व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर ताबा घेण्यात येईल तसेच शव विच्छेदन कक्षात शव विच्छेदन करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, विद्युत दिवे अद्यापही उपलब्ध नसल्याची माहिती डॉ. बाळकृष्ण अहिरे यांनी दिली. त्यामुळे लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या सोयी सुविधा, अपुरे कर्मचारी याकडे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार तसेच या मतदार संघाचे लोकप्रतिनिधी मंत्री छगन भुजबळ यांनी तातडीने लक्ष देऊन रुग्णांची गैरसोय दूर करून रुग्णांना शासनाच्या असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश सर्जेराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य केशवराव जाधव तसेच रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.