
नवी दिल्ली : भारताची राजधानी नवी दिल्ली (New Delhi) येथे भव्य अशी ‘जी - २०’ (G20 Summit India Delhi) परिषद पार पडणार आहे. दिल्ली येथे जगभरातून २९ देशांचे पंतप्रधान व राष्ट्रपती तसेच जवळपास १,००० विदेशी पाहुणे सहभागी होणार आहेत. त्यामुळे राजधानीत अगदी कडक सुरक्षा पाळण्यात आली आहे. नागरिकांना तर छतावर देखील न येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर माध्यमांनाही आत जाण्यास परवानगी नाही. मात्र जी - २० परिषदेतील प्रत्येक क्षणाचे प्रक्षेपण जगभरातील नागरिकांना घरबसल्या पाहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ही जबाबदारी महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील कुरुकली या छोट्याशा खेडेगावातील प्रमोद बाळासो दाभोळे (Pramod Dabhole) या मराठमोळ्या युवकावर सोपवण्यात आली आहे.
जी - २० परिषदेची बैठक आज व उद्या संपन्न होणार आहे. वेगवेगळ्या देशांच्या प्रतिनिधींसाठी भारताकडून राजेशाही थाट घालण्यात आला आहे. याचा आनंद भारतीयांनाही घेता यावा, यासाठी परिषदेचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. या बैठकीतील इत्थंभूत माहिती माध्यमांना देता यावी यासाठी देखील हे प्रक्षेपण असणार आहे. या प्रक्षेपणाची जबाबदारी एका खासगी कंपनीवर असून त्या टीमचे प्रतिनिधित्व प्रमोद दाभोळे हा तरुण करणार आहे.
प्रमोदने २१ जानेवारी २०२० मध्ये विदेश मंत्रालयात व्हिडिओ एडिटर, ग्राफिक्स डिझायनर व टेक्निकल असिस्टंट म्हणून एका नामांकित कंपनीकडे काम सुरु केले. तिथे त्याने लाईव्ह स्ट्रिमिंगचे काम केले. २०२० ते २०२२ या कालावधीत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांचे व्हिडिओ एडिटींग, लाईव्ह स्ट्रिमिंगचेही काम त्याने केले. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले. त्यावेळीही प्रमोद यांची टीम त्यांच्यासोबत होती. आता ‘जी २० ’चे काम पाहण्यासाठी संबंधित कंपनीला दिल्लीला बोलवण्यात आले. त्यामध्ये प्रमोद दाभोळे याची मीडिया कोऑर्डिनेटर (Media Coordinator) म्हणून निवड करण्यात आली आहे.
Pramod Dabhole September 10, 2023 11:52 PM
Thank you 😊🙏🏻