
आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवला होता एफआयआर
मुंबई : मविआच्या काळातील कोविड घोटाळा प्रकरणाच्या (Covid scam) कारवाईला वेग आला असून मविआच्या गैरकारभारांचा पर्दाफाश होत आहे. ईडीचे (ED) तपासकार्य जोरात सुरु आहे आहे आणि संबंधित घोटाळा करणार्या व्यक्तींविरोधात ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे ठाकरे गट (Thackeray group) चांगलाच अडचणीत सापडला आहे. कोविड-१९ डेड बॉडी बॅग प्रकरणात माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या विरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्यांनी किशोरी पेडणेकर, माजी अतिरिक्त महापालिका आयुक्त आणि माजी उपमहापालिका आयुक्त, खाजगी कंत्राटदार वेदांत इनोटेक PVT आणि कोविड-१९ महामारी दरम्यान फुगवलेल्या दराने बॉडी बॅग खरेदी करण्याच्या कथित घोटाळ्यातील अज्ञात इतर सरकारी नोकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेने ४ ऑगस्ट रोजी केलेल्या एफआयआरच्या (FIR) धर्तीवर ईडीने आज अंमलबजावणी प्रकरण माहिती अहवाल (ECIR) नोंदवण्यात आला आहे. या फसवणुकीची रक्कम सुमारे ४९.६३ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. ईडी लवकरच आरोपी अधिकारी आणि इतरांना चौकशीसाठी बोलावू शकते.
ईडीच्या सूचनेनुसार मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग १,५०० रुपयांऐवजी ६८०० रुपयांना तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे हा घोटाळा पेडणेकरांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पेडणेकर आणि इतर वरिष्ठ नागरी अधिकार्यांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ (लोकसेवक किंवा बँकर, व्यापारी किंवा एजंटद्वारे विश्वासाचा भंग करणे), ४२० (फसवणूक) आणि १२०ब (गुन्हेगारी कट) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनी लाँडरिंगचा दुसरा गुन्हा
बीएमसीच्या कामकाजातील अनियमिततेच्या संदर्भात ईडीने नोंदवलेला हा दुसरा मनी लाँडरिंगचा गुन्हा आहे. याआधी, कोविड जंबो सेंटर घोटाळ्याप्रकरणी पीएमएलए गुन्हा दाखल झाला आणि जुलैमध्ये त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित मुकुंद पाटकर आणि नागरी डॉक्टर किशोर बिसुरे यांना अटक केली होती.
किरीट सोमय्या यांनी केला होता आरोप
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी कोविडकाळात बॉडी बॅग वाढीव किंमतीत विकून बीएमसीची फसवणूक केली, असा आरोप केला होता. त्याची सखोल चौकशी केल्यानंतर तपासाअंती हे आदेश माजी महापौरांनी दिल्याचे समजले. त्यामुळे मविआच्या काळात माजी महापौर असलेल्या किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात ईडीने ठोस पावले उचलली. गेले अनेक दिवस यासंबंधी चौकशी सुरु होती. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.