Tuesday, February 11, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar भडकले! म्हणाले, दिवसभर मरमर काम करतो, तरी आता कपाळ फोडावं...

Ajit Pawar भडकले! म्हणाले, दिवसभर मरमर काम करतो, तरी आता कपाळ फोडावं का?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या खास शैलीतील सल्ल्यासाठी आणि वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यातच त्यांनी आज पुण्यातील शिक्षकांचे त्यांच्या खास शैलीत कान टोचले. शिष्यवृत्तीच्या परीक्षेत बारामतीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शून्य टक्के लागल्यामुळे त्यांनी शिक्षकांचे कान टोचले. ते म्हणाले की, आम्ही इथं मरमर काम करतो. आता काय कपाळ फोडून घेऊ का? एवढं सगळं करुनही बारामतीचा निकाल शून्यच आहे.

आज अल्पबचत भवन येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, आपल्या मुलांना कुठे शिकवायचं हा प्रत्येक पालकाचा अधिकार आहे. त्यामुळे त्यात जाण्यात काही अर्थ नाही. आज गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून अनेक गोष्टी घडत आहेत. पहिलीपासून इंग्रजी सुरू झालं. या अगोदर पाचवीपासून होतं. कालानुरूप बदल केला जातो. बदल करण्याची प्रक्रिया सुरू असते. शिष्यवृत्ती मध्ये अनेक शाळांचा चांगला निकाल लागला आहे, तर काही शून्य लागला आहे. शिक्षण देण्यासाठी हवं ते दिलं जाईल. मात्र शिक्षण नीट द्या, अशा शब्दांत त्यांनी शिक्षकांना सल्ला दिला आहे. लातूर पॅटर्न शिक्षकांमुळे प्रसिद्ध असल्याचंही ते म्हणाले.

पाचवीचा शिष्यवृत्तीचा निकाल लागला आहे. या परीक्षेत 640 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात शिरूरची मुले जास्त आहेत. त्यानंतर खेडची मुलं आहेत आणि त्यानंतर सातव्या क्रमांकावर बारामती आहे. पुरंदर तालुक्यातील एका मुलाने अब्रू राखली. शिरुरच्या पोरांनी बाजी मारली. मात्र बारामती, भोर आणि हवेलीचा निकाल शून्य टक्के आहे. आता काय कपाळ फोडून घेऊ का? आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून मरमर काम करतो आणि बारामतीचा निकाल शून्य, असं म्हणत ते आज शिक्षकांवरच भडकल्याचं पाहायला मिळालं.

ते म्हणाले की, मी मनात काही ठेवून बोलत नाही. नवीन पिढीला ज्ञान दिलं पाहिजे म्हणून सांगत होतो. मळलेल्या वाटेवर जाण्याऐवजी नवीन वाटा चोखाळा, असं विद्यार्थ्यांना म्हणालो. याचा अर्थ तुम्ही नीट शिकावं आम्ही सगळी मदत करु, असंही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असते. शिक्षकांनी चांगली कामगिरी करत विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य करावे. गरीब कुटुंबापर्यंत चांगले आणि दर्जेदार शिक्षण पोहीचविण्याची जबाबदारी शिक्षकांची असून शिक्षकांनी त्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

राज्यात ३० हजार शिक्षकांच्या भरतीचा निर्णय

राज्यात ३० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत इंग्रजी भाषेतूनही शिक्षण देण्यावर भर देण्यात येत आहे. मातृभाषा महत्वाची असून जागतिक संवादाची भाषा म्हणून इंग्रजीलाही महत्व देण्याची गरज आहे. त्यासाठीही शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे, असेही श्री.पवार म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -