नवी दिल्ली : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने (rohan bopanna) आपल्या वयाच्या ४३व्या वर्षी मोठा इतिहास रचला आहे. भारताच्या रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडेन या जोडीने गुरूवारी अमेरिकन ओपनच्या (us open 2023) पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये धडक मारली.
यासोबतच रोहन बोपण्णाने इतिहास रचला आहे. त्याने वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. रोहनच्या आधी कोणत्याही पुरुष खेळाडूला इतक्या वयात एखाद्या ग्रँड स्लॅमच्या फायनलपर्यंत मजल मारता आलेली नाही. रोहनने ४३ वर्ष ६ महिने या वयामध्ये हा इतिहास रचला आहे.
रोहन आणि अॅबडेनने फ्रान्सच्या पियरे हुगुएस हर्बर्ट आणि निकोलस माहुत या जोडीला सरळ सेटमध्ये हरवले. बोपण्णा आपल्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा पुरुष दुहेरीच्या फायनलमध्ये जागा मिळवण्यात यशस्वी ठरला. सहावे रँकिंग असलेली भारत-ऑस्ट्रेलिया जोडी यंदाच्या विम्बल्डन ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचली होती.
या जोडीने अमेरिकन ओपनच्या सेमीफायनलमध्ये फ्रान्सच्या जोडीला ७-६(७-३), ६-२ असे हरवले. बोपण्णा दुसऱ्यांदा एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तो गेल्या वेळेस २०१०मध्ये आपला पाकिस्तानी जोडीदार ऐसाम उल हक कुरेशीसह अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये पोहोचले होते. त्यावेळस रोहनच्या जोडीला ब्रायन बंधुंकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.
१३ वर्षे जुन्या आठवणी जाग्या झाल्या – बोपण्णा
सामना जिंकल्यानंतर रोहन बोपण्णा खूप खुश दिसत होता. तो म्हणाला, आम्हाला लोकांकडून खूप एनर्जी मिळाली. मी १३ वर्षानंतर फायनलमध्ये परत आलोय यासाठी मी खुश आहे.