लाडक्या आशाताई आज साजरा करतायत नव्वदावा वाढदिवस
साधी पण सुंदर साडी, गळ्यात त्याला साजेशी मोत्याची माळ किंवा हार, केसांत फूल, कपाळावर टिकली आणि चेहर्यावर नेहमी हास्य म्हणजे अर्थातच आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर आठ दशकांहून अधिक काळ राज्य करणार्या गोड गळ्याच्या सुरेल गायिका आशा भोसले (Asha Bhosle). आज आशाताई आपला नव्वदावा वाढदिवस (90th Birthday) साजरा करत आहेत. या वाढदिवसानिमित्त आशाताईंच्या काही खास आठवणींना उजाळा देऊयात.
बॉलीवूड असो, मराठी, बंगाली, तामिळ अशा अनेक भाषांतून आशाताईंनी सुमारे दहा हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. आशाताईंना दोन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, चार बीएफजेए (BFJA) पुरस्कार, अठरा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कारासह नऊ फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सन २००० मध्ये त्यांना चित्रपट क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांना भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ हा देशाचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले. २०११ मध्ये संगीत इतिहासात सर्वात जास्त गाणी रेकॉर्ड केलेल्या कलाकार म्हणून आशाताईंची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नोंद करण्यात आली.
वयाच्या दहाव्या वर्षी गायलं होतं पहिलं गाणं
यंदाच्या मार्च महिन्यात आशाताईंना राज्य सरकारच्या वतीनं महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मी महाराष्ट्राची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे व हा पुरस्कार मला भारतरत्नाप्रमाणे आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या होत्या. या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या पहिल्या गाण्याची एक आठवण सांगितली होती.
आशाताई म्हणाल्या की, “कोल्हापुरात १० वर्षांची असताना, १९४३ साली मी पहिलं गाणं गायलं. त्यावेळी मी प्रचंड घाबरले होते, मी थरथर कापत होते. असं वाटलं की हा माईक घेऊन कोणीतरी जावं, मला पळून जावं असं वाटलं होतं. तरीही मी त्या वेळी गायलं. कारण पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारलं असतं. १९४६ साली मी हिंदी फिल्म लाईनमध्ये गायला सुरुवात केली. त्यानंतर आतापर्यंत १० हजार गाणी गायली. संगीतप्रेमींनी माझं गाणं ऐकलंच नसतं तर मी येथपर्यंत आलेच नसते.” या पहिल्या गाण्यानंतर आशाताईंचा प्रवास आजतागायत सुरु आहे.
साडीच्या पदरावर घेतला होता लतादीदींचा ऑटोग्राफ
आशाताईंनी एका कार्यक्रमादरम्यान लतादीदींसोबतची एक खास आठवण सांगितली होती. त्या म्हणाल्या, ‘मी माझ्या आयुष्यात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि इतर अनेक महान लोकांची भेट घेतली आहे, परंतु मी त्यांच्याकडे कधी त्यांचा ऑटोग्राफ मागितला नव्हता. माझ्याकडे केवळ एका व्यक्तीचा ऑटोग्राफ आहे आणि ती व्यक्ती म्हणजे लतादीदी. लतादीदी जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी ती आजारी होती, तेव्हा तिने मला तिच्या खोलीत बोलावलं. ती मला म्हणाली, ‘माझ्याकडून तुला जे काही हवंय ते माग’ ते ऐकून मला धक्का बसला, पण काही वेळानंतर मी तिला तिच्या एका जुन्या साडीवर ऑटोग्राफ देण्यास सांगितला. ती साडी माझ्या जीवनातील सर्वात अनमोल वस्तू आहे. मी तिचा या साडीच्या पदरावर ऑटोग्राफ घेतला. कारण जेव्हा मी ती साडी नेसेन, तेव्हा सर्वांना तिचा ऑटोग्राफ पाहता येईल!” असं या बहिणींचं अतूट नातं होतं.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra