Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यलाल राईस सूप अन् रानभाज्यांची क्रेझ...!

लाल राईस सूप अन् रानभाज्यांची क्रेझ…!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकणाला निसर्गाने भरभरून दिले आहे. आपल्या कोकणात सर्वकाही आहे. तरीही आपली अवस्था आमच्याकडे काहीच नाही, असं सतत मनात टोचणी घेऊन जगण्याची आहे. महाराष्ट्राचा विचार करताना कोकणातील माणसं ही अल्पसंतुष्ट, समाधानी, फार कष्ट नकोत, आनंदी राहणे अशा मानसिकतेत वावरणारी माणसं कोकणात राहतात. चाळीस वर्षांपूर्वीच कोकण आणि आजचं कोकण हे बदललं आहे. कोकणातील ग्रामीण भागात बंद घरांची संख्या वाढली आहे. गावातून तालुक्याच्या ठिकाणी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तरीही गावांचे गावपण टिकून आहे. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी गरिबीत जगणारा, राहणारा, मुंबई, पुणेकर चाकरमान्यांच्या मनिऑर्डरची वाट पाहत बसणारा कोकणी माणूस गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी आर्थिकदृष्ट्या सुधारला आहे. एक गोष्ट आहे, कोकणात स्वच्छ राहणीमान, निटनेटके आणि खिशात पैसे कमी असले तरीही रूबाबात इथला माणूस कधीच कमी पडणारा नाही.

पूर्वी गावातली शेती, पालेभाज्या, रानभाज्या, फणस, आंबे, रायवळ आंबे या सर्वांवर कोकणची खरंतर सारी भिस्त असायची. आता या पूर्वीच्या गोष्टी आठवायचं कारणही तसेच आहे. कोकणातील कोणत्याही आठवडी बाजारात अनेक जुन्या आठवणी जागवणाऱ्या वस्तू विक्रीला येत आहेत. पूर्वी वालयचा लाल तांदूळ आणि मासे हे कोकणच्या माणसांच्या जेवणातला मेनू असायचा. मासे आणि भात जेवणात असले की, अख्ख कोकण तृप्ततेचा ढेकर देई. मधल्या काही वर्षांत चायनिजचा शिरकाव झाला; परंतु लाल तांदळाची पेज आज अनेक सुखांगी, श्रीमंत कुटुंबांच्या घरचा नाश्ता झाला आहे. लालभात गरीबाघरचा म्हणणारे आणि लालभात नको रे बाबा, असं म्हणणाऱ्यांना निसर्गाने आज त्याच भाताला मानाचे पानात नेऊन बसवले आहे. लाल तांदळाची पेज एका ‘सलाईन’ एवढी एनर्जी देते असे म्हटले जाते. कोकणातील लोक पूर्वी भाकरी, पेज, रानभाज्या हे सारं पौष्टिक अन्न खात होते. त्यामुळे बुद्धी आणि श्रमाची कामही तशीच केली जायची. लाल तांदळाची पेज त्याची चविष्टता पंचतारांकित हॉटेलमधील कुठल्याही ‘राईससूप’ला येणार नाही. या अशा गावठी संबोधणाऱ्या खाद्यावर पूर्वीची पिढी पोसली गेली होती.

कोकणात ज्यांचे बालपण गेले त्यांना लाल तांदळाची पेज आठवल्याशिवाय राहणार नाही. कोकणातील घरात स्वत:च्या शेतात पिकवलेले भात, घरातील तांदळाची असलेली विपुलता हीच श्रीमंती होती. याच श्रीमंतीत कोकणातील शेतकरी आपल्या घरी आलेल्यांना कधी उपाशी परत पाठवायचा नाही. घरा सभोवताली असलेली आंबा, फणसाची झाडे, बागेतील माडावरचे नारळ हेच कुटुंबांचे उदरनिर्वाह करायचे. पावसाळी हंगामातील चार-पाच महिने कोकणातील रानभाज्यांचा हंगाम असतो. भारंगी, कुड्याच्या शेंगा, टायकुळा, कुरडू, माडा, पेवगा, चिवारीचे कोंब, शेंडवेल, कणकीचे कोंब, सुरण, तेरा अळू, सुरणाचा पाला अशा अनेक प्रकारच्या रानभाज्यांनी अनेक गोरगरीब कुटुंबांना आधार दिला आहे. या अशा अनेक रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. कोकणातील माणसांचा कोणत्याही कष्टाशिवाय दारात उभ्या असलेल्या फणसांनी गरीब कुटुंबांचा आर्थिक भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. एप्रिल, मे आणि जूनचा पहिला पंधरवडा कोकणातील अनेक घरांतून फणसाची भाजी, फणसाच्या कापे, रसाळ गऱ्यांची एक वेगळा स्वादिष्ट वास सगळीकडे दरवळत असतो. पूर्वी लालभात, उकड्या तांदळाची पेज, रानभाज्या हे सारं गोरगरिबांच्या घरच अन्न होत. आता मात्र याच सर्वच रानभाज्यांनी श्रीमंतांच्या ताटातील खास डिश म्हणून केव्हाचीच मान्यता मिळवली आहे. आताच्या रोजच्या खाण्याच्या आहारातील बदलांमुळे अनेक डॉक्टर रानभाज्या खाण्याचे सल्ले त्यांच्याकडे जाणाऱ्या रुग्णांना सल्ले देतात. यामुळे साहजिकच अलीकडच्या काळात कोकणातील रानभाज्यांचे महत्त्व अधोरेखित होऊ लागले आहे. रानभाज्यांची प्रदर्शनेही भरू लागली आहेत. शाळा, कॉलेजमधून रानभाज्यांपासून विविध रेसिपी बनवल्या जात आहेत.

एककाळ गावातील रानांमध्ये, डोंगरांमध्ये पिकणाऱ्या या रानभाज्यांकडे ती गरज म्हणून खाल्ले जायचे. आज याच रानभाज्या आरोग्याची गरज म्हणूनच खाल्ल्या जातात. फळा-फुलांनी रानभाज्यांनी कोकणाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलंय. आजच्या बदलत्या जीवनशैलीत कोकणातील घर, परिसर असं बरंच काही बदललं आहे. या बदलामध्येही इथली मालवणी मुलखाची खाद्यसंस्कृती आजही आपलं वेगळेपण टिकवून आहे. जाता-जाता आठवलं म्हणून सांगतो, पूर्वी शेतीच्या हंगामात भाकरी आणि गोलमा कांद्यात, तिखटमीठ टाकून तव्यावर परतवून भरपावसात शेतात घोंगडीत अंग लपेटून याच जवला किंवा गोलम्याबरोबर भाकरी खाण्याचं ज्यांना भाग्य लाभलं ते नशीबवानच म्हटले पाहिजे. आज हा जवला खास मेनू म्हणून चिकन, मटण, मच्छी थाळीत असतो. कोकणातील हे सारं खाद्यसंस्कृतीचं वैभव लाल तांदळाची पेज आज जरी ‘रेड राईस सूप’ म्हणून वाडग्याच्या जागी डिश म्हणून आली तरी त्याची टेस्ट तीच आहे. रानभाज्यांची क्रेझ आज अधिकच वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -