काय आहे एनपीसीआयचे नवे फीचर?
मुंबई : डिजीटल होण्याकडे भारत यशस्वी पावले उचलत आहेत. भारतात जितक्या प्रमाणात ऑनलाईन पेमेंट केले जाते तितके अजून कोणत्याही देशात केले जात नाही. डिजिटल माध्यमातून देशातील यूपीआय (UPI) पेमेंट सुविधा दिवसेंदिवस प्रगती करत आहे. जगभरातील कित्येक देशांमध्ये देखील आता यूपीआय पेमेंट करता येत आहे. ही सुविधा आणखी यूजर फ्रेंडली बनवण्यासाठी आता एनपीसीआयने (NPCI) एक नवीन फीचर लाँच केलं आहे.
एनपीसीआयच्या या नवीन फीचरमध्ये इंटरनेटचीही गरज भासणार नाही. यात केवळ फोन कॉलच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत. या फीचरचे नाव आहे ‘हॅलो यूपीआय’. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये याबाबत घोषणा केली. यासोबतच, यूपीआयबाबत आणखी नवे फीचर्स देखील यावेळी लाँच करण्यात आले.
कसं असणार हॅलो यूपीआय?
‘हॅलो यूपीआय’ या माध्यमातून पेमेंट करण्यासाठी यूजर्स आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ग्राहक एका ठराविक नंबरवर कॉल करू शकतात. यासाठी विविध बँकांसाठी वेगवेगळे नंबर देण्यात आले आहेत. या नंबरवर कॉल करुन, आपल्या बँकेचं नाव सांगावं लागणार आहे. सोबतच, ट्रान्झॅक्शनचा प्रकार सांगून, शेवटी यूपीआय PIN च्या मदतीने तुम्हाला पेमेंट करता येणार आहे. ही सुविधा सध्या केवळ हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे तसेच यातून केवळ १०० रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येणार आहेत. लवकरच यात अन्य भाषादेखील येतील, असं एनपीसीआयने स्पष्ट केलं.
आणखी फीचर्स लाँच
यासोबतच यूपीआयवर क्रेडिट लाईन हे फीचरही लाँच करण्यात आलं आहे. या माध्यमातून यूजर्सना बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड लोन मिळू शकतं. सोबतच, आधीपासून घेतलेल्या कर्जाच्या सहाय्याने यूपीआय प्लॅटफॉर्मवर ट्रान्झॅक्शन करता येईल. यासोबतच ‘लाईट एक्स’ नावाचं आणखी एक प्रॉडक्ट NPCI ने लाँच केलं आहे. इंटरनेट शिवाय व्यवहार करण्यासाठी याचा वापर करता येईल.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra