
बुलढाणा: राज्यात एकीकडे दहीहंडीचा (dahi handi) उत्सव जल्लोशात सुरू असताना बुलढाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहीहंडीसाठी ज्या गॅलरीला दोरी बांधली होती ती गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एका चिमुकल्या मुलीचा जागीच मृ्त्यू झाला आहे. या घटनेने दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे. यात आणखी एक मुलगी जखमी झाली आहे.
दहीहंडीनिमित्त घराच्या गॅलरीला याचा दोर बांधण्यात आला होता. ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा वर चढले होते. यामुळे त्या दोराला युवक लटकले असताना सिमेंटच्या पिलरसह गॅलरी खाली कोसळली. यावेळी निशा रशीद खान पठाण(वय ९ वर्षे) ही मुलगी दहीहंडी पाहत होती. या अपघातात निशा रशीद खानचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत शेख हाफिज(वय ८ वर्षे) या मुलीच्या डोक्याला तसेच पायाला गंभीर जखम झाली असून तिला प्रथमोपचार केल्यावर जालना येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच मृत निशा रशीद खान हिचा मृतदेह पोस्टमार्टेमससाठी पाठवण्यात आले. दरम्यान, या उत्सवादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.