
गवंडी म्हणून करीत होता काम
पिंपळनेर : राजस्थानातील जिनमाता पोलीस स्टेशन हद्दीत २०२२ मध्ये झालेल्या खूनप्रकरणी हवा असलेला संशयित राजू बाबूलाल वर्मा (वय २८ रा. खिचडो राणी ता. दश्रतारामगड जि. शिखर, राजस्थान) याला निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
निजामपूर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वर्माला नूतन माध्यमिक विद्यालय, इंदवे येथून ताब्यात घेतले. संशयित वर्मा शाळेत सुरू असलेल्या बांधकामावर गवंडी काम करताना मिळाला. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला राजस्थान पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
त्याच्या मागावर राजस्थान पोलीस होते. अशातच राजस्थानमधील एक तरुण इंदवे येथे आला असल्याची गोपनीय माहिती निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना मिळताच संशयिताला तत्काळ पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड, प्रदीप आखाडे, बालाजी वारडवाड, दीपक महाले, राकेश महाले यांनी ही कारवाई केली.