Saturday, July 20, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकौटुंबिक समस्यांची गोपनीयता पाळणे अत्यंत महत्त्वाचे...

कौटुंबिक समस्यांची गोपनीयता पाळणे अत्यंत महत्त्वाचे…

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

आपल्या समाजात आपण घरोघरी मातीच्या चुली या उक्तीनुसार प्रत्येक घरात, कुटुंबात वाद – विवाद, मतभेद असल्याचे सर्रास ऐकतो आणि पाहतो. छोट्या – मोठ्या कुरबुरी घरोघरी सुरू असतात. ते नैसर्गिक असते आणि त्यातूनही सगळे एकत्र येतात, एकत्रच राहतात. छोटे भांडण तत्काळ मिटवणे, गैरसमज ताबडतोब दूर करणे, आपल्या घरातील माणसांना समजून घेऊन, त्यांच्या चुका पदरात घेऊन पुढे जाणे आणि समंजसपणे वागणे हे गुण कुटुंब टिकवायला, नातेसंबंध घट्ट करायला निश्चितच मदत करतात.

वाद, मतभेद, दुरावा, क्लेश, चिडचिड, मानसिक – भावनिक आणि आर्थिक ताणतणाव, समस्या, अडचणी, तक्रारी या जर घरातच राहिल्या आणि मिटल्या तर शंभर टक्के अशा कुटुंबाला कोणीच त्रास देऊ शकत नाही, वेगळं करू शकत नाही. आपापसातील विश्वास, प्रेम, आदर आणि एकमेकांप्रती असलेली निष्ठा, प्रामाणिकपणा कुटुंबातील लोकांना कायमस्वरूपी बांधून ठेवतो, टिकवून ठेवतो.

कुटुंबाचा खरा त्रास, खरा ऱ्हास, प्रचंड बदनामी आणि अधोगती तेव्हा सुरू होते जेव्हा घरातील भांडण उंबऱ्याबाहेर जातात, चव्हाट्यावर येतात. खूप पूर्वीपासून आपल्याला आपल्या घरातील मोठ्या वयस्कर लोकांनी हे सांगितले, शिकवले आहे.
परंतु आजकाल एकत्र कुटुंब पद्धती लयाला गेल्यामुळे, कुटुंबाच्या मान मर्यादेचं भान न राहिल्यामुळे आणि प्रचंड फॉरवर्ड तसेच उथळ विचारसरणीमुळे घरातील वाद बाहेर जायला घरातीलच काही मूर्ख सदस्य कारणीभूत होतात यात शंका नाही. आपल्याच घरातील माणसांचे विक पॉइंट्स, त्यांच्या चुका, त्यांचे चुकीचे निर्णय, त्यांचं चारित्र्य, घरातील आर्थिक समस्या, मालमत्तेचे वाद आपल्या घराशी काहीही संबंध नसणाऱ्या, घरातील कोणाचीही काळजी नसणाऱ्या, परक्या आणि त्रयस्त व्यक्तीला तिखट-मीठ लावून सांगितलं जातं आणि यामुळेच घरात फूट पडायला सुरुवात होते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे घरोघरी आजकाल टीव्हीवरील मराठी मालिकाच सुरू असल्याचे जाणवते.

आपण समाजात राहतोय त्यामुळे कुटुंबापलीकडे देखील आपलं जग असतंच. रोज सातत्याने अनेक नवनवीन लोक आपल्या संपर्कात येतात, त्यातून जवळीक निर्माण होत राहाते, अनेकांना आपली तर आपल्याला देखील सगळ्यांची मदत, गरज लागत असते. आपल्याला कार्यालयीन कामात, घर कामात, इतर उपक्रमात अनेक जण हातभार लावत असतात. तरीही सगळेच दिसतात तितके साधे सरळ आणि विश्वासास पात्र नसतात. आपल्या घरात राहणाऱ्या सगळ्यांचं सामाजिक आयुष्य असतं. आपल्या प्रत्येकाच्या जवळची अथवा विश्वासाची, प्रेमाची मित्र-मैत्रिणी, सहकारी, शेजारी, मदतनीस अशी एखादी व्यक्ती असतेच.

कामाच्या ओघात, गप्पांच्या मूडमध्ये, प्रसंगनुरूप आपण आपली सुख-दुःख देखील अशा व्यक्तींसोबत वाटतो. आपल्या अडचणी, आपल्या कुटुंबाकडून असलेल्या अपेक्षा, आपल्या आयुष्यातले चांगले-वाईट प्रसंग, अप्रिय घटना, झालेला त्रास आपण अशा काही परक्या लोकांसमोर व्यक्त करतो की, ते त्या पात्रतेचे नसतात. आपल्या आयुष्यातील कोणत्याही कारणास्तव आलेली व्यक्ती घरातली असणं आणि घरासारखी असणं हा फरक अनेकांना समजत नाही. भावनेच्या आहारी जाऊन आपण कळतं-नकळत आपली, आपल्या घरातील सगळ्यांची चांगली, वाईट माहिती, घरातली काही गुपितं, काही अतिशय संवेदनशील विषय अशा लोकांना सांगून टाकतो जे याचा पुरेपूर गैरफायदा आपल्या घराची नासाडी करायला करतात. आपल्याच घरातील सगळ्यांची पोची ओळखून, गुण-दोष ओळखून ते आपल्यालाच बरबाद करतात. मदत, सहकार्य करण्याच्या नावाखाली, सहानुभूती दाखविण्याच्या नावाखाली अशी कपटी वृत्तीची, मतलबी माणसे आपला पुरेपूर उपयोग करून घेतात आणि आपल्याच बद्दल समाजात बदनामी करत फिरतात. आपल्यासोबत तोंडावर गोड बोलतात, आपल्याच घरात, मनात स्वतःचं हक्काचं स्थान बनवतात आणि आपल्याशीच गद्दारी करतात, अशी अनेक उदाहरणे समुपदेशन दरम्यान सांगितली जातात.

आपलं जवळचं, हक्काचं म्हणून आपण ज्यांना डोक्यावर बसवतो, आपल्याच ताटातले खायला देतो, आपल्यामध्ये मिसळून घेतो बहुधा त्याच व्यक्ती आपल्याला धोका देतात, हा अनुभव अनेकांना आलेला असतो. तरीही हे आपल्याला कळत नसते किंवा कळूनही वळत नसते. कारण आपला आंधळा विश्वास त्या व्यक्तीवर बसलेला असतो.
अशा प्रसंगी, कुटुंबातील काही शहाण्या, अनुभवी लोकांनी आपल्याला सावध केले तरी आपण भलत्याच त्रयस्थ व्यक्तीमध्ये खूप वाहवत जातोय, याचा आपल्या कुटुंबाला पण त्रास होतोय हे आपल्या लक्षात येत नाही. आपण माणसे ओळखण्यात चुकूच शकत नाही हा फाजील आत्मविश्वास आपल्याला असतो आणि तिथेच आपण फसतो. अशावेळी आपण आपल्या घरातील, नात्यातील लोकांशी वाईटपणा घ्यायला सुद्धा मागे-पुढे पाहत नाही. रक्ताची, हक्काची नाती सुद्धा अनेकदा परक्या माणसांमुळे कायमची तुटतात. आपली स्वतःची माणसेच आपल्याला दुरावतात आणि त्या व्यक्तीचे हेतू साध्य होतात ज्याने हे जाणूनबुजून, नियोजनपूर्वक आपले आयुष्य, आपले कुटुंब संपवण्यासाठी केलेला असतो.

आपण अनेकदा आपल्या स्वतःच्या रक्ताचे नातेवाईक, आपले बहीण, भाऊ, पत्नी, आई-वडील यांच्यापेक्षा इतर मित्रांना-मैत्रिणींना ओळखीच्याना जास्त जवळच मानत असतो. प्रत्येकाला वैयक्तिक आयुष्य नक्कीच असावं. कोणीतरी हक्काचं, जवळचं आपल्याला समजावून घेणारं देखील असावं पण त्यासाठी आपलं घर, आपलाच संसार पणाला लागेल इतकेही त्या त्रयस्त व्यक्तीला आपल्या आयुष्यात महत्त्व नसावं. आपल्या घरातील निर्णय भलतंच कोणी घेतंय, आपल्या घरगुती विषयावर कोणीही मत मांडतेय, आपल्या घरगुती चर्चेत कोणी भलतंच हस्तक्षेप करतंय हे ऐका चांगल्या सुसंस्कृत सुशिक्षित कुटुंबात कोणीही खपवून घेऊ शकतं नाही आणि यामुळे जवळील नाती दुखावली जातात.
आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदात, सुखात नक्कीच सगळ्यांना सहभागी करा. आपलं कुटुंब समाधानी, समृद्ध आहे, आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळेच आपल्या माणसांना किंमत देतोय असे चित्र समाजाला दाखवणे आवश्यक असते. आपल्याला समस्या असल्या, अडचणी असल्या तरी आपल्या घरातील लोक आपल्या पाठीमागे खंबीर उभे आहेत, आपल्याला घरच्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन आहे हे जर आपण नको तिथे हस्तक्षेप करणाऱ्या व्यक्तींना पटवून दिले, तर ते स्वतःच्या मर्यादा ओळखतील. पण आपणच आपल्या घरातले भेदभाव, भांडण नको त्या लायकी नसलेल्या लोकांना सांगितले, तर त्याचा विपर्यास झाल्याशिवाय राहत नाही.

आपल्याकडूनच माहिती घेऊन, आपल्या कुटुंबातील लोकांची मनं कलुषित करणं, आगीत तेल ओतून, गैरसमज पसरवणं, आपल्या घरात वाद वाढीला लावण्यासाठी विविध कारस्थानं करणं अशा संधी स्वतःहून आपण कोणालाच देऊ नका. घराबाहेर आपल्याशी संबंधित व्यक्तींना आपल्या पुरतंच ठरावीक मर्यादेत ठेवा. कोणाला घरात आणायचं, आणल्यास त्याला कितपत आणि किती वेळ आपल्या घरात, आपल्या आयुष्यात जागा द्यायची, घरातील खासगी गोष्टी कितपत त्याला सांगायच्या यावर बंधन असू द्या. आपल्या घराला तडा जाणार नाही, आपल्या घरातल्या लोकांचा कोणी अपमान करू शकणार नाही, आपल्या नातेसंबंधात दुरावा येणार नाही, आपल्याला कोणी मानसिक, भावनिक आणि आर्थिक दृष्टीने फसवणार नाही याची काळजी घेणे फक्त आपल्या हातात असते.

त्यामुळेच घरातील त्रास, समस्या, तणाव, बिकट प्रश्न, आव्हान, वाद, कटकट, घरातील लोकांच्या चुका, त्यांचे स्वभाव, सवयी, वर्तवणूक, यांसारखे विषय सार्वजनिक करू नका. आपणच जर आपल्या घरातील इत्यंभुत माहिती बाहेर पसरवत असलो तर जगाला दोष देण्यात अर्थ नाही. आपणच जर सामाजिक जीवनात आपल्या घरातील माणसांचा, नात्यांचा आदर ठेवत नसलो तर परक्या लोकांकडून ही अपेक्षा करण्यात अर्थ नाही. आपल्या घराची चौकट किती आणि कशी मजबूत ठेवायची, आपल्या घराच्या उंब्र्यांबाहेरील जग आणि आतील कौटुंबिक जीवन याचा ताळमेळ ज्यांना घालता येतो आणि ते सर्वस्वी आपल्या हातात असते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -