
जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे. २९ ऑगस्टपासून ते उपोषणास बसले आहेत. या काळात त्यांच्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही. यामुळे आता त्यांची तब्येत बिघडली आहे. आज सकाळी डॉक्टरांचे पथक उपोषणस्थळी पोहचले आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने सलग दोन दिवस जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आरक्षणाचा जीआर घेऊन आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही असे स्पष्ट शब्दांत सांगितले होते. त्यामुळे शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यानंतरही जरांगे यांचे उपोषण सुरुच असल्यामुळे कालपासूनच त्यांना अस्वस्थ वाटत होते. उपोषणामुळे जरांगे यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना आज सलाईन लावण्यात आले.
मात्र मी आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय उठणार नाही, असा ठाम निश्चय जरांगे यांनी केला आहे. डॉक्टर जरांगे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.