
बाप रे! केवळ तिकीटाची किंमत ऐकाल तर...
मुंबई : क्रिकेटच्या मैदानात सध्या वर्ल्ड कपचे (World Cup 2023) वारे वाहायला सुरुवात झाली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये वर्ल्ड कपचा पहिला सामना ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. तर भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नई येथे ८ ऑक्टोबरला होणार आहे. वेळापत्रक कसंही असलं तरी भारतीयांना उत्सुकता असते ती मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची (India vs Pakistan match). यावर्षी हा सामना १४ ऑक्टोबरला रंगणार आहे.
भारत पाकिस्तान सामना म्हटलं की भारतीय आपल्या व्यग्र वेळापत्रकातून कसाही वेळ काढतात आणि टीव्ही किंवा मोबाईलसमोर बसतात. मात्र हा सामना प्रत्यक्षात पाहायचा असेल तर? शक्य आहे ना, पण त्यासाठी किंमतही प्रचंड मोजावी लागणार आहे. भारतीय सामन्यांच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. वर्ल्ड कपच्या सामन्याच्या तिकीटविक्रीला सुरुवात झाली असून तिकीटाची किंमत फारच जास्त आहे. काही तिकीट बुकिंग वेबसाइट्सनी भारताच्या सामन्यांची सर्व तिकिटे विकली आहेत. तर काही तिकिटे अद्याप वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
Viagogo नावाच्या तिकीट संकेतस्थळावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या सामन्याच्या तिकीटांची लाखोंमध्ये विक्री होत आहे. वेबसाइटवर, वरच्या श्रेणीतील तिकिटाची किंमत ५७ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे दिसत आहे. या वेबसाइटवर तिकिटाची सर्वात कमी किंमत ८० हजार रुपये आहे. बुक माय शो या तिकीट बुकिंग वेबसाइटवर भारताच्या सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली आहेत.