Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यनमस्कार मंडळ, कल्याण...

नमस्कार मंडळ, कल्याण…

सेवाव्रती: शिबानी जोशी

हिंदू धर्मात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेदांमध्ये व पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात. उगवत्या व मावळत्या सूर्याला दंडवत घालणे हे सूर्यनमस्कारांचे प्रथम उद्दिष्ट आहे. त्याशिवाय सूर्यनमस्कार घालण्यामागे अनेक उद्देश आहेत.

आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते ।।

जे साधक दररोज सूर्यनमस्कार करतील, त्यांना सहस्र जन्म दारिद्र्य येत नाही. असा आपल्याकडे श्लोक आहे. सूर्यनमस्कारामुळे सर्वांगसुंदर व्यायाम होतोच, पण आत्मीक, मानसिक व शारीरिक सामर्थ्यही प्राप्त होते. हा व्यायाम अल्पमोली आणि बहुगुणी आहे असे म्हणतात म्हणून तो करावा.

आपला देश पारतंत्र्यात असताना १९२४ साली सूर्यनमस्काराचे आणि एकूणच व्यायामाचे महत्त्व मुलांच्या भविष्याची चिंता करणाऱ्या काही जणांना लक्षात आले. स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यायचा असेल, तर युवकांनी सुदृढ असायला हवं हे लक्षात आल्यावर कल्याणमध्ये राहणाऱ्या ५ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देण्याबरोबरच सुदृढ युवक निर्माण झाले पाहिजेत या हेतूने सूर्यनमस्कार शिकवायला सुरुवात केली. सूर्यनमस्कार हा भारतीय व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे सूर्यनमस्कारांबरोबर भारतीय खेळांना प्रोत्साहन देणं हा देखील यामागे हेतू होता.

विजयादशमी, शालीवाहन शके १८४६ म्हणजे इ.स. १९२४ ला संस्थापक कै. मोरेश्वर भावे, कै. गंगाधर घारपुरे, कै. भगवान चोळकर, कै. चिंतामण भिडे व कै. रामचंद्र भिडे या ५ शिक्षकांनी औंधचे संस्थानिक पंतप्रतिनिधी कडून प्रेरणा घेऊन मूलतः सूर्यनमस्कार प्रचारासाठी मंडळाची स्थापना केली.बलवान व निरोगी नागरिकांची पिढी राष्ट्र सेवेसाठी तयार करणे व भारतीय व्यायाम प्रकारांना प्रोत्साहन तसेच भारतीय क्रीडा प्रकार लोकप्रिय करणे हे संस्थेचे मुख्य उद्देश राहिले आहे. सध्या सर्व आधुनिक व अद्ययावत साधनांनी युक्त अशा दोन व्यायामशाळा कार्यरत आहेत.
मंडळाचा अत्यंत प्रसिद्ध उपक्रम म्हणजे लक्ष सूर्यनमस्कार अनुष्ठान. १९३१ पासून कोविड वगळता अव्याहत चाललेला उपक्रम असून दर वर्षी श्रावण महिन्यात रोज एका ठिकाणी जमून सूर्यनमस्काराची किमान एक आवृत्ती (१२+१ सूर्यनमस्कार) घालणे असा हा उपक्रम आहे. जवळजवळ ४५ ते ५० केंद्रांतून असे नमस्कार घातले जातात. या उपक्रमात जवळपास ५००० आबालवृद्ध सहभागी होऊन अंदाजे ३० लाखांपर्यंत नमस्कार घालतात. त्याशिवाय रथसप्तमीनिमित्त दर वर्षी मंडळाच्या मैदानावर सूर्यनमस्काराची एक आवृत्ती घातली जाते. साधारणतः ६०० ते ७०० जणांचा यात सहभाग असतो.

त्याशिवाय नमस्कार मंडळाच्या स्थापना दिवशी म्हणजेच दर विजया दशमीला मंडळाच्या इमारतीत येऊन सूर्यनमस्कार एक आवृती अनेकजण घालतात. हनुमान जयंतीचा कार्यक्रम मंडळाकडून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मंडळाचा विशेष उपक्रम म्हणजे वर्ष प्रतिपदेला निघणारी नववर्ष स्वागत यात्रा मंडळाच्या मैदानावर विसर्जित होते. गुढी उभारणे व सर्व व्यवस्था करणे मंडळ प्रथमपासून करत आहे. केवळ सूर्यनमस्कार, व्यायाम प्रकार हेच कार्य नाही तर समाजोपयोगी कामेही केली जातात.

मंडळाच्या व्यायामशाळा सामाजिक दृष्टिकोनातून चालविल्या जात असल्यामुळे अत्याधुनिक साधने पुरवूनही अत्यंत कमी शुल्क आकारले जाते, तसेच मंडळाची वास्तू अनेक सामाजिक उपक्रमांना विनामूल्य अथवा माफक दरात उपलब्ध करून दिली जाते. १९३७ च्या सुमाराला भिडे, बोरगावकर यांच्यासारख्या काही दानशूर व्यक्तींनी एक जागा व्यायामशाळेला देऊ केली. त्या जागेवर एक मजली व्यायामशाळेची इमारत उभी राहिली. काही काळाने दुसऱ्या ठिकाणी जागा मिळाल्यामुळे आता नमस्कार मंडळाच्या दोन ठिकाणी व्यायामशाळा चालतात. एका ठिकाणी जवळजवळ अडीचशे मुलं, तर दुसऱ्या ठिकाणी ८० मुलं नित्यनियमाने व्यायाम करायला येत असतात. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एक हॉल बांधला असून त्या ठिकाणी संघाचे विविध उपक्रम आयोजित होतात. संघाची गेली अनेक वर्षे नियमित शाखा ही इथे भरते. संघाचे कार्यकर्ते फिरतीवर इथे आले तर त्यांची निवासाची सोयही इथे उपलब्ध आहे. भारोत्तोलन म्हणजे वेटलिफ्टिंगचं एक वेगळं युनिट हे व्यायाम शाळेचे वैशिष्ट्य आहे. इथे चांगले प्रशिक्षक प्रशिक्षण देत असून अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू या व्यायामशाळेतून घडले आहेत. नमस्कार मंडळ वर्षातील तीन कार्यक्रम गेली अनेक वर्षे सातत्याने आयोजित करते.

एक म्हणजे हनुमान जयंती, दुसरा नमस्कार मंडळाचा स्थापना दिवस म्हणजे दसरा आणि रथसप्तमी. दसऱ्याच्या दिवशी संघ कार्यकर्त्यांची शाखा झाल्यानंतर सर्व कार्यकर्ते सांघिक सूर्यनमस्कार घालतात.
व्यायामशाळेच्या वरच्या मजल्यावर ‘सहजीवन मंडळ’ या संस्थेचं काम सुरू असून त्यांच्यातर्फे संघाच्या विविध संघटनांचे कल्याणमधले कार्य करण्यासाठी पहिला मजला उपलब्ध केला आहे. या ठिकाणी संघातर्फे रुग्णांना विविध उपकरणे तसेच सामग्री अल्प दरात देण्याचा एक उपक्रम राबवला जातो. त्यालाही ‘नमस्कार मंडळ’ सहकार्य करते. इतर सामाजिक कामात, कोविड काळात मदतकार्यासाठी वास्तूचा वापर करायला दिला होता.

नैसर्गिक आपत्तीत निवास केंद्र म्हणून नेहमीच उपलब्ध करून दिली जाते. सर्व खेळ व व्यायाम प्रकारांसाठी मंडळातर्फे तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक केली जाते. श्रीवास गोस्वामी, भारोत्तोलन, महेश पाटील शरीरसौष्ठव व नियमित व्यायाम, मीनल जोशी, दोरी मलखांब, जिम्नॅस्टिक आणि योगासने हे प्रशिक्षक कार्यरत आहेत. तसेच मंडळाचे जुने व्यायामपटूही सहाय्य करीत असतात. यातून अनेक राष्ट्रीय तसेच अांतरराष्ट्रीय पारितोषिक मिळवणारे खेळाडू घडले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही खेळाडूंनी प्रतिनिधित्व केले असून अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यातील उल्लेखनिय नांवे अशोक दीक्षित, संदीप कुलकर्णी, गोस्वामी, कारभारी, सुनील गायकवाड व श्रीमती पल्लवी गुडे गोस्वामी व दीपाली कुळकर्णी यांना तर छत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. दोरीच्या मल्लखांबामधेही अनेक क्रीडापटूंनी पारितोषिके मिळविली असून सुखदा बढे, हर्षाली अमृते, देवश्री बावस्कर व वैभद्री कांगुणे राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत.

यंदा नमस्कार मंडळाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. एखादी व्यायामशाळा शंभर वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करते आणि हजारो सुदृढ युवक घडवते, ही खरंच खूप आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल. या व्यायामशाळेत भारतीय खेळ तसेच भारतीय व्यायाम प्रकार शिकवले जातात. त्यामुळे भारतीय व्यायाम प्रकारांची परंपरा ही पुढे नेण्याचं काम होतं, सुदृढ नागरिक घडतात. भारोत्तोलन म्हणजेच वेट लिफ्टिंग, सूर्यनमस्कार, मल्लखांबाच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर भरवण्याची नमस्कार मंडळाची योजना आहे. त्याशिवाय अति व्यायामामुळे एखाद्या खेळाडूचं निधन झालं अशा बातम्या आपण कधी कधी हल्ली वर्तमानपत्रांत वाचतो. खरं कारण खेळाडू हे अति उत्साहाच्या भरात एक्झर्शन करतात किंवा कधी कधी काही खेळाडू उत्तेजक द्रव्याचे सेवन करतात. काही वेगळे पदार्थ खातात त्यामुळे खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांची व्याख्यानं ठेवण्याचाही नमस्कार मंडळाचा विचार आहे. त्याशिवाय नमस्कार मंडळाचा लक्ष सूर्यनमस्कार अभियान हा जो कार्यक्रम दरवर्षी होतो अंदाजे पंचवीस लाख सूर्यनमस्कार घातले जातात. त्यात कल्याणमधल्या विविध संस्था, शिक्षण संस्था, व्यायामशाळा, महिला मंडळ सहभागी होतात. यंदा शताब्दी वर्षात श्रावण महिन्याच्या कालावधीत एक कोटी सूर्यनमस्कार घालण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी अनेक संस्थांची मदत लागणार आहे. त्यामुळे यासाठी मोठ्या प्रमाणात कल्याणमधल्या अनेक शाळा, संस्थांचा सहभाग घेण्यात येणार आहे. मंडळ स्थापनेची शताब्दी येत्या विजया दशमी म्हणजेच २४ ऑक्टोबर २०२३ पासून चालू होणार असून त्याच दिवशी शताब्दी समारोहाच्या कार्यक्रमांचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला आहे.

शताब्दी समारोहानिमित्त सूर्यनमस्कार १०० आवृत्यांची स्पर्धा, भारोत्तालन, शरीरसौष्ठव, दोरीचा मल्लखांब, तसेच भारतीय व्यायामाच्या स्पर्धाचं व्यापक प्रमाणावर आयोजन करण्यात येणार आहे. १ कोटी सूर्यनमस्कार, तसेच आधुनिक व्यायाम, भारतीय व्यायाम, योगासने यांचा समावेश यात आहे. या मार्गदर्शनपर व्याख्यानांचेही आयोजन करण्यात येणार आहे, असे मंडळाचे उपाध्यक्ष अनिल कुलकर्णी यांनी बोलताना सांगितले.

मंडळाच्या स्थापनेपासूनच मंडळाच्या जडणघडणीत अनेक व्यायामप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता व आहे. कै. दादा चोळकर (संघ प्रचारक), कै. गंगाधरपंत जोशी, कै. नाना आपटे, कै. भाऊ सबनीस, कै. सदानंद (नंदा) फणसे तसेच भास्करराव मराठे, मधुसूदन जोशी, अच्युतराव जोशी ही अग्रगण्य नावे म्हणता येतील. संस्थेचे कार्य अव्याहतपणे व सामजिक जाण ठेवून प्रगतिपथावर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यकर्ते, अधिकारी जातीने लक्ष घालून मार्गदर्शन करीत असतात.

सध्याच्या कार्यकारिणीत नव्या व जुन्या अनुभवी कार्यकर्त्यांचा समावेश असून बहुतेकजण संघ पार्श्वभूमी असलेले आहेत. सर्व सदस्य मंडळाच्या सर्व कार्यक्रमांत उत्साहाने सहभागी होत असून मंडळाची त्यामुळे उत्तरोत्तर प्रगती होत आहे. २०१६ पासून मंडळाची स्वतःची दोन मजली सुंदर अशी वास्तू सर्वांच्या सहभागातून उभी राहिली. कल्याणमध्ये नमस्कार मंडळ माहीत नाही अशी एकही व्यक्ती नसेल.नमस्कार मंडळ ही कल्याणमधली अत्यंत जुनी व लोकप्रिय अशी संस्था असल्यामुळे कल्याणकरांच्या अभिमानाचा विषय आहे. समाजातील सर्व थरातील व्यक्तींचा मंडळाच्या कामाशी काहीतरी कधीतरी संबंध येतोच. मंडळाच्या जडण-घडणीसाठी अनेक देणगीदार व हितचिंतक यांचं सहाय्य असतं तसेच अनेक तरुण मंडळी बलोपासना करून सुदृढ शरीर मिळवत असतात.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -