
मुंबईच्या प्रशिक्षकांकडून घेतले मार्गदर्शन
देवा पेरवी
पेण : गोपाळकाला उत्सव दोन दिवसांवर आला असल्याने पेण तालुक्यातील काही गोविंदा पथक मोठे थर लावण्याच्या सरावाची अंतिम टप्प्याची तयारी करीत आहेत. या गोविंदा पथकांना मुंबई - ठाणे येथील प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण मिळाले आहे. पेण तालुक्यामध्ये गोविंदा पथकाचे मानवी मनोरे थर लावून दहीहंडी फोडण्याच्या १ लाखाच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
पेण पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात १११ सार्वजनिक व २७० खाजगी, वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३५ सार्वजनिक व १५० खाजगी आणि दादर सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४५ सार्वजनिक व ११५ खाजगी अशा पेण तालुक्यात एकूण २९१ सार्वजनिक व ५३५ खाजगी एकूण मिळून ८२६ दहीहंड्या प्राचीन परंपरेनुसार फोडल्या जाणार आहेत.
मुंबईतील लाखांच्या बक्षिसांच्या धर्तीवर आता ग्रामिण भागात देखील अशा स्पर्धा आयोजित केल्या जात असल्याने विविध गावागावात गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली असून सदर सराव सध्या अंतिम टप्प्यात आहे.
पेण तालुक्यातील गडब, दादर, पालखार, आमटेम, कारावी, कासु, वाशी, भाल, बळवली, जिते, रावे आदी गावांतील गोविंदा पथकांनी कसून दहीहंडी सराव केला आहे. तर बालमित्र गोविंदा पथक गडबला मार्गदर्शन करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ माजगाव, दक्षिण विभाग ताडवाडी मुंबई गोविंदा पथकाचे प्रशिक्षक गणेश चव्हाण हे मार्गदर्शन करत आहेत. बालमित्र गोविंदा पथकाने गेल्या वर्षी सात थर आणि यावर्षी आठ थरापर्यंत मानवी मनोरे रचण्याचा सराव केला आहे. त्यामुळे हा गोविंदा पथक पेण शहरासह, अलिबाग, पनवेल, नवी मुंबई येथे गोविंदा स्पर्धेत भाग घेण्यास तयार झाला आहे. यंदा वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळ यांनी जोहे-हमरापूर विभागात तर ललित पाटील मित्र मंडळ यांनी पेण शहरात १ लाख ११ हजार १११ रुपयांची दहीहंडी आयोजित केली आहे.
पेण परिसरातील गोविंदा पथकांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून खरी रंगीत तालीम सुरू केली आहे. पेण शहरात कोळीवाडा, गुरवआळी, बाजारपेठ नगरपालिका नाका, रामवाडी, चिंचपाडा, विठ्ठल आळी, तरे आळी, नंदिमाळ नाका, चावडी नाका, आदींसह अनेक भागात गोविंदा मोठया उत्साहात साजरा केला जातो. तर अष्टविनायक मित्र मंडळ, ओरिजनल अष्टविनायक क्रीडा मंडळ, शिवकन्या महिला मंडळ, साई मित्र मंडळ, गोल्डन ग्रुप, वैकुंठ रविशेठ पाटील मित्र मंडळ, ललित पाटील मित्र मंडळ आदी गोविंदा पथके सराव करीत आहेत. हा सराव पाहण्याकरीता आजूबाजूचे नागरिकही मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. दिवसभरातील सर्व कामे पूर्ण झाल्यावर रात्री नऊ वाजता गोविंदा थर लावण्याचा सराव करीत आहेत. १७ ते १८ दिवसाच्या सरावानंतर गोविंदा पथक तयार होत असल्याचे पथकांच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई आणि पुण्याप्रमाणेच दहीहंडीला पेण परिसरातही ग्लॅमर आल्याने सात ते आठ थरांपर्यंत दहीहंडी जाऊ लागली आहे. मोठ्या रकमेच्या मोहापायी आणि ईष्येपोटी लहान मुलांना सातव्या आणि आठव्या थरावर दहीहंडी फोडण्यासाठी वापर होउ लागला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाचा उंचीचा दंडक
दहीहंडी खेळातील धोके कमी करण्यासाठी काहींनी चिंता व्यक्त केल्या आहेत. काही मंडळींनी थेट न्यायालयात धाव घेतली. २० फुटाच्या वर दहीहंडी बांधू नये, असे आदेश या आधी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्याने यंदा आयोजक उंचीचे पालन करतात की नाही, याकडे लक्ष लागले आहे.
- दहीहंडी संयोजक आणि गोविंदा पथकांनी सहभागी स्पर्धकांची जबाबदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
- प्रत्येक खेळाडूचा वैयक्तिक विमा काढल्याचे हमीपत्र संघ व्यवस्थापकांना देणे आवश्यक केले आहे.
- स्पर्धेचा विमा काढण्याचे बंधनही आयोजकांवर घालण्यात आले आहे. त्यानुसार संयोजक आणि आयोजकांची तयारी केली आहे.
- पोलिसांनी आगोदरच बैठक घेऊन याकरिता तयार करण्यात आलेल्या आचारसंहितेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीत राहून उत्सव साजरा करण्याची सूचना मंडळांनी दिली आहे.
लहान गोविदांचा शोध सुरू
साहसी खेळाला मान्यता दिल्याबद्दल गोविंदा पथकांनी सरकारचे स्वागत केले आहे. १२ वर्षाखालील मुलांचा गोविंदा पथकात समावेश करू नये. असे कोर्टाने स्पष्ट निर्देश दिल्याने गोविंदा पथके १२ वर्षांवरील गोविंदाचा शोध घेत आहेत. १२ ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांना सहभागी करून घेण्यासाठी त्यांच्या पालकांच्या ’ना हरकत प्रमाणपत्राची' सक्ती केली आहे. सरकारने केलेल्या सूचना व नियमांची माहिती अद्याप गोविंदा पथकांपर्यंत पोचली नसली, तरी नियमाप्रमाणे दहीहंडी फोडू, अशी भूमिका गोविंदा पथकांनी मांडली आहे. फक्त उंचीचा निर्णय संयोजक कसा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.