
लाहोर: आशिया चषकात (asia cup 2023) अफगाणिस्तान (afganistan) आणि श्रीलंका (srilanka) यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. विजयाचा घास अफगाणिस्तानच्या तोंडाजवळ आला होता. मात्र शेवटची विकेट पडली आणि श्रीलंकेने तो घास हिरावून घेतला.
शेवटच्या क्षणी अफगाणिस्तान जिंकेल असे वाटत होते. अफगाणिस्तानला विजयासाठी ३ धावा हव्या होत्या. त्यात शेवटचे दोन फलंदाज क्रीझवर होते. अफगाणिस्तानकडे चेंडूही भरपूर होते. मात्र त्यांची शेवटची विकेट पडली आणि अफगाणिस्तानच्या विजयी होण्याच्या स्वप्नावर पाणी फिरले.
श्रीलंकेने अफगाणिस्तानवर दोन धावांनी विजय मिळवला. श्रीलंकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ८ बाद ९१ धावा केल्या. त्यानंतर अफगाणिस्तानला विजयासाठी २९२ धावांचे आव्हान दिले होते. सुपर ४ फेरीत पोहोचण्यासाठी श्रीलंकेला या सामन्यात अफगाणिस्तानला काहीही करून हरवायचे होते.
श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने ९२ धावांची जबरदस्त खेळी केली. तर सलामीवीर पाथुम निसांकाने ४१ धावा केल्या. दिमुथ करूणारत्नेला ३२ धावांची खेळी करता आली.बाकी इतर फलंदाज अपयशी ठरल्याने श्रीलंकेला २९१ धावा करता आल्या.
प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. त्यांचे पहिले दोन सलामीवीर स्वस्तात परतले. गुलबदीन नाईबने २२ धावा केल्या. रेहमत शाहने ४५ धावा केल्या. हश्मतुल्लाह शाहिदीने ५९ धावा केल्या तर मोहम्मद नबीने ६५ धावांची खेळी केली.