मुंबई: आशिया चषक २०२३बाबत (asia cup 2023) एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेदरम्यानच आशियाई क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये होणाऱ्या फायनलसह सुपर ४ मधील सर्व सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट करण्यात आले आहेत.
सामने शिफ्ट करण्याबाबत पल्लेकल आणि दांबुला या ठिकाणचा विचार केला जात होता. मात्र आता हे सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट करण्यात आले आहेत. कोलंबोमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील काही दिवस या ठिकाणी सतत मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. याच कारणामुळे एसीसीने येथील सामने दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले आहेत.
१७ सप्टेंबरला रंगणार फायनल सामना
श्रीलंकेचे शहर हम्बनटोटा हे दक्षिणेला आहे. हे ठिकाण कोरडे असते. तर कोलंबोमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. पल्लेकल आणि दाम्बुलामध्येही पावसाची शक्यता आहे. अशातच एसीसीने कोलंबोमधील सर्व सामने हम्बनटोटा येथे शिफ्ट केलेत. आता आशिया चषकातील सर्व सामने तसेच फायनलचा सामनाही याच मैदानावर रंगणार आहे.
भारत-पाकिस्तान दुसरा सामनाही याच मैदानावर
आशिया चषक २०२३मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ सप्टेंबरला सामना रंगला होता. मात्र पल्लेकल स्टेडियममध्ये पाऊस झाल्याने सामना मध्येच रद्द करावा लागला. या सामन्यात भारताने बॅटिंग केली होती. मात्र पाकिस्तानच्या संघाला फलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही.
भारत जर आशिया चषकमध्ये सुपर ४ साठी क्वालिफाय झाला तर भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रंगू शकतो. हा सामना १० सप्टेंबरला कोलंबोमध्ये होणार होता मात्र आता हा सामना हम्बनटोटा येथे खेळवला जाणार आहे.