
नितेश राणे यांचा सवाल
मुंबई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M. K. Stalin) यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी सनातन धर्मावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांनी सनातन धर्मांची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली. त्यांच्या वक्तव्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर भाजपाकडून टीका करण्यात येत आहे. मात्र ते आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील जोरदार शब्दांत विरोधकांच्या आघाडीला सुनावले आहे. स्वतःला हिंदू म्हणवून घेता मग स्टॅलिनविरुद्ध बोलून दाखवा, असा इशाराच नितेश राणे यांनी दिला आहे.
नितेश राणे म्हणाले, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिनच्या कार्ट्याने सनातन हिंदू धर्म संपवून टाकू, असं बोलण्याची हिंमत दाखवली. या कार्ट्याला हे माहित नाही की जे ब्रिटिशांना जमलं नाही, जे औरंग्या आणि मुघलांना जमलं नाही ते तुला आणि घमंडियाच्या नावाने जमलेल्या सर्व पक्षांपैकी कोणालाही जमणार नाही. तो कार्टा हे विसरला की आमचे सगळे पूर्वज हे हिंदू होते. जो स्वतःच्या धर्माचा झाला नाही तो देशाचा आणि राज्याचा काय होणार? आणि स्वतःला 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा मी मुलगा आहे' असं जे बोलत फिरतात ते उद्धवजी ठाकरे (Uddhav Thackeray) हे सनातनी हिंदू धर्मावर जे आक्रमण होत आहे त्यावर बोलण्याची हिंमत दाखवणार का? का चिडीचुप बसला आहात? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
पुढे उद्धव ठाकरेंना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही हिंदू आहात ना? हिंदुत्वाचं सर्टिफिकेट सगळ्यांना देत फिरता मग स्टॅलिनच्या कार्ट्याविरोधात बोलण्याची हिंमत दाखवा. काही दिवसांअगोदर ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये स्टॅलिनची सेवा करत होता ना? खायला घालत होता, पाय दाबत होता! त्यामुळे तो सनातनी हिंदू धर्माचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर त्याच्याविरुद्ध बोलण्याची हिंमत स्वतःला हिंदू म्हणवून घेणाऱ्या या सगळ्या विरोधी पक्षांमध्ये आहे का? असा सवाल नितेश राणे यांनी विचारला आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले की, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर उद्याचा अग्रलेख स्टॅलिनच्या कार्ट्यावर लिही, उद्याचा अग्रलेख सनातन हिंदू धर्माच्या समर्थनार्थ लिही. हिंदुत्वाचं मुखपत्र म्हणून चालवता ना? मग त्या स्टॅलिनच्या कार्ट्याला विरोध करण्याची हिंमत दाखवा आणि सनातन हिंदू धर्माचं समर्थन करण्याची हिंमत दाखवा, असं आवाहन नितेश राणे यांनी केलं आहे.