
इस्त्रो शास्त्रज्ञ वलरमथी यांचं निधन
चेन्नई : भारत (India) हा १.४ अब्ज लोकसंख्येचा देश आहे, तरीही काही लोकांचे आवाज लोकांच्या मनात अनंतकाळ कोरलेले आहेत. काही अभिनेते, अभिनेत्री, ख्यातनाम व्यक्तिमत्त्वं अशा अनेक लोकांचे आवाज आपल्या कायम लक्षात राहतात. अशातच भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहिम जिने भारताचं नाव अख्ख्या जगात मोठं केलं, ज्याचा आनंद आपण दरवर्षी साजरा करणार आहोत अशा चांद्रयान-३ (Chandrayaan 3) मोहिमेतील प्रक्षेपणावेळी अत्यंत महत्त्वपूर्ण काऊंटडाऊनचं काम करणार्या शास्त्रज्ञाचा आवाज आपल्या का लक्षात राहणार नाही? प्रत्येत भारतीयाने अगदी कान देऊन तो आवाज ऐकला होता. प्रत्येकाचंच लक्ष तेव्हा प्रक्षेपणाकडे होतं आणि छातीत धडधड वाढली होती. पण हाच भारतीयांची धाकधूक वाढवणारा इस्रो रॉकेट प्रक्षेपण काउंटडाउनमागील प्रतिष्ठित आणि शक्तिशाली महिला आवाज अनंतकाळासाठी नाहीसा झाला आहे. या आवाजामागील इस्त्रोच्या शास्त्रज्ञ वलरमथी (ISRO scientist Valarmathi) यांचं शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं.
गेल्या काही दिवसांपासून वलरमथी यांची प्रकृती खालावली होती. शनिवारी संध्याकाळी तमिळनाडू येथे चेन्नईतील अरियालुरमधील एका खाजगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. इस्रोच्या प्री-लाँच काउंटडाउन घोषणांना त्यांचा आवाज असायचा. १४ जुलै रोजी लॉन्च झालेल्या चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळी त्यांचा आवाज होता. ३० जुलै रोजी जेव्हा PSLV-C56 रॉकेटने ७ सिंगापूर उपग्रह प्रक्षेपित केला तेव्हा त्यांनी शेवटची घोषणा केली होती. सतीश धवन स्पेस सेंटरमधील रेंज ऑपरेशन्स प्रोग्राम ऑफिसचा एक भाग म्हणून त्या गेल्या सहा वर्षांपासून किंवा त्याहून अधिक काळ सर्व प्रक्षेपणांसाठी काउंटडाउन घोषणा करत होत्या.
वलरमथी यांच्या निधनाबद्दल इस्रोने दुखः व्यक्त केलं आहे. श्रीहरीकोट्टा येथे इस्रोच्या भविष्यातील मिशन्सच्या काऊंटडाऊनमागे वलरमथी मॅडम यांचा आवाज ऐकू येणार नाही, याबद्दल सोशल मीडियावर त्यांना मोठ्या संख्येने श्रद्धांजली वाहिली जात आहे.