
नवी दिल्ली : आशिया चषक २०२३मध्ये (asia cup 2023) भारताने आपल्या अभियानाची सुरूवात केली आहे. संघाने शनिवारी २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळला. मात्र हा सामना पावसाने धुतला. पावसामुळे हा सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला.
हा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानचा संघ सुपर ४ मध्ये पोहोचला आहे. ग्रुप एमध्ये पाकिस्तानचे ३ गुण आहेत. तर भारतीय संघाकडे एकच गुण आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागल्याने त्यांचे एकही गुण नाहीत.
सामना रद्द झाल्यास भारतीय संघ पात्र ठरणार
आता भारतीय संघ दुसरा सामना नेपाळविरुद्ध खेळत आहे. हा सामना सोमवारी पल्लेकल येथे खेळवला जाईल. जर हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास ते सुपर ४मध्ये पोहोचतील. मात्र पल्लेकलचे हवामान खूप खराब दिसत आहे.
सोमवारी पल्लेकलमध्ये ८९ टक्के पावसाची शक्यता आहे. अशातच सामना रद्द होण्याची शक्यता आहे. जर असे घडले आणि पावसामुळे सामना रद्द झाला तर काय होणार असा प्रश्न भारतीय चाहत्यांच्या मनात असेल. जर हा सामना रद्द झाला तर भारत आणि नेपाळला १-१ गुण दिला जाईल. अशा स्थितीत भारताचा संघ सुपर ४मध्ये क्वालिफाय करेल.