मुंबई : मुंबईत एअर होस्टेस म्हणजेच हवाई सुंदरीची गळा चिरून हत्या (crime) झाल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुंबईतल्या पवई भागातील मरोळ येथील एन जी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीमध्ये ही घटना घडली. रुपल ओगरे असे मृत एअर होस्टेसचे नाव आहे. ती मूळची छत्तीसगडची राजधानी रायपूर येथील होती. सध्या ती मुंबईत भाड्याने राहत होती.
रुपल ओगरे हिच्यासोबत तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्सही राहत होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार, हत्या झाली त्या दिवशी रुपल घरात एकटीच होती. तिची बहीण व इतर फ्लॅटमेट्स गावी गेल्यामुळे तिच्यासोबत घरी कुणीच नव्हते.
तिच्या कुटुंबीयांनी तिला अनेकदा कॉल केला. पण ती त्यांच्या फोनला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे काळजीपोटी त्यांनी तिच्या एका मैत्रिणीला फोन करून तिची माहिती काढण्यास सांगितले. त्यानंतर तिची मैत्रीण तिच्या घरी पोहोचली. तिने बराच वेळ दार ठोठावून पाहिल्यानंतरही तिला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे तिने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तिच्या पायाखालची वाळूच सरकली. रुपलचा मृतदेह गळा चिरल्याच्या स्थितीत फ्लॅटमध्ये पडलेला होता. त्यानंतर या प्रकरणाची माहिती तत्काळ पवई पोलीस व गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दरम्यान, २३ वर्षीय हवाई सुंदरी हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. हत्येप्रकरणी इमारतीत सफाईचे काम करणाऱ्या इसमाला पवई पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पवई पोलीस करत आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra