Saturday, July 20, 2024

Teacher : शिक्षक

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

आजच्या शिक्षकांपुढे अनेक टास्क आहेत. बालमनावर चांगले परिणाम व्हावे लागतात ते नाही झाले, तर ती कसर भरून काढणे खूप अवघड जाते. हेच अवघड काम शिक्षक प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत असतो.

जवळपास १०० वर्षांपूर्वी इटलीमध्ये एक खुनाची घटना घडली होती. एका प्रौढ माणसाने खून केला होता. त्यावेळी मारिया माँटेसरी म्हणाल्या होत्या, या माणसाला असं वाईट वागावेसं वाटलं, याचा अर्थ त्याच्या बालपणी लावलेलं वळण चुकलं आहे. बालपणी नीट वळण लागावे या गरजेतून मारियाने पहिल्या बालवाडीच्या स्थापना केली. बालमनावर चांगले परिणाम व्हावे लागतात, ते नाही झाले, तर ती कसर भरून काढणे खूप अवघड जाते. हेच अवघड काम शिक्षक प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करीत असतो.

आजच्या शिक्षकांपुढे अनेक टास्क आहेत. बदललेली कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, तंत्रज्ञान, मासमीडिया, बालक-पालकांची वागणूक, अपेक्षा, वेगवेगळ्या स्तरातून येणारी मुले, थोडक्यात आजचं जगणंच बदलंय. हे सारं लक्षात घेऊन अभ्यासक्रमासह इतर कामासहित मुलांना समजून घेत, शिक्षक जादा कष्ट, वेळ देत त्याच्यातील सुप्त गुण शोधण्याचा प्रयत्न करतात. आज मुलांसमोर उभे राहणे हेही सोपे नाही. मुलांचे कौतुक करताना शिक्षकांच्या समस्यांचा विचार होत नाही. असो!

प्रत्येकाच्याच आयुष्यात शालेय कालखंड महत्त्वाचा असतो. शाळेत विषयागणिक शिक्षक वेगळे. प्रत्येकाची शिकविण्याची पद्धत, वर्तणूक, वागणूक, विचार, सवयी या साऱ्यांचा विद्यार्थ्यांवर परिणाम होत असतो. काही शिक्षक विद्यार्थ्यांचे आदर्श होतात. अर्थात शिक्षकानेही पूर्वग्रहदूषिताने कोणत्याही मुलाकडे पाहू नये. फूल फुलण्याआधीच त्याला उपटून फेकून देऊ नये, त्यासाठी शिक्षकी पेशा नाही. शिक्षण हे मुलांच्या विकासासाठी असते.

५ सप्टेंबर, शिक्षक दिनानिमित्ताने शालेय शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे अनेकांच्या आयुष्याला निर्णायक वळण लागते. त्याचे काही अनुभव शेअर करते.

अंदाजे ६० वर्षांपूर्वी सोलापूर जिल्ह्यांत करमाळा गावी शाळेची पटसंख्या भरण्यासाठी मुलांना उचलून शाळेत आणत. त्यातल्याच एका मुलाची पहिली झाली. दुसऱ्या वर्षी गैरहजर? घरी शिक्षणाचे महत्त्व नसल्याने शेळ्या राखायला तो जात असे. पुन्हा उचलून शाळेत आणले. शेळीच्या मागे धावण्यापेक्षा सुरक्षित सावलीत बंदिस्त जागेत बसायला मिळते, हे मुलाला आवडले. त्याशिवाय शिक्षिकेचे आईच्या मायेने गोड बोलण्यामुळे अभ्यासाची गोडी लागली. त्याचे भाऊ पळून जात. करमाळा महात्मा गांधी विद्यालयात शिक्षकांनाही त्याच्या अभ्यासात लक्षणीय प्रगती दिसत होती. माध्यमिक शाळेसाठी मुख्याध्यापक स्वतः त्याला सोलापूरला घेऊन गेले. ११वीत पहिला आल्याने शिक्षकांनी स्वतः पैसे काढून फर्ग्युसनला नेले. मार्कामुळे प्रवेश मिळाला. ज्ञानेश्वर हॉस्टेल मिळाल्याने सारे मोफत. नॅशनल स्कॉलर्सशिप मिळाली. तरीही या मुलाने त्याच्या अडनिड्या वयात मजा न करता अभ्यासात मेरिट कायम ठेवले. शासकीय आरोग्य खात्यांत सिव्हिल सर्जन पदापर्यंत पोहोचले. माझ्या जीवनात शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे. त्यांनी मला घडविले, वाढविले. त्याची कृतज्ञता म्हणून ते ज्या करमाळ्यात वाढले तेथेच राहून तेथील लोकांना वैद्यकीय सेवा देत आहेत. ते स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. महेंद्र नगरे! शिक्षकाच्या शिकविण्यामुळे एखादा विषय आवडतो नि ते विद्यार्थ्यांचे करिअर बनते याची अनेक उदा. आहेत. रोज रात्री वडिलांसोबत श्लोकाच्या पठणामुळे बालवयातच शोभाला संस्कृतची ओळख होती. ९वीमध्ये पार्ले टिळकमध्ये प्रवेश घेतल्यावर तीन वर्षे ना. सी. पेंढारकर सरांच्या शिकविण्यामुळे संस्कृतमध्ये प्रचंड गोडी निर्माण झाली. ११वीत संस्कृतमध्ये गुण कमी मिळाल्याने सरांना न भेटता, पदवी परीक्षेत विद्यापीठात प्रथम आल्यावर पेढे घेऊन पेंढारकर सरांकडे गेली. संस्कृतमध्ये डॉक्टरेट करून क्रमाने वरच्या पायऱ्या चढत (शोभा) डॉ. गौरी माहुलीकर, केरळ येथील चिन्मय विश्व विद्यापीठाची कुलगूरू, नंतर ३ वर्षे डीन आणि आज विद्यापीठात अॅकॅडेमिक विभागात कार्यरत आहेत. त्या म्हणतात, सरांच्या शिकविण्यामुळे आज मी येथे आहे.

वयात येत असलेले विद्यार्थी आपल्यासमोर ६ तास एकाच बाकावर बसलेले असतात. त्यामुळे शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व हसरे व तोंडी कौतुकाचे, प्रोत्साहनचे शब्द असावेत. त्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. गिरीजा किर लिहितात, गुरुवर्य न. र. फाटक प्रश्न विचारताना विद्यार्थ्यांकडून उत्तरे काढून घेत. मी एकदा तुकोबाचा अभंग उद्धृत केला असता सर हसून म्हणाले, “तुका काय म्हणतात हे मी वाचलंय, तुम्ही काय म्हणताय ते सांगा”. “पण सर, आमच्या म्हणण्याला विचारतो कोण?” का बरं? “जे बोलायचे ते विचार व अभ्यास करून बोला नि जगापुढे ठोसपणे मांडा. “त्या दिवशी सरानी, आपल्यालाही स्वतंत्र अस्तित्व आहे याची जाग दिली. एकदा व्याख्यानानंतर संदेश मागायला त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी सांगितले, “केव्हातरी तुम्ही संदेश देणाऱ्या व्हा”.

मुलांचे वय इयत्तेनुसार असते; परंतु शिक्षक दरवर्षी वयाने, अनुभवाने मोठा होत असतो हे शिक्षकांच्या वागणुकीतून दिसणे आवश्यक आहे. विद्यार्थांच्या चुकीला माफी असते. याचे उदा – क्रिकेट आणि स्क्वॅश खेळाच्या आकर्षणामुळे दत्तूने ६वी शाळा सोडली व पुना क्लबवर मिळेल ते काम करून, दुपारी कोणी नसताना केवळ निरीक्षणातून गुपचूप स्क्वॅश खेळायचा. वडिलांनी पहिले, कौतुकही केले. नंतर कोचच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करत मातब्बर खेळाडूंसोबत जिंकत वृत्तपत्रांत नाव झाले. कॅनडातून स्क्वॅश खेळासाठी ऑफर आली. अपुरे शिक्षण, इंग्रजी येत नसल्यामुळे दत्तू आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांना भेटला. अत्रे सरांनी आठ वर्षांपूर्वी शाळा सोडलेल्या दत्ताजी शिंदेला म्हणाले, तुझ्यात स्क्वॅश खेळाचे कौशल्य आहे. आमच्या शाळेचा खेळाडू आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवतो, याचा आम्हाला अभिमान आहे. कोणत्याही नियमावर बोट न ठेवता म्हणाले, “काळजी करू नकोस, कोणत्याही वर्गात बस, मन लावून शिक आणि खूप खेळ.”

असा हा शिक्षकी पेशा! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर प्राथमिक शाळेतल्या शिक्षकाने केलेल्या अपार प्रेमामुळे बाबासाहेबांनी आपले मूळ आडनाव बदलून शिक्षकाचे लावले.

६४ वर्षांपूर्वी ओरिसातील दुर्गम भागांत जन्मलेल्या मुलीचे पुत्ती हे नाव शाळेत घातल्यावर शिक्षक मदन मोहन यानी बदलून द्रौपदी अशी नोंद केली. “द्रौपदी मुर्मू” ज्या आज आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती आहेत.

आज समाजाने शिक्षकाची भूमिका समजून घेतल्यास शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावेल. जागतिकीकरणाच्या दिशेने झेपावणाऱ्या जगात आपण राहतो. तेव्हा शिक्षकांनी भारतीय विद्यार्थ्यांत वैश्विक मानसिकता विकसित करावी. मग “फक्त लढ म्हण” ही कवितेची ओळ न राहता आयुष्याचे सूत्र बनते.

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -