Sunday, July 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलअंतराळ वेधशाळा

अंतराळ वेधशाळा

  • कथा : प्रा. देवबा पाटील

अंतराळ वेधशाळा म्हणजे अवकाशाचे निरीक्षण करण्यासाठी तयार केलेली पृथ्वीवरील प्रयोगशाळा असते.खगोलांचे निरीक्षण करण्यासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळेला ‘खगोल वेधशाळा’ म्हणतात, तर हवमानाचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळेला ‘हवामान वेधशाळा’ म्हणतात.

संदीप व दीपा हे अवकाशयात्री भाऊ-बहीण यक्षाच्या यानातून अंतराळात फेरफटका मारीत होते. त्यासोबत त्यांची यक्षाजवळ विविध प्रकारची चौकशीही सुरू होती.

“अंतराळ फिरती वेधशाळा म्हणजे काय? ती कशासाठी वापरतात?” संदीपने प्रश्न केला.

“वेधशाळा म्हणजे अवकाशाचे निरीक्षण करण्यासाठी तयार केलेली पृथ्वीवरील प्रयोगशाळा” दीपा सांगू लागली व यक्ष कौतुकाने तिच्याकडे बघू लागला. “या वेधशाळांमध्ये खगोलांचे, ग्रहता­ऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी दुर्बिणी व दुरेक्ष्य बसवलेले असतात. तसेच हवामानाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक उपकरणे बसवलेली असतात. खगोलांचे निरीक्षण करण्यासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळेला खगोल वेधशाळा म्हणतात, तर हवामानाचा अभ्यास करण्यासाठी तयार केलेल्या प्रयोगशाळेला हवामान वेधशाळा म्हणतात. बरोबर ना यक्षकाका?” दीपाने यक्षाला विचारले.

“बरोबर आहे बेटा.” यक्ष कौतुकाने म्हणाला “खगोलांचा जास्त जवळून आणखी सविस्तर व खूप सखोल अभ्यास करता यावा यासाठी सर्व सुसज्ज उपकरणांसह अशाच वेधशाळा अंतरिक्षातसुद्धा फिरत्या ठेवल्या आहेत. त्यांना फिरत्या अंतराळ वेधशाळा म्हणतात. संशोधक तेथे जाऊन खगोलांचा, ग्रहताऱ्यांचा अभ्यास करतात.”

“या फिरत्या अंतराळ वेधशाळेवर व अवकाशस्थानकावर मग संशोधक कसे काय जाणे-येणे करतात?” संदीपने विचारले. “अवकाशविमानाबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का?” यक्षाने विचारले.

“नाही.” दोघेही बहीण-भाऊ उत्तरले.

“अवकाशस्थानकावर वा अंतराळ वेधशाळेवर काम करण्यासाठी नेहमी जाणे-येणे करणा­ऱ्या संशोधकांच्या प्रत्येक तुकडीस तेथे जाताना उड्डाणासाठी प्रत्येकवेळी नवे उड्डाणयान वापरावे लागत असे. ही फार खर्चिक बाब होती. तसेच उपग्रहांची संख्याही खूप वाढली व नवीन उपग्रह आकाशात सोडण्यासाठी प्रत्येक वेळी नवे उड्डाणयान बनविण्यासाठीही खूप खर्च येऊ लागला. त्यावर उपाय म्हणून व संशोधकांना पृथ्वीवरून अंतराळस्थानकावर वा अंतराळ वेधशाळेवर जाणे-येणे करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अवकाशयानाचे व विमानाचे तंत्र वापरून छोटेसे अंतरिक्षवाहन म्हणजे अवकाशविमान तयार केले. हे अवकाशविमान अग्निबाणाच्या साहाय्याने अंतराळात सरळ उभे उड्डाण करते व विमानासारखे हवेत आडवे तरंगत खाली येते नि अवकाश संशोधन केंद्राच्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरते. ते वारंवार वापरताही येते, त्यामुळे खर्चाची खूप बचत होते.” यक्ष म्हणाला. “अवकाशातील फेरीबोटीबद्दलसुद्धा आम्ही ऐकले आहे. तिच्याविषयीही आम्हाला काही माहिती सांगा काका.” दीपा म्हणाली.

यक्ष म्हणाला, “अवकाशविमानासारखीच अवकाश फेरीबोट अवकाशात फे­ऱ्या मारण्यासाठी वापरतात. ती अवकाशात जा-ये करू शकते. या अवकाश फेरीबोटीत अंतराळवीरांसाठी सर्व सुविधा केलेल्या असतात. त्यातून अवकाशयात्री, संशोधक अवकाश स्थानकावर जा-ये करू शकतात. अवकाश स्थानकावरून एखाद्या अवकाशयानावरही जाऊ शकतात. आपले काम करून परतही येऊ शकतात.”
असे ते यक्षाकडून आपल्या सा­ऱ्या शंकांचे निरसन करून घेत होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -