
फसलेला बेत
ठरवले मी या रविवारी,
आरामात उठणार
घड्याळाच्या काट्यावर,
मुळीच नाही पळणार
बिछान्यात शिरून,
मनसोक्त लोळणार
मैदानावर सुद्धा मी,
हवे तेवढे खेळणार
बागेतल्या गुलाबांशी,
गप्पाही मारणार
तबला, पेटी, गाण्यात,
मस्त रंग भरणार
रविवारचे हे बेत सारे,
मीच केले पास
रविवार हा असेल माझा,
एकदम झकास!
पण रविवार उजाडला,
मोठ्या नाखुशीने
पाहुणे झाले हजर,
सकाळच्याच गाडीने
घाई, गडबड आवाजाने,
घर गेलं भरून
झोप माझी पळाली,
बसलो डोकं धरून
पाहुण्यांची सरबराई,
करण्यात वेळ गेला
बेत माझे सारेच, अहो,
पडले बाजूला
पाहुण्यांचं बोलणं ऐकून,
मी तर चक्रावलो
म्हणे, “आज रविवार,
म्हणून मुद्दामच आलो.”
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) छाताडावरून याच्या,
नौका फिरे डौलात
सूर्याच्या उष्णतेने,
तापून जाई ढगात
पृथ्वीवरील खारे पाणी,
पोटात तो घेई
भरती-ओहोटीचा,
अनुभव तो देई
सिंधू, रत्नाकर, जलधी, पयोधी
याची हीसुद्धा, नावे बघा किती
मासे, मीठ, मोती, इंधनही देतो
लाटालाटांतून, कोण उसळतो?
२) उन्हाळ्यात हमखास, भेटीला येते
खाईल त्याला तो, थंडावा देते
तहानलेल्यांची, तहान भागवते
थकवा जाऊन, पोटही भरते
टरबूज, खरबूज, याचे जोडीदार
याच्या आत मात्र, काळ्या बिया फार
वरून हिरवा, लालेलाल आत
आरोग्याला देई, कोण बरं साथ?
३) कापूस अंगातून भरून वाहतो
वेगवेगळे आकार तो क्षणात घेतो
उंचावर राहून तो फिरताना दिसतो
गडगडाट करून कोण बरं हसतो?