सजग पालकत्व ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. संस्कारक्षम, आनंदी मुले घडविण्यासाठी पालकांनाही जाणीवपूर्वक परिश्रम करायला लागतात. आधुनिक काळात बदललेल्या जीवनमानामुळे आई-वडील मुलांना मुबलक वेळ देऊ शकत नाहीत; परंतु यातूनही काही पालक मुलांना क्वालिटी टाइम देण्याचा प्रयत्न करतात. जेणेकरून मूल एक जबाबदार नागरिक बनू शकेल.
आधुनिक काळात सजग पालकत्व ही संकल्पना समाजात काही अंशी रुजू लागली आहे. पूर्वीच्या काळी घरात सहा-सात भावंडे असायची. त्यांच्यासोबत खेळताना-बागडताना, एकत्र अभ्यास करताना, प्रार्थना म्हणताना दिवस कसा भुरर्कन उडून जात असे; परंतु हल्ली घराघरात एक किंवा दुसरे मूल असते. त्यातही आई-वडील दोघेही नोकरी करणारे असतील, तर ते आपल्या पाल्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी दोनच पर्याय उरतात. ते म्हणजे अगदीच लहान मूल असल्यास त्याला पाळणाघरात ठेवणे अन्यथा दहा/बारा तासांची मुलांना सांभाळण्यासाठी घरात बाई लावणे. तरीही बरेचदा आपण आपल्या पाल्याला हवा तितका वेळ देऊ शकत नाही, अशी खंत पालकांना वाटते. ही उणीव भरून काढण्यासाठी शनिवार-रविवार व सुट्टीच्या दिवसांत अनेक लहान-मोठे कार्यक्रम आखले जातात. जसे की मुलांना घेऊन एखाद्या निसर्गरम्य स्थळी जाणे, समुद्रकिनाऱ्यावर खेळायला किंवा बागेत फिरायला जाणे अशा गोष्टींतून मुलांनाही विरंगुळा मिळतो. त्यांच्याही दररोजच्या साचेबद्ध जीवनात काहीसा बदल होतो.
संस्कारक्षम, आनंदी मुले घडविण्यासाठी पालकांना सुद्धा जाणीवपूर्वक परिश्रम करायला लागतात. त्यामुळे येणाऱ्या काळातील पिढी निराशेपासून दूर, उत्साही, जीवनातल्या लढाया पेलवण्याची क्षमता असलेली बनू शकते. हल्लीच्या काळात करमणुकीच्या साधनांची मुबलकता लक्षात घेता, भोवतालच्या परिस्थितीचे कुतूहल, औत्सुक्य कमी होऊन मुले नैराश्याची शिकार होण्याचे प्रमाण नक्कीच वाढते आहे.
पूर्वीच्या काळात आजच्या तुलनेत लोकांकडे शेतीभातीचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे निसर्गाचे केलेले अवलोकन, प्राणी-पक्ष्यांची जवळीक, त्यांचे अटीविरहीत प्रेम या ओढीतून, शेतात केलेल्या कष्टांतून मुलांवर प्रेम, करुणा, कष्टं, सहनशीलता या जीवनमूल्यांचे संस्कार व्हायचे. त्यामुळे पुन्हा एकदा या मूल्यांची जाणीव पालकांनी मुलांमध्ये रुजविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जुन्या काळातही काही पालकांनी आपल्या मुलांना सजग, जाणीवपूर्वक वाढविले व घडविले. आपणा सर्वांना ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगालमधील एक थोर समाजसुधारक, संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक माहीत असतीलच. १८२० ते १९०१ हा त्यांचा कालखंड. प्रथम ते शिक्षक होते. पुढे त्यांनी प्राचार्यपद भूषविले. त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता. भारतभर स्वातंत्र्य चळवळ पसरली होती.
त्या काळी समाजसुधारणेचे व्रत हाती घेतलेल्या ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी केली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला. ईश्वरचंद्र यांना घडविण्यात त्यांच्या मातेचे योगदान मोठे आहे. त्यांच्या आईचे नाव भगवतीदेवी बंदोपाध्याय व वडिलांचे नाव ठाकूरदास. ठाकूरदासांचे कुटुंब तसे दरिद्री. ईश्वरचंद्रांच्या आई स्वभावाने अतिशय दयाळू होत्या. भगवतीदेवी मुलांच्या अभ्यासाकडे जातीने लक्ष देत. आईच्या वागण्या-बोलण्यातून-कृतीतून हा गुण ईश्वरचंद्र यांच्यात उतरला. त्यांची आई बाणेदार होती. भगवतीमाता मुक्त हस्ताने अन्नदान, वस्त्रदान करीत असे. लोककल्याणासाठी ती नेहमी तत्पर असायची. धैर्य, दीर्घोद्योग, नितीमत्ता व विद्वत्ता असे जीवनमूल्यांचे आईकडून संक्रमित झालेले गुण ईश्वरचंद्र यांच्यात दिसून येतात. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली.
सजग पालकत्व ही पालकांची नैतिक जबाबदारी आहे. आधुनिक काळात स्त्रियांची करिअरसाठी धडपड, बदललेले जीवनमान यातून आई-वडील मुलांना तितकासा मुबलक वेळ देऊ शकत नाहीत. ते आपल्या पाल्याला सर्व सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. काही पालक आपल्या व्यापातून मुलांना क्वालिटी टाईम देण्याचा प्रयत्न करतात.
काही पालक मुलांना भविष्यकाळात निर्णयक्षम बनविण्यासाठी लहानपणापासून लहान-सहान निर्णय घ्यायला लावतात. भलेही त्यात एखादी चूक झाली तरी निर्णयाची जबाबदारी मुलांवर येऊन पडते व यातून मुले निर्णयक्षम बनतात. मोठेपणी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना पालकांवर अवलंबून राहावे लागत नाही.
आमच्या परिचयातील एका कुटुंबाचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवण्यासारखे आहे. त्या कुटुंबातील मुले सातवी-आठवीत गेल्यापासून वडिलांनी आपल्या मुलांना परीक्षांचे फाॅर्म्स स्वत: भरायला लावले. वाणसामान आणणे, आईला घरात मदत करणे ही कामे वळण म्हणून लहानपणापासून मुलांच्या अंगवळणी पाडली. त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास वाढीस लागला. आता काॅलेजात मुले अधिक सक्षमपणे व जबाबदारीने वागू लागली आहेत.
‘सजग पालकत्व’ यात अनेक गोष्टी मोडतात. आपल्या पाल्याने आत्मनिर्भर व्हावे यासाठी त्याने स्वत:ची कामे स्वत: करणे, आपल्या सामानांची काळजी घेणे, काही हवे असल्यास स्वत: उठून घेणे यांसारख्या गोष्टींनी कधी पाल्याला एकटे राहावे लागले, तर पाल्य स्वत:ची काळजी घेऊ शकते. जितके आपण आपल्या मुलाला शांत व संयमी प्रकाराने घडवू तितक्या शांतपणे तो जीवन जगू शकेल. याचा फायदा मुलांना पुढे नोकरी/व्यवसायाच्या ठिकाणी व वैवाहिक जीवनातही होईल. पालकांनी सजगतेने आपल्या मुलांना घडविले, तर त्यांचे पाल्य एक चांगला माणूस म्हणून मोठे होईल. नम्रता, परस्परांचा आदर करणे, स्वावलंबन असे मौल्यवान संस्कार पालकांनी आपल्या मुलांवर करणे जरुरीचे आहे. आई-वडिलांच्या आयुष्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोनाचे मुले निरीक्षण करतात व तशी तीदेखील घडत जातात.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म जर्मनी देशातील बुंटेबर्गमधील उल्म यागावी झाला. एकदा आईन्स्टाईन यांच्या वडिलांनी त्यांना होकायंत्र दिले. आईन्स्टाईन यांना जाणवले की, ‘रिक्त अवकाश आणि होकायंत्रातील बाणाची हालचाल’ यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. अल्बर्ट जसजसे मोठे होत गेले तसतसे त्यांनी मजेसाठी अनेक रचनाकृती व यांत्रिक उपकरणे बनविली आणि गणितातले आपले कौशल्य दाखविले. अशा पद्धतीने आईन्स्टाईन यांच्या कल्पनाशक्तीची वाढ त्यांच्या घरातून सुरू झाली. त्याची आई एक उत्कृष्ट पियानोवादक होती. आईने ही कला अल्बर्टला शिकवली. अल्बर्टचे मामा जेकब यांनी त्याच्यासोबत गणिते सोडवून दाखवायची पैज लावली. ही गणिते अल्बर्टने अतिशय आनंदाने सोडविली. आपल्या मुलांना घडविताना त्यांच्यात माणुसकीसाठी योग्य, चांगल्या संस्कारांची जपणूक करा. त्यातून मोठेपणी आपले पाल्य एक सुजाण, जबाबदार नागरिक बनू शकेल.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…