- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
राज कपूरचा १९६४ साली आलेला ‘संगम’ ही प्रेमाच्या त्रिकोणाची कथा होती. ती अतिशय भावुुकपणे हाताळण्यात राजकपूर यशस्वी झाल्याने सिनेमा खूप गाजला. वैजयंतीमाला, राजेंद्रकुमार आणि राज कपूर या तिघांमध्ये जणू उत्तम अभिनयाची स्पर्धाच लागली होती. त्यात हसरत जयपुरी आणि शैलेन्द्र यांच्या आशयपूर्ण गाण्यांना मिळालेले शंकर जयकिशन यांचे जबरदस्त संगीत लोकांना फारच भावले.
संगमची कथा उत्कट प्रेमाची, सच्च्या मैत्रीची असल्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती. पुन्हा हे सगळे सैन्याच्या, युद्धाच्या पार्श्वभूमीवर घडत असल्याने सिनेमाला रोमांचकतेबरोबर देशप्रेमाची जोड मिळाली आणि ‘संगम’ त्या वर्षीचा सर्वात लोकप्रिय सिनेमा ठरला. त्यावर्षीचा तो सर्वात जास्त कमाई करून देणाराही चित्रपट होता.
सुंदर (राज कपूर), गोपाल (राजेन्द्र कुमार) आणि राधा (वैजयंतीमाला) लहानपणीचे जीवलग मित्र. तारुण्यात येताच सुंदर राधाच्या प्रेमात पडतो. तिला मात्र साधासरळ गोपाल आवडत असतो. गोपालचेही तिच्यावर प्रेम असते. राजकपूर बडबड्या, धसमुसळा पण मनस्वी असल्याने आपल्या प्रेमाबद्दल गोपालला सगळे सांगून टाकतो. यामुळे बिचारा गोपाल दबून आपले प्रेम मनातच ठेवतो.
‘संगम’ या गुंतागुंतीच्या, उत्कट प्रेमाच्या कथेमुळे गाजला. त्याच्या व्यावसायिक यशामुळे ऐतिहासिकही ठरला. तो दुसऱ्या एका अर्थानेही ऐतिहासिक ठरला होता. मात्र ते काही फार चांगल्या कारणासाठी नव्हे. देहप्रदर्शनाची नवी पातळी या सिनेमाने गाठली होती इतकेच! एका प्रसंगात वैजयंतीमाला तळ्यात पोहत असते. राज कपूर तिचे कपडे घेऊन झाडावर जाऊन बसतो असे दृश्य! तो तिला प्रेमाची कबुली देण्यासाठी जवळजवळ ब्लॅकमेलच करत असतो. ‘तुझे कपडे तेव्हाच परत देईन जेव्हा तू आपले मिलन होईल असे मान्य करशील’ अशी त्याची अट असते. त्या प्रसंगासाठी शैलेन्द्र यांनी लिहिलेले ‘बोल राधा, बोल, संगम होगा के नहीं’ खूप गाजले. ते वैजयंतीमालाने या प्रसंगात केलेल्या शरीरप्रदर्शनामुळेच! अर्थात हल्लीच्या तुलनेत ती दृश्ये खूपच सोज्वळ म्हणावी लागतील, हा भाग वेगळा!
गोपाल लंडनहून कायद्याचे शिक्षण घेऊन येणार असतो, त्या दिवशी त्याच्या स्वागतासाठी मेजवानी ठेवलेली असते. त्या पार्टीत राधा त्याला आपले मनोगत सांगायचे ठरवते. गंमत म्हणजे सुंदरही त्याच भावनेने पार्टीत आलेला असतो. त्यालाही आपले प्रेम व्यक्त करून राधाची संमती मिळवायची असते.
या प्रसंगासाठी शैलेन्द्रजींनी जे गाणे रचले ते अद्वितीयच होते. राधा, गोपाल आणि सुंदर या तिघांची मन:स्थिती त्यांनी तीन कडव्यांत मांडली होती. संपूर्ण सिनेमाची कथाही या एकाच गाण्यातून स्पष्ट होत होती.
महेंद्र कपूर, लतादीदी आणि मुकेशने गायलेल्या त्या सुंदर सुरेल गाण्याचे शब्द होते –
हर दिल जो प्यार करेगा, वो गाना गाएगा…
दीवाना सैकड़ोंमें पहचाना जाएगा..
दीवाना…
सुंदरला कसेही करून राधापर्यंत आपल्या हृदयातला संदेश पोहोचवायचा आहे. तिचे प्रियाराधन करताना तो म्हणतो, “प्रिये, तू माझे हृदय चोरलेस आणि तूच नजर चोरून दूर जातेस? पण मी बघ, प्रेमाची रीत कशी एकतर्फीच निभावतो आहे. खरे तर प्रेम उभयपक्षी हवे ना? तुलाही प्रेमाच्या दुनियेतले हे रीतीरिवाज माहीत नकोत का? अग, जिथे ज्योती तेवत असते तिथे पतंग तर उडी घेणारच ना? मग भलेही त्याचे भविष्य केवळ जळून मरणे का असेना! तसा मी तुझ्याकडे आलोय.”
आप हमारे दिलको चुराकर,
आँख चुराये जाते हैं…
ये इक तरफ़ा
रसम-ए-वफ़ा हम,
फिर भी निभाए जाते हैं…
चाहतका दस्तूर हैं लेकिन,
आपको ही मालूम नहीं.
जिस महफ़िलमें शमा हो,
परवाना जायेगा…
दीवाना सैकड़ोंमें पहचाना जाएगा…
यावेळी राधा मात्र आत्ममग्न अवस्थेत आहे. तिलाही आपले प्रेम व्यक्त करायचे आहे, पण ते गोपालकडे! मात्र मनात स्त्रीसुलभ संकोच आहे. म्हणून ती म्हणते माझे मन तर अजून (सुंदरबद्दलच्या) बालपणीच्या आठवणीतच गुंतले आहे. जरी आता यौवनाच्या आगमनामुळे मनाची अवस्था सैरभैर झाली तरी त्या रम्य काळाचीच स्वप्ने मला गुंतवून ठेवताहेत. दुसरीकडे ज्या यौवनसुलभ भावना मनात येतात त्याही व्यक्त करण्याचा मोह होतोय. पण मीच स्वत:ला आवरते. प्रियकराला मनातले गुज आज सांगेन, उद्या सांगेन असे करता करता आयुष्यातली कितीतरी वर्षे निघून गेली. मनातली गोष्ट मनातच राहिली!
भूली बिसरी यादें मेरे हँसतेगाते बचपनकी,
रात-बिरात चली आतीं हैं,
नींद चुराने नैननकी,
अब कह दूँगी, करते करते,
कितने सावन बीत गये,
जाने कब इन आँखोंका शरमाना जायेगा,
दीवाना सैकड़ोंमें पहचाना जाएगा…
शेवटी राजेंद्रकुमारलाही गाण्याचा आग्रह होतो. खरे तर त्याचेही राधावर प्रेम आहे. पण मित्रासाठी तो मूकपणे माघार घेतो आहे. राज कपूरचा धसमुसळ्या स्वभावामुळे या दोघांना कधी मनमोकळे व्यक्तच होता आलेले नाही. शेवटपर्यंत दोघेही बिचारे अव्यक्तच राहतात. हेच त्याच्या शांत निवेदनातून शैलेन्द्रने सांगितले होते.
राजेंद्रकुमारचे हे त्यागाकडे झुकणारे, मैत्रीसाठी बलिदान देणारे अव्यक्त प्रेम गीतकाराने किती खुबीने, किती भावुकपणे व्यक्त केले होते ते पाहिले की, जुन्या गीतकारांच्या उंचीची कल्पना येते. गाणे ऐकताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी येत असे. गोपाल शेवटच्या कडव्यात म्हणतो –
अपनी अपनी सबने कह ली,
लेकिन हम चुपचाप रहे,
दर्द पराया जिसको प्यारा,
वो क्या अपनी बात कहे?
ख़ामोशीका ये अफ़साना
रह जायेगा बाद मेरे…
अपनाके हर किसीको, बेगाना जायेगा,
दीवाना सैंकड़ोंमें पहचाना जायेगा…
कथेच्या शेवटी भारताचे शत्रूशी युद्ध पेटते. वायुदलातील सेवेत असल्याने राजकपूर युद्धावर जातो. पाठोपाठ त्याचे विमान कोसळून, जळून गेल्याची बातमी येते. त्यात त्याचाही अंत झाला असावा, असे वाटते.
इकडे राधा आणि गोपालचे लग्न ठरते आणि एक दिवस अचानक सुंदर परत येतो! कथेच्या क्लायमॅक्सच्या वेळी सुंदरला दोघांच्या प्रेमाबद्दल कळते आणि तो उदास होतो.
सगळ्यांना सगळेच स्पष्ट झाल्याने हतबल झालेला गोपाल स्वत:ला गोळी मारून घेतो आणि दोघांच्या रस्त्यातून बाजूला जातो! ‘संगम’ हे नाव सार्थ करण्यासाठी सरस्वतीला अदृश्य व्हावेच लागते. हा करुण प्रसंग अनेकांना रडवून गेला होता.
एक तर सर्व कलाकारांनी आपल्या भूमिकेशी समरसून केलेल्या अभिनयामुळे कथानक अगदी खरे वाटून जायचे आणि तेव्हा सर्वसामान्य प्रेक्षकही खूप भावुक आणि भाबडे होते. जेव्हा लेखक दिग्दर्शक इतकी उच्च जीवनमूल्ये सिनेमातूनही समाजमनात पेरण्याचा प्रयत्न करत असा तो काळ! त्याची एक हळवी आठवण म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra