
नाशिक शहरात गुन्हेगारीत वाढ
नाशिक : नाशिक शहरात हल्ली गुन्हेगारीच्या घटनांमध्ये (Nashik Crime) वाढ झाली आहे. त्यातच आता एक आणखी खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात थेट प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि गजरा ग्रुपचे प्रमुख हेमंत पारख (Hemant Parakh) यांचं अपहरण करण्यात आलं आहे. शहरातील इंदिरानगर भागात वास्तव्यास असलेल्या पारख यांचे राहत्या घरासमोरुन शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास अपहरण (Kidnapping) करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या पोलीस पारख यांचा शोध घेत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पारख यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
काल रात्री पारख यांचं अपहरण झाल्याची बातमी परिसरात पसरली, त्यामुळे रहिवाशांनी ताबडतोब पोलिसांना घटनेबाबात कळवले. रात्रीपासूनच पोलिसांकडून पारख यांचा शोध सुरु आहे, मात्र आज सकाळपर्यंत शोध लागलेला नाही. परिसरातील सीसीटीव्ही तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, रात्र उलटून गेली तरी पारख यांचा शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नाशिककर चांगलेच हादरून गेले आहेत. नाशिक पोलिसांकडून तपास सुरु असून या प्रकरणी ग्रामीण पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काल रात्री नेमकं काय झालं?
काल रात्रीच्या सुमारास हेमंत पारख हे घराबाहेर असताना अचानक काही अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. या संशयितांनी पारख यांना चारचाकीत घालून पळ काढला. अपहरण झाल्याचे कळताच रहिवाशांनी पोलिसांना घटनेबाबत कळवले. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळावर पोहोचला. यानंतर परिसरातील सीसीटीव्ही तपासून अपहरणकर्त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली. काही संशयित चारचाकी तर काही दुचाकीवर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु अजूनही हेमंत पारख यांचे नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण करण्यात आले, अपहरणकर्ते नेमके कोण आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.