
मुंबई: राज्यातील सर्व जनतेसाठी आनंदाची बातमी हवामान विभागाने (imd) दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात रुसून बसलेला पाऊस (monsoon) सप्टेंबरमध्ये परतत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस महाराष्ट्राच्या विविध भागांत पाऊस होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होणार आहे.
हवामान विभागाने राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाचे पुणे केंद्राचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबत ट्वीट केले आहे.
राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील ४ ते ५ दिवस राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बंगालच्या खाडीमध्ये चक्रवाती स्थिती बनल्याने कमी दबावाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील ४८ तास महत्त्वाचे आहेत. या स्थितीमुळे राज्यात पाऊस बरसू शकतो. ३ ते ७ सप्टेंबरच्या कालावधीत कोकण, गोवा येथे मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ५ ते ७ सप्टेंबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
3 Sept:राज्यात पुढच्या 4,5 दिवसात पाउस शक्यता.बंगालच्या उपसागरात चक्राकार स्थिती, येत्या ४८ तासात तेथे कमी दाबाचे क्षेत्र.
3-7 Sept,#कोकण #गोव्यात हलका-मध्यम मेघगर्जना,विजांच्या कडकडाटासह काही मुसळधार पावसाची शक्यता
5-7 Sept दरम्यान #मध्यमहाराष्ट्र, #मराठवाडा, #विर्दभात पाउस
-IMD pic.twitter.com/nRkgvNxCGN
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 3, 2023
राज्यात कुठे होणार पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील दिवस विदर्भात पाऊस होऊ शकतो. विदर्भातील सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडामध्ये पावसाचे पुनरागमन होऊ शकते. मराठवाडामध्ये उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिना कोरडा
यंदाच्या वर्षी ऑगस्ट महिना पूर्णपणे कोरडा केला. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. दरम्यान, सप्टेंबरमध्ये तरी चांगला पाऊस व्हावा अशी प्रार्थना शेतकरी करत आहेत.