
वडील धुळ्यात सापडले होते बेवारस अवस्थेत
पुणे : आपल्या अदाकारीने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणार्या गौतमी पाटीलच्या वडिलांबाबत (Gautami Patil) एक धक्कादायक बातमी काल समोर आली होती. तिचे वडील धुळे (Dhule) येथे बेवारस अवस्थेत सापडल्याने त्यांना जवळच्या हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारांकरता दाखल करण्यात आले. रवींद्र बाबुराव नेरपगारे पाटील असं गौतमीच्या वडिलांचं नाव आहे. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमीने वडिलांची दखल घेतली असून माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असं ती म्हणाली आहे.
काल गौतमीच्या नातेवाईकांना संपर्क केला असता तिची मावशी व चुलत बहीण हिरे रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र त्यांनी गौतमीशी आपला काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. गौतमीला ही बातमी कळताच तिने मावशीला वडिलांच्या तब्येतीची विचारणा करण्यास सांगितले व पुढील उपचारांसाठी पुण्याला घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर मावशी धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेली.
काय म्हणाली गौतमी पाटील?
गौतमी पाटीलने यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली की, "कालच मी माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात दाखल असल्याची बातमी पाहिली त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितले की वडिलांची तब्येत आता कशी आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन व पुढील उपचार त्यांचे मी पुण्यातच करेन". तसेच धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी देखील गौतमी पाटीलच्या वडिलांची त्यांच्या वतीने जेवढी काळजी घेता येईल ती घेऊन एक मदतीचा हात दिल्याने गौतमीने त्यांचे आभार मानले आहेत.
नेमकं काय झालं होतं?
धुळे शहरातील आजळकर नगर भागात एक व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असल्याची माहिती स्वराज्य फाउंडेशनच्या दुर्गेश चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी घटनास्थळी जाऊन बेवारस अवस्थेत पडलेल्या व्यक्तीला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी त्यांनी समाज माध्यमांवर त्या व्यक्तीचा फोटो आणि त्यांच्याकडे सापडलेले आधार कार्ड टाकल्यानंतर सदर व्यक्ती सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील रवींद्र बाबुराव पाटील असल्याचं समोर आलं.
कसं आहे गौतमीचं आणि वडिलांचं नातं?
गौतमीच्या लहानपणीच झालेल्या काही कौटुंबिक वादांमुळे तिची आई व वडील एकत्र राहत नव्हते. तिच्या वडिलांना व्यसने होती व त्यामुळे वाद व्हायचे. गेली २० वर्षे ते एकत्र राहत नाहीत. मागे एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना गौतमीचे वडील रवींद्र पाटील म्हणाले होते की, आपली लेक गौतमी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे, त्याचा अभिमान वाटतो. मात्र काही गोष्टींमुळे तिच्यावर टीका होते तेव्हा दुःख होतं. आपल्या व्यसनामुळे किंवा कौटुंबिक वादामुळे मुलगी गौतमी आणि तिची आई हे दोघे सोबत नसल्याचं मोठं दुःखही रवींद्र पाटील यांना आहे. गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहायला यावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. मध्यंतरी व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत “मी आता एकटाच राहात असल्याने गौतमीने मला आर्थिक मदत करावी” अशी मागणी त्यांनी केली होती.