Saturday, July 13, 2024

Exam : परीक्षा

  • कथा : रमेश तांबे

एका आजोबांची बॅग एका तरुणाने पळवली होती आणि अशा वेळी आपण शांत राहणं हे आकाशच्या मनाला पटेना. खरे तर एक मन म्हणत होतं, परीक्षेला जायचंय सहामाही परीक्षा आहे, तू या भानगडीत पडू नकोस.

आकाशला आज लवकर शाळेत जायचे होते. कारण त्यांची आजपासून सहामाही परीक्षा सुरू होणार होती. झटपट आवरून आकाश शाळेला निघाला. निघताना आईच्या पाया पडला. बारा साडेबाराची वेळ होती. रस्त्यावर बऱ्यापैकी गर्दी होती. वाहने इकडून तिकडे धावत होती. आकाश फुटपाथवरून चालत होता. इंग्रजीच्या पेपरचे प्रश्न कसे असतील, किती वेळात पेपर पूर्ण होईल? याचाच विचार आकाश करत होता.

तितक्यात कोणाचा तरी “पकडा पकडा, चोराला पकडा, त्याने माझी बॅग पळवली” असा मोठ्याने आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले, तर एका आजोबांची बॅग एका तरुणाने पळवली होती आणि तो तरुण त्याच्याच दिशेने पुढे धावत येत होता. त्याच्या मागून आजोबा धावत होते. असे घडूनही गर्दीला त्याची फिकीर नव्हती. गाड्यांचं येणं-जाणं चालूच होतं. काही बघे लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून त्या दोघांचा पाठलाग बघत होते. अशा वेळी आपण शांत राहणं हे आकाशच्या मनाला काही पटेना. खरे तर त्याचं एक मन म्हणत होतं, परीक्षेला जायचंय सहामाही परीक्षा आहे. तू या भानगडीत पडू नकोस. मुकाट्याने शाळेचा पेपर दे. जर चोराशी झटापट करताना काही इजा झाली, तर उशीर झाला म्हणून शाळेने तुला पेपर लिहायला नाही दिला तर! या सगळ्या गोष्टी आकाशच्या मनात येत होत्या आणि अगदी त्याच वेळी चोर आकाशच्या अगदी जवळ आला. आकाशने पुढचा मागचा विचार न करता त्याला जोरदार धडक दिली. तो तरुण खाली पडला. पण आकाशपेक्षा तो खूप मोठा असल्याने त्याच्या हातातली बॅग काही त्याला हिसकवता आली नाही. तो तरुण आकाशला म्हणाला, “या भानगडीत पडू नकोस. तुला हे प्रकरण फार जड जाईल.” असं म्हटल्यावर बेस्ट एनसीसी कॅडेटचं बक्षीस मिळवणारा आकाश त्याला मोठ्याने म्हणाला, “बघूया तर खरं, तुला जड जाईल की मला!” दोघांची थोडा वेळ झटापट झाली. पण तो चोरी करणारा तरुण आकाशाच्या हातून निसटला आणि पुन्हा जोरात धावू लागला. आता आकाश ओरडू लागला, “पकडा पकडा चोराला पकडा.” पण कोणीही तरुण किंवा तरुणी त्याच्या मदतीला धावली नाही. सरसर पळत तो तरुण पुढे जात होता. त्याच्या त्याच्या मागून आकाश पळत होता. रस्त्याच्या कडेला उभं राहून लोक आकाशकडे नुसतेच बघत होते.

तो तरुण आता दिसेनासा झाला होता. आकाश धावत धावतच पोलीस स्टेशनमध्ये शिरला आणि तिथल्या पोलीस स्टेशन प्रमुखाला घडलेल्या चोरीबद्दल सांगू लागला. थोड्याच वेळात ज्यांची बॅग चोरीला गेले ते आजोबादेखील पोलीस स्टेशनमध्ये आले आणि गालातल्या गालात हसू लागले. थोडा वेळ जातो ना जातो तोच, तो बॅग पळवणारा तरुणदेखील पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याला तिथे पाहताच आकाशने त्याच्यावर झडप घातली. पण त्या तरुणाने स्वतःला कसेबसे सावरले आणि तोही आकाशकडे बघून हसू लागला. आकाशला कळेना हे आपल्याकडे बघून का हसत आहेत. खरं तर त्या आजोबांनी सांगायला हवे होते की हाच तो चोर, यानेच माझी बॅग पळवली. पण ते दोघे तर एकमेकांशी छान गप्पा मारू लागले. थोड्याच वेळात पोलीस कमिशनर साहेब तिथे आले. पटापट सगळे पोलीस जमा झाले. एक व्यासपीठ तयार केले गेले. कमिशनर साहेब मुख्य खुर्चीवर बसले. त्यांच्या बाजूला पोलीस स्टेशनमधील प्रमुख साहेब बसले आणि बॅग पळवणारा तरुण बोलू लागला. आज आम्ही चोरीची एक खोटी घटना घडवून आणली. माझ्या मित्राची बॅग मीच पळवली आणि चोर-चोर पकडा-पकडा म्हणणाऱ्या खोट्या आजोबांना कोण किती मदत करतं याचा अभ्यास करायचे, आम्ही ठरवले.

पण पंधरा-वीस मिनिटांच्या धावपळीनंतरही केवळ आणि केवळ आकाशच त्या आजोबांना मदत करण्यासाठी धावला. आकाशने मला इतकी जोरात धडक मारली की, माझे हात पाय मोडता मोडता वाचले. आम्हाला अभ्यास करायचा होता की, समाजामध्ये मदत करण्याची वृत्ती किती आहे. लोकांमध्ये जागृती आहे की नाही ते पाहायचे होते; परंतु या अर्ध्या तासाच्या परीक्षेत केवळ आकाशच यशस्वी ठरला, असे म्हणत सगळ्यांनी टाळ्यांचा एकाच कडकडाट केला. मग पोलीस कमिशनरच्या हस्ते आकाशचा मोठा गौरव करण्यात आला. त्यांच्या भाषणात त्यांनी आकाशचे खूप कौतुक केले. त्याला “जनतेचा मित्र”, “पोलीस मित्र” अशा विविध पदव्या देऊन गौरविण्यात आले आणि मोठ्या सन्मानाने त्याच्या शाळेत पोहोचवण्यात आले. पोलीस कमिशनर साहेबांनी घडलेला सर्व प्रकार स्वतः मुख्याध्यापकांना सांगून आकाशला परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. या सर्व प्रकारामुळे आकाश खूपच भारावून गेला होता. त्याला स्वतःचा इतका अभिमान वाटत होता की, त्याचा चेहरा आनंदाने नुसता फुलून गेला होता!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -