
- ऐकलंत का! : दीपक परब
‘सुभेदार’ची यशस्वी घौडदौड... विकेंडला ८.७४ कोटींचा गल्ला
दिग्पाल लांजेकर यांनी शिवराज अष्टकातील ‘सुभेदार’रूपी पाचवे चित्रपुष्प २५ ऑगस्टला सादर केले आणि ३५० चित्रपटगृहांतील १००० हून अधिक शोजमधून प्रेक्षकांनीही विक्रमी प्रतिसाद दिल्याने शेकडो चित्रपटगृहांवर हाऊसफुल्लचे बोर्ड झळकल्याचे पहायला मिळात आहेत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर परदेशातही ‘सुभेदार’ चित्रपटाची जोरदार घोडदौड सुरू आहे. रिलीजच्या आधीपासून चर्चेत असलेला हा ऐतिहासिक सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने ८.७४ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. या जबरदस्त यशानंतर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातही ‘सुभेदार’ चित्रपटाची बॅाक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
‘सुभेदार’ सिनेमातील गाण्यांना रसिकांचा जोरदार प्रतिसाद लाभत आहे. ‘आले मराठे’ या गाण्यावर सिनेमागृहांमध्येच रसिक बेधुंद होऊन भगवे झेंडे घेऊन नाचत आहेत. मुखानं ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करत प्रेक्षकांचे गट एकत्रितपणे सिनेमा पहायला गर्दी करत आहेत. ‘सुभेदार’ने बॉक्स ऑफिसचा गड दणक्यात सर केला आहे.
‘सुभेदार’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी १.१५ कोटी, दुसऱ्या दिवशी १.६८ कोटी, तिसऱ्या दिवशी २.२२ कोटी, चौथ्या दिवशी ९० लाख, पाचव्या दिवशी ९५ लाख, सहाव्या दिवशी १.०४ कोटी, सातव्या दिवशी ८० लाखांची कमाई केली आहे. एकंदरीतचा आतापर्यंत या सिनेमाने ८.७४ कोटींचा गल्ला जमवला आहे.
महाराष्ट्रातल्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी ‘सुभेदार’च्या टीमने एक विशेष ऑफर ठेवली आहे. पीव्हीआर आणि आयनॉक्समध्ये प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. फक्त १४० रुपयांत प्रेक्षक हा सिनेमा पाहू शकतात. पण या विशेष ऑफरसाठी खास अटीदेखील आहेत.
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचा मुंबई, पुण्यात धुमाकूळ
सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकळवला आहे. ५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याची पोहोचपावती आहे. प्रिया बापट सादर करत असलेल्या या नाटकाचे निर्माते नंदू कदम आहेत, तर या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दहा वर्षांनी प्रिया बापट आणि उमेश कामत एकत्र रंगभूमीवर काम करत असल्याने, त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्याची विशेष उत्सुकता आहे. या नाटकावर सर्व वयोगटातील प्रेक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कुठेतरी प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे नाटक प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. ‘पहिल्या दिवसापासून नाटक हाऊसफुल्ल जात आहे. खूप आनंद होतोय. या नाटकातील कलाकार जितक्या ताकदीचे आहेत. तितकेच दर्जेदार या नाटकाचे लेखनही आहे. हा दुग्धशर्करा योग जुळून आल्यानेच हे नाटक नाट्यरसिकांना आवडत आहे. आतापर्यंत मुंबईत आणि पुण्यात झालेल्या प्रयोगावरून आम्हाला अंदाज येतोय की पुढील प्रयोगही असेच हाऊसफुल्ल असतील. तिकीटविक्री सुरू झाल्यापासून अवघ्या काही तासांमध्येच हे शो फुल्ल होत आहेत. रसिक प्रेक्षकांसाठी जास्त प्रयोग लावण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, असे निर्माते नंदू कदम यांनी सांगितले.
प्लॅनेट मराठीची यशस्वी दोन वर्षे
महाराष्ट्रीय संस्कृतीला लाभलेला साहित्याचा वैभवशाली वारसा जगभरातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अक्षय विलास बर्दापूरकर यांनी ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटीची सुरुवात केली. मराठीतील सर्वोत्कृष्ट आणि दर्जेदार कंटेंट देणाऱ्या या प्लॅनेट मराठीला आता यशस्वी दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. जगातील पहिल्या मराठी ओटीटीचा मान मिळवणाऱ्या प्लॅनेट मराठीने अनेक जबरदस्त चित्रपट, वेबसीरिज, शोज, इव्हेंट प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. यातील रान बाजार, मी पुन्हा येईन, अनुराधा, अथांग, बदली या सर्वाधिक लोकप्रिय वेबसीरिज, तर पटलं तर घ्या आणि कलरफुल कोकण हे शोज प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. तमाशा लाइव्ह हा ओटीटीवर सर्वाधिक पाहिलेला सिनेमा ठरला, तर पाँडिचेरी अणि जूनला प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळालं. याव्यतिरिक्त टॉक शोज, शॉर्ट फिल्म्स, सांगीतिक मैफल असे बरेच मनोरंजनात्मक कार्यक्रमही त्यांनी प्लॅनेट मराठीच्या माध्यमातून जगभरात पोहोचवले.