
बुलढाण्यातून मुख्यमंत्री विरोधकांवर भडकले
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही : मुख्यमंत्री
बुलढाणा : बुलढाणा येथे आज 'शासन आपल्या दारी' (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित राहिल्याने अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लडाखला व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आजारी असल्याने येऊ शकले नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चांना विराम लावला. यावेळेस मुख्यमंत्र्यांनी जालना येथे मराठा आंदोलकांवर (Jalna Maratha Andolan) झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी दुःख व्यक्त केले. तसेच 'जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही', असं आश्वासन त्यांनी दिलं.
आज कार्यक्रमादरम्यान बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 'ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा दाबला तेच लोक आता गळा काढतायत', अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. महाविकास आघाडी सरकारमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षण रद्द झाल्याचा आरोप यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. तर त्यावेळी मराठा समाजाच्या आरक्षण समितीमध्ये अशोक चव्हाण होते त्यांनी तेव्हा काय केलं, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी अशोक चव्हाणांना विचारला आहे. महाविकास आघाडीने एकदाही मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरु झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. फक्त दाखवण्यसाठी आम्ही काम नाही करत, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सरकार आणि मी स्वस्थ बसणार नसल्याचं आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
दोषींवर निलंबनाची कारवाई होणार
जालन्यातील पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तसेच जे अतिरिक्त अधीक्षक आहेत त्यांना जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्यात आलं आहे. योग्य ती चौकशी करुन या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जर गरज पडली तर न्यायालयात देखील जाण्याची आमची तयारी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत.
मराठा समाजाने कधीच कोणाला त्रास होऊ दिला नाही; पण तुम्ही...
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाचे लाखो संख्येने मोर्चे निघायचे. पण या मोर्चाचा कधी कुणाला त्रास झाला नाही. त्यांनी कधीच कुणाला त्रास होऊ दिला नाही. मराठा समाज हा फार संयमी आहे. मराठा समाजाच्या मुकमोर्चाला तुम्ही मुका मोर्चा म्हणून संबोधलं हे जनता कधी विसरणार नाही.
३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं
जेव्हा मराठा समाजाचं आरक्षण रद्द झालं तेव्हा ३,५०० तरुणांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांची निवड झाली होती पण नियुक्ती पत्र आली नव्हती. त्यावेळी कारवाई होईल म्हणून सगळ्यांना पाठ फिरवली. पण मी तेव्हा म्हटलं की काहीही होऊ दे पण मी मागे हटणार नाही. त्यानंतर मुख्यमंत्री झाल्यावर त्या ३,५०० तरुणांना नोकऱ्या देण्याचं काम मी केलं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.