
- क्राइम : अॅड. रिया करंजकर
छगनलालने नोकरांवर अतिविश्वास दाखवल्याने त्यांना आपल्या घरापर्यंत माल आणण्यासाठी पाठवत. पण विश्वासू नोकरासोबत आलेला त्याचा भाऊ तेवढाच विश्वासू आहे का? याची पडताळणी केली नाही आणि होत्याचे नव्हते झाले.
छगनलाल हे आर्टिफिशियल ज्वेलरी याचे व्यापारी होते. त्यांचा फोन वाजू लागला. त्यांनी तो फोन उचलला समोरून आवाज आला की, ‘तुमची मुलगी आमच्या ताब्यात आहे. दहा लाख रुपये दिले तर मुलीची सुटका करू.’ जो फोन आला होता तो त्यांच्या ओळखीचाच नंबर होता. म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतःच्या पत्नीला फोन केला, तर त्यांच्या पत्नीने फोन काही उचलला नाही. असे अनेक फोन त्याने आपल्या पत्नीला केले. पण एकही फोन पत्नीने उचलला नाही. म्हणून सरतेशेवटी त्यांनी शेजारच्यांना फोन केला. शेजारच्याने फोन घेतच त्याच्या घराच्या दिशेने गेला असता. छगनलाल यांचा दरवाजा उघडा दिसला आणि दरवाजा बाजूला केल्यानंतर त्यांना छगनलाल यांची पत्नी समोर निपचित पडलेली दिसली. शेजारच्याने छगनलाल यांना तसं सांगितलं व स्थानिक पोलिसांना तशी इन्फॉर्मेशन देण्यात आली. पोलीस घटनास्थळावर आल्यावर छगनलालची पत्नी मृत झाल्या होत्या. त्यांचा कोणीतरी खून केला होता, हे पोलिसांना समजले. छगनलालने ‘आपल्याला या नंबरवरून फोन आला होता आणि मुलीला किडनॅप करून दहा लाखांची मागणी या फोनवरून केली होती आणि हा फोन नंबर त्यांच्या नोकराचा आहे’ असं पोलिसांना सांगितलं. पोलिसांना लगेच समजलं की हा जो गुन्हा केलेला आहे तो गुन्हेगार गुन्हेगारी क्षेत्रामध्ये नवीन असणार म्हणून त्याने आपल्या फोनवरून फोन केला होता. पोलिसांची टीम चारही दिशांना रावांना झाली होती.
छगनलाल यांचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा व्यवसाय असल्याने ते आपल्या दुकानात दिवसभर असत व त्यांचा काही माल त्यांच्या राहत्या घरी असायचा. टू बीएचकेचा फ्लॅट असल्यामुळे एका रूममध्ये ते आपला माल ठेवत असत. ज्यावेळी त्यांना मालाची गरज भासेल त्यावेळी त्यांचा नोकर त्यांच्या घरी येऊन तो माल घेऊन जात असे. ज्यावेळी त्यांचा नोकर माल घेण्यासाठी घरी येई, त्यावेळी त्यांची पत्नी रेखा त्यांच्या आलेल्या नोकराला पाणी-नाश्ता देत असे आणि माल घेऊन त्याला दुकानावर पाठवत असे. हे असे नित्याचे झाले होते. येणारा नोकर हा विश्वासू होता.
या नोकराचे नाव राधेलाल असं होतं. राधेलाल याच्या गावावरून त्याचा चुलत भाऊ राधेश्याम आला होता. राधेलालला म्हणाला, ‘तू जिथे काम करतोस तिथे मलाही कामाला ठेव.’ राधेलाल याने आपल्या मालकाला सांगून आपल्या चुलत भाऊ राधेश्याम याला दुकानात कामाला ठेवले. असेच एकदा मालाची गरज भासल्यामुळे छगनलाल यांनी राधेलालला घरी जाऊन माल घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी राधेलालबरोबर राधेश्याम मालकाच्या घरी गेला. मालकाच्या पत्नीने त्यांचे हसत स्वागत करून त्यांना पाणी आणि चहा वगैरे दिला. तेव्हा राधेश्यामला वाटले की, ही मालकाची पत्नी आपल्याला लाइन देत आहे आणि आपल्याशी जास्त हसत आहे. नंतर जेव्हा जेव्हा राधेलाल माल आणायला जात असे, तेव्हा त्याच्यासोबत राधेश्याम जाऊ लागला.
एकदा मालक, राधेश्याम व राधेलाल हे माल घेऊन आपल्या घरातून निघाले होते. त्यावेळी स्टेशनवर आल्यावर राधेश्यामने मालकाला सांगितलं की, इथेच माझे नातेवाईक आहेत. त्यांना मी भेटून लगेच दुकानावर येतो. मालकांनी हो असं सांगून दोघेजण दुकानावर पुढे गेले. राधेश्याम नातेवाइकांकडे न जाता परत मालकाच्या घरी आला. रेखा आंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली होती आणि दरवाजाची बेल वाजल्यामुळे तिने दरवाजा उघडला. राधेश्यामला बघितल्यावर तिला वाटलं, काहीतरी घेऊन जाण्याची विसरले असतील म्हणून मालकाने याला परत पाठवले असणार. म्हणून तिने नेहमीप्रमाणे त्याचं हसत स्वागत केलं. नुकतेच आंघोळ करून आलेल्या रेखाला बघून राधेश्याम याची नियत फिरली व तो तिच्यावर जबरदस्ती करू लागला. रेखाला हे अनपेक्षित होतं. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी ती चार महिन्यांची गरोदरही होती. ती आपल्याला प्रतिकार करते, याचा राग येऊन राधेश्यामने तिचा गळा आवळून खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने खून केल्यानंतरही तिच्यावर दोन वेळा अतिप्रसंग केला आणि यामध्ये तिच्यासोबत तिच्या पोटातल्या बाळाचाही जीव गेला. एवढ्यावरच न थांबता मालकाच्या ३ वर्षांच्या मुलीला तो घेऊन तिथून पळून गेला आणि स्वतःच्या फोनवरून त्याने मालकाला दहा लाखांची खंडणी मागण्यासाठी फोन केला. गुन्हेगार सराईत नव्हता त्यामुळे अलगद तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला. एका मोठ्या नाल्यामध्ये तो मालकाच्या मुलीला घेऊन बसलेला होता आणि त्याचा फोन ट्रॅप केल्यामुळे तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.
राधेश्यामने सांगितलं की, ’मालकीण माझ्याशी हसून बोलत होती मला वाटलं ती माझ्यावर प्रेम करते. मी त्या दिवशी तिला भेटायला गेलो होतो. पण नुकतीच ती आंघोळ करून आल्यामुळे माझी नियत फिरली आणि माझ्याकडून हा गुन्हा घडला’ अशी त्याने कबुली दिली.
छगनलाल यांनी नोकरांवर अतिविश्वास दाखवल्याने ते आपल्या घरापर्यंत नोकरांला माल आणण्यासाठी पाठवत होते. पण विश्वासू नोकराबरोबर आलेला त्याचा भाऊ तेवढाच विश्वासू आहे का? याची पडताळणी छगनलाल यांनी केली नाही आणि आपल्या जुन्या विश्वासू नोकरासोबत त्यालाही आपल्या घरी माल आणण्यासाठी पाठवत होते. नवीन नोकरावर त्यांनी अतिविश्वास ठेवला होता आणि त्यामुळे आज त्यांच्या आयुष्याचा सर्वनाश झाला होता. या गुन्ह्यासाठी राधेश्याम याला जन्मठेपेची शिक्षा मिळाली.
(सत्यघटनेवर आधारित)