‘चंद्र’ हा नेहमीच सर्व पृथ्वीवासीयांसाठी आकर्षणाचाच विषय राहिला आहे. चांद्रयान-३ ही तर सुरुवातच आहे. चांद्रयान-३ च्या यशानंतर, याविषयी असंख्य चॅनेल्सनी स्टोरी बनवून आपल्याला दाखवल्या. यानिमित्ताने अनेक हात लिहिते झाले.
आजकाल सहसा आपण चुकत नाही कारण तर गुगल गुरूचा वापर करून आपण कोणतातरी रस्ता शोधतोच! रस्त्यावरचा चालणारा माणूस असो, कारमधून जाणारा असो वा ट्रेन किंवा विमानातून मार्गक्रमण करणारा असो गुगल गुरूच्या सहाय्याने आपण कुठपर्यंत पोहोचलो, आपल्याला जिथे जायचे तिथे आपण केव्हा पोहोचणार, कोणत्या रस्त्याला ट्राफिक आहे वा कोणता पर्यायी रस्ता आहे, हे सगळे किती सहजतेने दाखवतो तेही एकाच वेळेस लाखो-करोडो जगभरातील सर्व वाहनांतील माणसांना. टेक्नॉलॉजीला दिवसातून दहा वेळा तरी सलामच करायला हवा! टेक्नॉलॉजीचा वापर करून आपले चांद्रयान-३ व्यवस्थित चंद्रावर पोहोचले, या जल्लोषात असंख्य माणसे सहभागी झालीत. जगात काहीच अशक्य नाही, ही धारणा मनात रुजू लागली आहे. या घटनेवर असंख्य यू-ट्यूब व्हीडिओ बनले. यानिमित्ताने अगदी सुरुवातीपासून म्हणजे किती देशांनी यापूर्वी चंद्रावर यान घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, चंद्रावर पोहोचणारे पहिले यान, चंद्रावर माणसांनी टाकलेले पहिले पाऊल, चंद्रावरची आतापर्यंत गोळा केलेली माहिती आणि आत्ता चांद्रयान-३ ने वेगळेपणाने काय केले, याविषयी असंख्य वेगवेगळ्या चॅनेल्सनी स्टोरी बनवून आपल्याला दाखवल्या. त्या दाखवताना बातम्या देणाऱ्यांचे असे काही शूट केल्या गेले की, जणू ते चंद्रावरूनच बातमी देत आहेत. ३-डी इफेक्टमुळे घरबसल्या जणू चंद्रावर फेरी मारून आल्याचा अनुभव मिळाला. तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांच्या ज्ञानात एक मोठी भर घातली गेली. ट्रेनमध्ये, बसमध्ये याविषयी गप्पा सुरू झाल्या. अगदी उबेरमधून प्रवास करताना त्या टॅक्सी ड्रायव्हरनेही मला चांद्रयान-३ मोहिमेची माहिती देत मला नसलेल्या कितीतरी गोष्टी सांगून माझ्या ज्ञानात भर घातली. यानिमित्ताने अनेक हात लिहिते झाले. चांद्रयान-३वर असंख्य चारोळ्या, कविता, गझल ताबडतोबीने लिहिल्या गेल्या. अनेक चित्रकारांनी त्यावर चित्र काढली. व्यंगचित्रकारांनी त्यात भर घातली. वर्तमानपत्रातले रकानेच्या रकाने चांद्रयान-३च्या मजकुराने भरून गेले. त्यात चंद्रावरचे असंख्य फोटो आणि त्या संदर्भातील महत्त्वाची माहिती असलेले लेख समाविष्ट आहेत. यंदाच्या दिवाळी अंकात नक्कीच चांद्रयान-३ वर कथाही वाचायला मिळणार यात शंकाच नाही. त्यावर नाटके लिहिली जातील. सिनेमा तर येईलच! गणपतीसमोरच्या डेकोरेशनमध्ये सुद्धा चांद्रयान-३ दिमाखाने साकारले जाणार आहे. अगदी शाळा-महाविद्यालयांमध्येही मोठाले स्क्रीन लावून चांद्रयान-३ चे लँडिंग दाखवले गेले. हा जागतिक विक्रम भारतातल्या ज्या शास्त्रज्ञांनी केला याबद्दल त्यांचे अभिनंदन!
पूर्वी कोण सौंदर्यवती युवतीला चंद्रमुखी म्हटल्यावर ती गोड लाजत होती आता ती ‘चंद्रमुखी’ म्हटल्यावर नेमके काय करेल ते पाहायला हवे. आता कवितेतून-गाण्यातून काही गोष्टी सहज बाद होतीलच, जसे की ‘चांदसा रोशन चेहरा’, ‘चौदहवी का चांद हो’, ‘गली मे आज चांद निकला’, ‘लाजरा बावरा, हा मुखाचा चंद्रमा’ अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. पण कवी कवीच असतात. ते ‘चंद्र’ आपल्या कवितेत आणणारच वेगळ्या प्रतिमातून…
लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?
हे गाणं ऐकत जडावलेल्या पापण्यांआड चंदामामाला स्वप्नात पाहणारे आता चंदामामाच्या घरी जाण्याची स्वप्ने पाहू लागली आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. फ्रान्समध्ये चंद्रावर पहिल्यांदा एक चित्रपट बनवला गेला ते वर्ष होते १९०२. त्या चित्रपटाचे नाव- ‘अ ट्रीप टू द मून.’ या चित्रपटाला प्रचंड प्रसिद्धी मिळाली कारण कोणी चंद्रावर जाण्याचा विचारही त्या काळात करू शकत नव्हते, त्यामुळे ही कल्पना लोकांनी उचलून धरली. दारा सिंग यांनी अंतराळवीराची भूमिका साकारलेला एक चित्रपटही १९६७ पाहिल्याचे आठवले. ‘चांद पर चढाई’ हे त्या चित्रपटाचे नाव होते. ‘आनंद’ नावाच्या माणसाच्या भूमिकेत दिसणारा दारा सिंग आपल्या साथीदार ‘भगवान’ याच्यासोबत चंद्रावर पोहोचतो आणि तिथे त्या दोघांना इतर ग्रहांवरच्या अनेक प्रकारच्या राक्षसांशी लढावे लागते, हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. ‘चांद पर चढाई’ नंतर ‘चांद के पार चलो’ हा चित्रपट २००६ साली आला, तर ‘चांद्रयान’ २०१० साली प्रक्षेपित झाला. ‘चंद्र’ हा नेहमीच सर्व पृथ्वीवासीयांसाठी आकर्षणाचाच विषय राहिला आहे. त्याच्यावर निगडीत आपले कितीतरी सणवारही आहेत. चांद्रयान-३ ही तर सुरुवातच आहे. अशा अनेक मोहिमांच्या सर्व प्रकल्पांना शुभेच्छा देऊया!
pratibha.saraph@gmail.com
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…