
- पाचवा वेद : भालचंद्र कुबल
समाजातील चालीरीती, नितीमत्ता, रूढी, परंपरा व ज्ञानलालसा मिळवण्याची ओढ यावरच समाजाचे मूल्यमापन करता येते... आणि हे मूल्यमापन सांस्कृतिक करमणूक अथवा मनोरंजनाच्या निकषांवर आधारभूत असते. नाटक हे या सांस्कृतिक मूल्यमापनाचे माध्यम आहे. त्यामुळे भाषा, सादरीकरण, विषय आणि वैचारिक समज यांच्या मूलभूत आधारावरचे नाटक प्रत्येक समाज घटकाचे सामाजिक अस्तित्व अधोरेखित करत असते. महाराष्ट्राचे संगीत नाटक वरील सिद्धांतास अपवाद नाही. लक्ष्मीनारायण कल्याण नाटकापासून सुरू झालेला संगीत नाटकाचा प्रवास संगीत संत तुकारामपर्यंत येऊन पोहोचलेला आपण पाहतो आहोत.
अशा संगीत नाटकांत नाट्यलेखकांचा असलेला पुढाकाराचा उल्लेख वा दखल न घेता पुढे जाताच येणार नाही. बाबाजीराव राणे (१८७४ ते १९१७) हे अशाच एका अज्ञात लेखकांपैकी एक. अवघे ४३ वर्षांचे आयुष्यमान लाभलेला हा लेखक संगीत संत तुकाराम सारखी अद्वितीय नाट्याकृती देऊन गेला. १९१२ साली लिहिल्या गेलेल्या या नाटकाला तुफान लोकप्रियता मिळाली. संत तुकारामाच्या प्रबोधनकार्यात मंबाजीने केलेल्या कुरघोडी आणि त्यावर शिवाजी महाराजांच्या भेटी व सहकार्यामुळे तुकारामाच्या समाज प्रबोधन कार्यास मिळालेली उत्तेजना असे या नाटकाचे कथासूत्र आहे. ज्ञानेश महारावांनी या नाट्याची रंगावृत्ती अत्यंत प्रभावीपणे संकलित केली आहे आणि हेच या नाटकाचे यश आहे.
रंगावृत्ती करताना महारावांनी नाटकाचा विनोदी बाज तसाच ठेवून तुंबाजीचे स्वगत प्रचुर पात्र संवादी केले आहे. मनातले भाव संवादरूपात प्रकट झाल्यावर त्यातली बोचरी टीका उपहासाचे स्वरूप धारण करते व तिथेही एक विनोद जन्म घेतो. त्यासाठी विनोदी बाजाचा दिग्दर्शक असणे आवश्यक होते, ती जबाबदारी संतोष पवारांनी समर्थपणे पेलली आहे. सं. संत तुकाराम नाटकास लाभलेल्या अभूतपूर्व लोकाश्रयामुळे बाबाजीराव राणे यानी नाट्यसंस्थेची स्थापना केली. चोख व्यवहारी वृत्तीमुळे राणेंना झालेल्या आर्थिक फायद्यामुळे कल्याण येथे संत तुकाराम नामक नाट्यगृह बांधले. १९४० पर्यंत सतत ३२ वर्षे हे नाटक चालले. पुढे त्या नाट्यगृहाचे प्रकाश टाॅकीजमध्ये रूपांतरण झाले आणि आज तिथे प्रकाश टाॅवर उभा आहे. बाबाजीराव राणे हे छापखान्यात कंपोझिटर असल्याने त्यानी लिहिलेली ७/८ नाटके तरी आजमितीला उपलब्ध आहेत.
मराठी नाट्यलेखकांमध्ये एवढी श्रीमंती पाहिलेला हा एकमेव लेखक असावा. त्याकाळी साधारणपणे पाच-साडेपाच तास चालणाऱ्या या नाटकात अनेक नामवंत गायक नटांनी भूमिका केल्या होत्या. अनेक ट्रिकसीन्स हे देखील या नाटकाचे आकर्षण होते. मराठी संगीत नाटकाच्या शिरपेचात सं. संत तुकाराम हा खोवलेला तुरा होता. संगीत नाटकाचा सुवर्णकाळ या नाटकाने पाहिला होता. या सर्व भूतकालीन संदर्भांचा अभ्यास करून आजचे एकवीसाव्या शतकातले ‘संगीत संत तुकाराम’ उभे आहे. प्रतिबालगंधर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विक्रांत आजगांवकर यांनी तुकारामाचे पात्र संयमितपणे रंगवले आहे. खरं तर विनोदीबाजास हवा असलेला अभिनित संयम तुकारामाकडेच नाही, तर प्रत्येक पात्राच्या अंगी असायलाच हवा, ही या संहितेची मागणी आहे आणि ती या नाटकातील नटसंच पूर्ण करतो.
कुशल कोळी, प्रीती तोरणे, श्रद्धा मोहिते, मयुरेश कोटकर, सुजित मेस्त्री, देव कांगणे, लीना पाळेकर आणि ज्ञानेश महाराव अभिनयात कुठेही कमी पडत नाहीत. तुकारामाचे ज्ञात व सर्वश्रुत असलेले अभंग नाट्यसंगीताच्या चालीत सुश्राव्य झाले आहेत. संगीत डाॅ. राम पंडितांचे असून ऑर्गनवर सिद्धेश गुरव व तबल्यावर संदीप पवार यांची साथ लाभली आहे. तसेच प्रसंगानुरुप साधेच परंतु स्थळकाळाचे बदल दर्शविणारे नेपथ्य व प्रकाशयोजना सुनील देवळेकर यांची आहे.
शिवाजी महाराजांची तुकारामाशी झालेली भेट ही कल्पनाच मुळी नाट्यमय आहे. भक्ती आणि शक्तीचे द्योतक असलेली दोन उत्तुंग व्यक्तिमत्त्व नाट्यरूपाने जीवित झालेली कुणाला आवडणार नाहित? ॐ नाट्यगंधा या संस्थेने उचललेले संगीत संत तुकाराम हे धाडसाचे पाऊल आहे. कोविडकाळात लाॅकडाऊनमुळे बंद होणाऱ्या नाटकांमधे शेवटचे नाटक व लाॅकडाऊन संपून पुनर्पदार्पणातील पहिले नाटक म्हणून संगीत संत तुकारामाच्या निर्मात्यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे.