Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिकरिलॅक्सRakshabandhan : कर्तव्य रक्षणाचे...

Rakshabandhan : कर्तव्य रक्षणाचे…

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

निर्मळाहुनी निर्मळ नाते
बहीण-भाऊ प्रेमाचे…
जगी धन्य धन्य जाहले
हे नाते कर्तव्य रक्षणाचे!
जपावे या बंधनास
निरामय भावनेने
जसे जपले हळुवार
मुक्ताई ज्ञानेश्वराने!!
भावा-बहिणीचं नातं हे सगळ्या नात्याहून वेगळं, खास व निर्मळ आहे. त्याला कोणताही स्वार्थ लगडलेला नाही. जे आहे ते आहे, जसं आहे तसं दाखवणारं नातं म्हणजे भावा-बहिणीचं नातं. एकाच रक्ताचे, एकाच घरातले तरी त्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या. स्वभाव भिन्न. एक म्हणेल पूर्व तर एक म्हणेल पश्चिम. असं जरी असलं तरी एकमेकांना अतूट रक्षाबंधनात बांधणारं, कधीही न तुटणारं असं हे नातं.

इतिहासात भावा-बहिणीच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक म्हणजे चितोडगडच्या राणी कर्मावतीची कथा. कर्मावतीने बहादूर शाहपासून आपलं रक्षण करण्यासाठी मुघल बादशहा हुमायूला राखी बांधली. त्यानंतर राजा हुमायूने राणी कर्मावतीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली होती. एवढासा एक धागा तोही किती साधासा. पण प्रेमाच्या रंगात मिसळून हाती बांधला, तर रक्षणासाठी तेच हात मोठ-मोठ्या तलवारीचे वारही परतवून लावू शकतात. असा हा न तुटणारा धागा खरं तर घराघरातही असतो. कुटुंब व समाजाला बांधून ठेवतो. बहीण मोठी असली, तर ती आई बनून ममतेने लहान भावाचे लाड करते. त्याच्या चुकांवर पांघरूण घालते व स्वतः संकटाला समोरं जाऊन आव्हान स्वीकारते आणि भावाला मदत करते. पण हाच भाऊ मोठा झाला की, मग तिच्या रक्षणाची जबाबदारी तो स्वतः उचलतो. भाऊ धाकटा असो वा मोठा. बहिणीचं रक्षण करण्यासाठी तो नेहमीच सज्ज असतो. घरात कितीही मतभेद, भांडण-तंटे असले तरी वेळ आली, तर भाऊ-बहीण एकत्र येऊन जगाला सामोरे जातात. पुराणकाळातही सर्वश्रुत कथा अशी आहे की, एकदा श्रीकृष्णाच्या हाताला जखम झाली त्याच्या बोटातून रक्त भळाभळा वाहू लागलं. तेव्हा द्रौपदीने लगेचच आपल्या भरजरी साडीच्या पदराचं टोक फाडून ते त्या जखमेवर बांधलं व रक्त थांबलं. पुढे त्याच द्रौपदीच्या वस्त्रहरणप्रसंगी श्रीकृष्णाने तिची लाज सांभाळली. अशी ताकद असते या रक्षाबंधनाच्या धाग्यात.

श्रावणात पौर्णिमेला येणारा हा रक्षाबंधनाचा सण. यानिमित्त समस्त बहिणी भाऊरायांकडे येऊन त्यांना राखी बांधतात. भाऊ आयुष्यभर बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतो. बहिणी हक्काने भावाकडून भेटवस्तू घेतात व स्वतः भावासाठी गोडधोड पदार्थ बनवतात. भावासाठी दीर्घायुष्य व कल्याणाची कामना करतात. आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीत नातलगांच्या प्रत्यक्ष भेटी कमी झाल्या आहेत. अर्थातच रक्षाबंधनाच्या सणावरही त्याचा परिणाम झालेला दिसतो. एकमेकांपासून दूर किंवा परदेशात निवास असलेले भाऊ बहीण ऑनलाइन रक्षाबंधनही करतात म्हणे!

एकीकडे रक्ताची नाती संकुचित होत असताना दुसरीकडे सामाजिक नातेबंधांचा परिघ मात्र विस्तारत चाललेला आहे. जगण्यातली अस्थिरता वाढत असताना सुरक्षा यंत्रणा अधिकाधिक सतर्क होत चालल्या आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज त्यांच्याविषयीचं ऋणही व्यक्त केलं जातं. याचा सुखद अनुभव मला परवा रक्षाबंधनाच्या दिवशी मिळाला.

मी गावातच राहात असलेल्या माझ्या भावाला भेटण्यासाठी स्कूटीने जात होते, तर थोड्या अंतरावर पोलीस ठाण्याच्या इथे महिलांची गर्दी दिसली. आधी वाटलं की, कोणी तक्रार वगैरे घेऊन आलेलं असावं. पण महिला तर छान सजूनधजून आलेल्या होत्या आणि पोलिसांसोबत हसून बोलत होत्या. सहज चौकशी केली तेव्हा कळलं की, त्या एका सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्या आहेत व पोलिसांना राखी बांधण्यासाठी त्या तिथे आलेल्या होत्या. मला ही कल्पना फारच भावली. कारण सणवार, दिवस-रात्र अष्टौप्रहर हे पोलीसभाऊ आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज असतात. कोणतीही अपेक्षा न धरता हे काम कित्येक वर्ष ते करत आहेत. तसेच आपले सैनिक. घरादारापासून हजारो मैल दूर अतिदुर्गम भागात अहोरात्र देशाचं रक्षण करत असतात. मग त्याचबरोबरीने मला आठवण झाली कोविड काळात आरोग्यदूत बनलेल्या आपल्या डाॅक्टर व नर्सेसची. ते देखील प्रतिकूल स्थितीत आपलं कर्तव्य नेटाने निभावत असतात. हे सर्व आधुनिक काळातले आपले रक्षणकर्ते भाऊच नाहीत का? मी स्कूटी रस्त्याकडेच्या पार्किंगमध्ये लावून आत पोलीस ठाण्यात गेले. माझ्याजवळची मिठाई तिथल्या पोलिसांना दिली आणि राखीही बांधली. पोलिसांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसला. “ताई, कोणी राखी बांधली वा ना बांधली तरी आम्ही नेहमीच रक्षणासाठी सज्ज असतो. पण लोकांनीही थोडं सहकार्य करायला पाहिजे ना?” ते तळमळीने बोलत होते आणि खरंच होतं ते. राखीविनाही आपलं रक्षणाचं कर्तव्य ते चोख पार पाडत होते. म्हणूनच त्या हातावर राखी बांधताना मला खूप अभिमान वाटला आणि कृतकृत्य झालं. बाहेर जाताना पोलीस ठाण्याच्या फलकावर : ‘सद् रक्षणाय खल निग्रहणाय’ हे त्यांचं ब्रीदवाक्य वाचून मी त्यांना मनातल्या मनात पुन्हा सॅल्यूट ठोकला आणि रक्षाबंधनासाठी माझ्या भावाच्या घराच्या दिशेने निघाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -