
- गोलमाल : महेश पांचाळ
शनिवार, रविवार या सुट्टीला जोडून सुट्टी काढून तिला बाहेरगावी हवापालट करण्यासाठी जायचे होते. ती वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या बिझनेस हबमध्ये एका खासगी कंपनीत काम करते. मुंबईपासून जवळ म्हणून अलिबाग या पर्यटनस्थळी जाण्याचा तिने बेत आखला. त्यासाठी अलिबाग येथील व्हिला आणि बंगले शोधत असताना तिला 'vistarastays.com' ही वेबसाइट सापडली. तिने वेबसाइटशी संपर्क साधल्यानंतर, तिला किनारपट्टीच्या शहरात व्हिला बुक करण्यासाठी ९० हजार रुपये देण्यास सांगण्यात आले. तिने ते पैसे वेबसाइटवरून जो खाते क्रमांक दिला होता त्यावर जमा केले. तथापि, बुकिंगची तारीख जवळ आली होती; परंतु बुकिंग झाल्यामुळे ती बिनाधास्त होती.
अलिबागला गेल्यानंतर तिला जो नंबर दिला होता, तो लागत संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच ज्या व्यक्तीकडून सुरुवातीला संपर्क होऊन पैसे जमा केले होते, त्या आकाश वाधवानी या तरुणाचा नंबर स्वीच ऑफ लागत होता. बुकिंग करून सुद्धा संबंधिताशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची जाणीव तिला झाली. गेल्या आठवड्यातील हा प्रकार होता. तिने मुंबईत परतल्यानंतर स्थानिक बीकेसी पोलीस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार केली. अलिबाग येथील व्हिलाचे ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी ९० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची नोंद करत आरोपी वाधवानी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक) आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा तपास बीकेसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राजेश गरड यांच्यासह पोलीस पथकाने केला. ‘‘तांत्रिक पुराव्याच्या मदतीने जुहू येथील एका हॉटेलमध्ये लपून बसलेल्या वाधवानीला पकडले. २३ वर्षीय आकाश वाधवानीने बनावट वेबसाइट तयार केल्याची माहिती तपासात पुढे आली. याच वेबसाइटच्या माध्यमातून त्याने अनेकांची फसवणूक केली होती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी आतापर्यंत त्याने जवळपास २० जणांची ऑनलाइन बुकिंगच्या नावावर फसवणूक केल्याचे कबूल केले आहे. व्हिला आणि बंगल्यांचे ऑनलाइन बुकिंग करण्याच्या बहाण्याने सुट्टीसाठी येणाऱ्या अनेक पर्यटकांची फसवणूक करणारा ठकसेन आकाश हा घाटकोपरचा रहिवासी आहे. त्याला जुहू येथील हॉटेलमधून अटक करण्यात आली असली तरी त्याने आतापर्यंत अटक टाळण्यासाठी मुंबईतल्या अनेक आलिशान हॉटेलचा आसरा घेतल्याची माहिती पुढे आली. वेबसाइटच्या माध्यमातून जे लोक बुकिंगसाठी संपर्क साधायचे, त्यांना विश्वास देण्याचे काम तो करत होता. त्याच्या बोलण्यावर फसून अनेकांनी त्याला पैसे जमा केले होते. फसवणूक झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. मात्र, तिने पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने आकाशच्या आकाशचा वन टू फोरचा प्रकार उघडकीस आला. त्याच्या अटकेमुळे आता वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांनी आता सावध पवित्रा घ्यायला हवा.
ऑनलाइन बुकिंग करताना घ्या काळजी
- कोणतीही ऑनलाइन बुकिंग किंवा खरेदी करण्यापूर्वी कंपनी किंवा वेबसाइटचे सखोल संशोधन करा. इतर ग्राहकांकडून आलेले रेटिंग आणि फीडबॅक पाहा. ठकसेनाकडून अनेकदा बनावट वेबसाइट तयार केल्या जातात, ज्या अधिकृत वेबसाइटची नक्कल केलेल्या असतात म्हणून
सावध रहा. - निवासाची बुकिंग करताना किंवा खरेदी करताना सुप्रसिद्ध आणि प्रतिष्ठित वेबसाइटचा शक्यतो उपयोग करा. अनोळखी ईमेल किंवा संदेशांच्या लिंकवर क्लिक करणे टाळा.
- वेबसाइटच्या URL मध्ये "https://" आणि अॅड्रेस बारमध्ये पॅडलॉक चिन्ह पाहा. संवेदनशील माहिती शेअर करताना महत्त्वाची काळजी घ्या.
- वेबसाइटवर देण्यात आलेला प्रत्यक्ष पत्ता आणि फोन नंबर खातरजमा करा. संशयास्पद माहिती वाटल्यास सावध राहा.
- अगोदरच पूर्ण पेमेंट मागणाऱ्या वेबसाइट्सपासून सावध राहा.