भारताची पहिली सूर्यमोहिम
श्रीहरिकोटा : भारताने आपलं महत्त्वपूर्ण चांद्रयान मिशन (Chandrayaan Mission) यशस्वी केलं. ही घटना कधीही न विसरता येण्यासारखी आहे. या घटनेचा आनंद आपण साजरा करत असतानाच भारताने नवी सूर्यमोहिम देखील हाती घेतली. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेचे यशस्वी उड्डाण आज पार पडले. आज सकाळी ११:५० वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून आदित्य एल-१ हे यान प्रक्षेपित करण्यात आले. इस्त्रोच्या पीएसएलव्ही एक्सएल (PSLV XL) या रॉकेटच्या माध्यमातून आदित्य एल-१ मिशन सूर्याच्या दिशेनं झेपावले आहे. भारताच्या या आदित्य एल-१ मिशनचा प्रमुख हेतू हा अंतराळातून सूर्यावरील घडामोडींचं निरीक्षण करणं हा आहे.
२००८ सालापासून सौर मोहिमेसाठी भारत प्रयत्न करत आहे. आपण चंद्रावर तापमान काही प्रमाणात अनुकूल असल्याने यान लँड करु शकलो. मात्र, सूर्यावर यान लँड करणे सध्या तरी शक्य नाही. याआधी काही देशांनी सूर्याच्या अत्यंत जवळ यान पाठवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, मात्र सूर्याच्या प्रचंड तापमानामुळे ही याने जळून खाक झाली. भारताचे सूर्याच्या अभ्यासासाठीचे हे पहिलेच पाऊल आहे. याचे उड्डाण यशस्वी झाले असले तरी मधले १५ लाख किमी अंतर कापण्यासाठी आदित्य एल-१ ला जवळजवळ १२७ दिवसांचा कालावधी लागणार आहे. यामध्ये अनेक अडचणी येण्याचीही शक्यता आहे.
इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ (S. Somnath) यांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉन्चिंगनंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील एक टक्का अंतर कापल्यानंतर आदित्य एल-१ या अंतराळयानाला एल-१ बिंदूवर घेऊन जाईल. एल-१ हे सूर्य आणि पृथ्वीमधील एकूण अंतराच्या एक टक्का आहे, म्हणजेच १५ लाख किलोमीटर, तर सूर्यापासून पृथ्वीचं अंतर १५ लाख कोटी किलोमीटर आहे. आदित्य एल-१ मिशन ही सूर्याचं निरीक्षण करणारी इस्रोची पहिली डेडिकेटेड अंतराळ मोहीम असणार आहे.
सौर मोहिमेचे उद्दिष्ट काय?
आदित्य एल-१ ही सूर्याचा अभ्यास करणारी आणि सूर्याची रहस्ये उलगडणारी पहिली भारतीय अंतराळ मोहीम आहे. आदित्य एल-१ मिशन पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतर कापेल, जे चंद्रापेक्षा चार पट जास्त आहे. आदित्य एल-१ मोहिमेचे उद्दिष्ट सूर्याचे कोरोनल हीटिंग आणि सौर पवन प्रवेग समजून घेणे, सौर वातावरणाची गतिशीलता, सौर वाऱ्याचे वितरण आणि तापमान समजून घेणे आहे. सोलर कोरोनाचे निरीक्षण करणं हाच इस्रोच्या या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.