Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीभाजपतर्फे मुंबई शहरात ‘अमृत कलश’ रथ फिरणार

भाजपतर्फे मुंबई शहरात ‘अमृत कलश’ रथ फिरणार

स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठीच ‘माझी माती माझा देश’ अभियान : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना वंदन करण्यासाठी आणि त्यांच्या त्यागाचे स्मरण करण्यासाठी ‘माझी माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून ही माती एकत्रित करून दिल्लीपर्यंत पोहचवूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंचप्रणमध्ये सांगितल्यानुसार आपल्या कर्तव्याचे पालन करूयात, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते मलबार हिल येथे अमृत कलश रथाचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई भाजप अध्यक्ष आ. ॲड. आशीष शेलार, कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, कर्नल रवींद्र त्रिपाठी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाची नवी शिखर पादाक्रांत करत आहे. भारताने ज्या प्रकारे गरिबी कमी केली ते चमत्कारिक आणि आश्चर्यकारक आहे. अशा प्रकारचा निर्वाळा आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीसुद्धा दिला आहे. एकीकडे गरीबी कमी करत असताना दुसरीकडे चांद्रयान-३ चा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि सर्व शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे रचला गेला आहे. पंतप्रधान मोदींनी पाच पंचप्राण दिले आहे. ज्यामध्ये गुलामीची मानसिकता मूळापासून नष्ट करायची आहे, विकसित भारताची संकल्पना मांडायची आहे, ज्यामध्ये कोणत्यादी प्रकारचा भेद समाजात राहणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. आपली संस्कृती आणि तिचा अभिमान बाळगायचा आहे, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतील वाड्यावस्त्यांमधून ‘अमृत कलश यात्रा’ निघणार आहे. १५ सप्टेंबर पर्यंत हे अभियान चालणार आहे. अमृत कलशांमध्ये मूठभर माती, धान्य गोळा करून हे कलश ३१ ऑक्टोबरला दिल्लीला अमृतवाटिकेच्या निर्माणासाठी नेले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळ ‘अमृत वाटिका’ निर्माणाच्या कामाला सुरुवात होणार आहे. अनेक कलशांमधून आणलेल्या माती आणि धान्याचे मिश्रण वापरून या अमृतवाटिकेचे निर्माण होणार आहे. ही ‘अमृत वाटिका’ देशातील सर्वात मोठे प्रार्थनास्थळ ठरणार असून अनेक देशी विदेशी पर्यटक इथे भेट देतील. या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही मुंबई भाजपतर्फे करण्यात आले.

मातृभूमीचे रक्षण करत असताना शहीद झालेल्या वीरांना आणि मातृभूमीला वंदन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली. मुंबईतील सर्व जिल्ह्यात रथ फिरणार असून नागरिकांना या अमृत कलशात माती वाहता येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक महामंत्री संजय उपाध्याय, राजेश शिरवडकर, अमरजित मिश्रा, निरंजन शेट्टी, राजेश रस्तोगी, किरीट भन्साळी यांच्यासह मुंबई भाजपचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -